Agriculture Technology : सुधारित तंत्रज्ञानातून मिळाली काटेकोर व्यवस्थापनास चालना

Grape Farming : कारवडी (ता. कोपरगाव, जि. नगर) येथील युवा शेतकरी राहुल दंडवते यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागायतदार अशी ओळख मिळवली आहे.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

सूर्यकांत नेटके

Nagar News : नगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यातील कारवडी शिवारात राहुल दंडवते यांची पंचवीस एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांनी स्थापत्यशास्त्र (सिव्हिल) विषयात पदविका घेतली आहे. त्यांचे बंधू सागर अमेरिकेत नोकरीनिमित्त स्थायिक आहेत. दंडवते यांचे द्राक्ष हे मुख्य पीक आहे. पैकी पाच एकर जुनी बाग तर अलीकडेच दहा एकर नवी बाग लावली आहे. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, कांदा, मका आदी पिके असतात. राहुल यांचे वडील सुधाकर यांना तीस वर्षापासून द्राक्षशेती करीत असून तेव्हापासून ठिबकचाही वापर आहे.

तंत्रज्ञान प्रणालीचा वापर

राहुल यांनी द्राक्षशेतीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यात आधुनिकता आणण्यास सुरवात केली. सध्या थॉम्पसन सीडलेस, जंबो सीडलेस, सुधाकर एसएनएन व माणिकचमन आदी पाच जातींची लागवड केली आहे. सन २०१९ पासून स्वयंचलित (ऑटोमेशन) ठिबक सिंचन यंत्रणा उभारून एका ‘क्लिक’वर शेती आणली आहे. त्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च केला. राहुल सांगतात की सुमारे पंचवीस एकरांसाठी ही यंत्रणा कार्यान्वित होऊ शकते. सध्या मात्र पंधरा एकरांसाठी ती वापरली जात आहे. याच यंत्रणेबरोबर सुमारे ७५ हजार रुपये खर्चून स्वयंचलित हवामान केंद्र व जोडीला सेन्सर्स यंत्रणा उभारली आहे.

Agriculture Technology
Fertilizer Production : कंपोस्ट खत निर्मिती तंत्राचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण

तंत्रज्ञान वापर व होत असलेले फायदे

स्वयंचलित हवामान केंद्रामुळे पाच किलोमीटर परिघातील हवामानाच्या विविध घटकांची (उदा. तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान आदी) माहिती त्यातून कळते. पुढील १४ दिवसांचा हवामानाचा आगाऊ अंदाज समजतो. त्यातून व्यवस्थापन अधिक काटेकोर करता येते.

प्रत्येकी दोन एकरांसाठी एक याप्रमाणे जमिनीचा ओलावा सांगणारी सात युनिट्स बसविली आहेत. द्राक्षवेलीच्या खोडात जमिनीत साधारण दीड ते दोन फूट खोलीवर ही यंत्रणा आहे. त्यातून पिकाला पाणी केव्हा देण्याची गरज आहे याबाबत मोबाईलवर ‘ॲलर्ट मिळतो. त्या गरजेएवढाच पाणी दिल्यानंतर विद्युतपंप आपोआप बंद होतो.

Agriculture Technology
Rabi Sowing : अकोल्यात रब्बीची लागवड संथगतीने

’’ऑटोमेशन’ यंत्रणेत महत्त्वाचा असलेला ‘कंट्रोलर’ वीस बाय वीस फूट आकाराच्या खोलीत बसवला आहे. त्याच्या दर्शनी भागात पाणी, खतांससह अन्य बाबी संगणकीय दृष्ट्या ‘सेट’ करण्यासाठी स्क्रीन आहे. यात खोलीत पाइपलाइन, ठिबक सिंचन यंत्रणेसाठी असलेले पाणी शुद्धीकरण यंत्र व व्हॉल्व्ह आहे.

सीमकार्डचा वापर करता येतो. साहजिकच मोबाईलवर सर्व डाटा उपलब्ध होतो. त्यामुळे बाहेरगावी असतानाही शेतातील स्थिती लक्षात येते. पूर्वीपासून ठिबकचा वापर हे कुटुंब करीत असले तरी ‘ड्रीप ऑटोमेशन’ मुळे पाणी व खतांचे वेळापत्रक तयार करून त्यानुसार फर्टिगेशन करता येते. त्यासाठी एक हजार लिटर क्षमतेच्या सहा टाक्या बसविल्या आहेत. या यंत्रणेमुळे खतांच्या आवश्‍यक मात्राच देता येतात. शेतात न जाताही विद्युत पंप सुरू करता येतो. पाणी सोडण्यासाठीचे व्हॉल्व्हज फिरवण्यासाठीही शेतात न जाता मोबाईलवरूनच काम होते.

वेळ, पैसे, मजूरबळ यांच्यात ४० टक्के तर पाणी वापरातही ५० टक्क्यापर्यंत बचत झाली आहे. कामांत सुधारणा झाल्याने द्राक्षाची गुणवत्ता वाढवता आली. त्यामुळे दर चांगला मिळवता आला. एकूण व्यवस्थापनातून सध्या द्राक्षाचे एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. पाच वर्षांपासून एका कंपनीमार्फत युरोपीय देशांना निर्यात होते. प्रति किलो ६० ते ७० रुपये दर मिळत आहे.

पाण्याचा अपव्यय थांबला

राहुल सांगतात, की आमच्या भागाला धरणाचे पाणी मिळते. मात्र कित्येक वेळा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. त्यासाठी सन २०१४ मध्ये सव्वा कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. शिवाय विहिरी व विंधनविहिरी आहेत. पावसाळ्यात शेततळे भरून घेण्यात येते. पूर्वी आम्ही साधारण तिसऱ्या-चौथ्या दिवशी पिकाला पाणी द्यायचो. ‘ऑटोमेशन’ केल्यानंतर आता पाण्याचा होणारा अपव्यय थांबला आहे. उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाली, तरी शेततळ्यातील पाणी पुरते. कांदा व अन्य पिकांनाही रब्बीत पाणी उपलब्ध होऊ लागले. राहुल अन्य पिकांतही प्रयोगशील आहेत. त्यांनी टोकण पद्धतीने सोयाबीन घेतले आहे. लागवड अंतराचेही प्रयोग केले. पूर्वी सोयाबीनचे ८ ते १० क्विंटल उत्पादन मिळायचे. त्यात सुमारे पाच क्विंटलने वाढ झाली आहे. ठिबकवरील कांद्याच्या उत्पादनातही वाढ झाल्याचा अनुभव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com