Jalgaon News : खानदेशात मजूर दिवाळीनंतर आता प्रचाराच्या कामासाठी रोजंदारीने जात आहेत. २०० ते २५० रुपये रोज, अशी मजुरी व नाश्ता, जेवण या प्रचारादरम्यान मजुरांना मिळत आहे. यामुळे मजूरटंचाई तयार झाली असून, शिवार ओस आहेत.
दिवाळीच्या तीन-चार दिवसांपूर्वीच मजुरांनी कामबंद केले. दिवाळीची तयारी व अन्य कारणे पुढे करण्यात आली. मजूरटंचाई या काळातही होती. परंतु तीव्रता कमी होती. पण दिवाळी काळात मजूरचटंचाई वाढली. आता दिवाळीनंतर निवडणुकीचा धुमधडाका सुरू झाला आहे. नेते, राजकीय मंडळी यांना आपापल्या मंडपात, सभा, वाहनांत गर्दी आणायची आहे.
संख्या रोज आपल्याकडे कशी अधिक राहील, याची स्पर्धा उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. यामुळे गावोगावी मजूर प्रचारासाठी जात आहेत. दिवाळीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे अर्ज व निधी याचा गोंधळ होता. या काळातही मजूरटंचाई होती. लागलीच दसरा व दिवाळी असे सण आले. त्यात निवडणुकीची भर झाली असून, मजूरटंचाईची समस्या कायम आहे.
सध्या खानदेशात केळी लागवड, भाजीपाला लागवड, कापूस वेचणी, पिकांत तणनियंत्रण आदी कामे सुरू आहेत. परंतु मजूर कुठेही उपलब्ध होत नाहीत. लहान व मोठ्या गावांतही मजूर नाहीत. उमेदवारंचे अर्ज दाखल करण्याच्या दिवशीही मजूर गावात नव्हते. लागलीच प्रचारही सुरू झाला. आता प्रचाराला रंगत आली आहे. यात आणखी मजुरांची गरज राजकीय मंडळीला भासत आहे. सकाळीच वाहने गावात येतात. जेवण व नाश्ता, चहा या प्रचाराच्या दरम्यान मिळत असल्याने सकाळीच मजूर मंडळी शेतीकामे सोडून प्रचारासाठी जात आहेत. अनेक गावांत केळी काढणी, वाहतूक करणारे मजूरही उपलब्ध होत नाहीत. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
अनेक शेतकरी कुटुंब आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने शेतीकामे उरकून घेत आहेत. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. यामुळे बच्चेकंपनीलाही कापूस वेचणीसाठी कुटुंबीय घेऊन जात आहेत. दिवाळीमुळे शेतीकामे प्रलंबित होती. ती उरकून घेण्याची लगबग शेतकरी कुटुंबात सुरू आहे.
सकाळीच शेतीकामांना शेतकरी कुटुंब सुरुवात करतात. अनेक शेतकरी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने फवारणी व अन्य कमे करून घेत आहेत. पण शेतीकामे रखडत, संथ गतीने सुरू आहेत. पुढे निवडणुकीचा ज्वर आणखी वाढेल. तशीच मजूरटंचाईदेखील वाढेल, अशी स्थिती आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.