Ahilyanagar News : दसऱ्याचा सण झाला, की गावगावांत मजुरांची घर सोडण्याची लगबग आणि साखर कारखान्याच्या परिसरातही सुरू होणारी गजबज यंदा अजूनही शांत आहे. राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झालेला नाही. त्यामुळे ऊस तोडणी मजूर गावीच असून अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच ऊस तोड कामगारांची दिवाळी गावी साजरी होत आहे. ऊस तोड कामगारबहुल गावांत त्यामुळे यंदा उत्साह पाहायला मिळत आहे.
राज्यात बारा ते चौदा लाख ऊसतोड मजूर आहेत. प्रामुख्याने बीड, अहिल्यानगर, धाराशिव, हिंगोली, परभणी, नांदेड, जळगाव, नंदुरबार, यवतमाळ भागांत ऊस तोडणी मजुरांची संख्या लक्षणीय आहे. राज्यातील सुमारे दोनशे साखर कारखान्यांची कारखानदारी ऊस तोडणी मजुरांच्या श्रमावर अवलंबून आहे. साधारण ऑक्टोबर अथवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होता.
त्यामुळे दसरा सण झाला की मजूर गाव सोडायला सुरुवात करतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून दर वर्षी ऊस तोडणी मजुरांची दिवाळी उसाच्या फडात, साखर कारखान्यांच्या परिसरातच होते. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यांसारख्या महत्त्वाच्या दिवशीही मजुरांच्या फडात ऊसतोडणी करतानाचे चित्र दरवर्षीच पाहायला मिळत आहे. यंदा मात्र या सर्व बाबी अपवाद आहेत. साखर कारखान्यांचा गाळप हंगामच १५ नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहे.
त्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे अद्याप एकही साखर कारखाना सुरू झालेला नसल्याने अद्याप कोणत्याही मजुराने घर सोडलेले नाही. ऊसतोडणी मजूर गावीच असून, अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच ऊस तोड कामगाराची दिवाळी गावी साजरी होत आहे. ऊस तोड कामगारबहुल गावांत त्यामुळे यंदा दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्यामुळे मजुरांच्या गावी गजबज, तर कारखान्यांच्या परिसरात शुकशुकाट आहे.
ऊसतोड कामगारांचे ज्येष्ठ नेते गहिनीनाथ थोरे म्हणाले, ‘‘साखर कारखाने जोमात सुरू होण्याचा आणि दिवाळीचा काळ एकच असतो. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात मजुरांना गाव सोडण्याशिवाय पर्याय नसतो. पंधरा वर्षांपूर्वी एका संपाच्या वेळी लवकर तोडगा निघाला नव्हता. त्या वेळी दिवाळीला मजूर गावीच होते. यंदा हंगाम सुरू नसल्याने मजूर शेतातील कामेही उरकून घेत आहेत.’’
मजूर मतदारांवरचा खर्च वाचला
राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, यवतमाळ, नंदुरबार जिल्ह्यांत गाळप हंगाम सुरू असलेल्या काळात लोकसभेपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्या तरी ऊस तोड मजुरांचा प्रभाव असलेल्या मतदार संघात मजुरांना मतदान प्रक्रियेसाठी नेते गावी आणतात.
मजुरांच्या जाण्या-येण्याच्या प्रवास खर्चासह अन्य बाबींवर मोठा खर्च संबंधित उमेदवाराला करावा लागतो. यंदा साधारण १५ नोव्हेंबरनंतर बहुतांश साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होणार आहे. मात्र अनेक कारखानदार निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने मतदानानंतरच कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू होतील असा अंदाज आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.