मंगेश तिटकारे, हेमंत जगताप
Warehouse Business Management: गोदाम उभारणी करण्यापूर्वी गोदामास साजेसा व्यवसाय सुरू करणे अत्यंत आवश्यक असते. गोदामाशी निगडित अनेक गोदामविषयक पुरवठा साखळ्या आहेत. यात प्रामुख्याने गोदाम भाड्याने देणे, गोदाम पावती व्यवसाय सुरू करणे, ऑनलाइन बाजारपेठ किंवा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला गोदाम भाड्याने देणे किंवा भागीदारी तत्त्वावर व्यवसाय सुरू करणे, बीजोत्पादन कंपन्यांसोबत भागीदारीत व्यवसाय करणे, किमान आधारभूत किमतीने खरेदी केंद्र सुरू करणे, शेतमाल तारण व्यवस्थापन कंपनी स्थापन करून गोदाम व्यवसाय सुरू करणे, शेतीमाल खरेदी विक्री व्यवसाय करणे, इत्यादी अनेक व्यवसाय गोदाम उभारणीच्या माध्यमातून सुरू करण्यास वाव आहे.
कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी
गोदामाशी निगडित अशा विविध पुरवठा साखळ्यांमध्ये प्रामुख्याने कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी (CMA) सोबत गोदाम पावती व्यवसाय सुरू करण्यास मोठी संधी आहे. परंतु या एजन्सी प्रामुख्याने निर्यातदार, खरेदीदार, प्रक्रिया उद्योग, शासकीय यंत्रणा यांच्यासोबत काम करीत असल्याने सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी व महिला बचत गटांचे फेडरेशन यांना कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी ही संकल्पना माहिती नाही.
अशा प्रकारची माहिती असणाऱ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या शेतकरी उत्पादक कंपन्या असून सहकारी संस्था आणि महिला बचत गटांचे फेडरेशन याबाबत पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. यात प्रामुख्याने श्री शुभम लॉजेस्टिक्स लिमिटेड, आर्या कोलॅटरल, स्टार अॅग्री वेअरहाऊसिंग, गो ग्रीन वेअरहाउसिंग, अदानी वेअरहाउसिंग, नॅशनल बल्क हॅंडलिंग कॉर्पोरेशन यांसारख्या २२ पेक्षा अधिक कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी देशभरात कार्यरत आहेत.
कोलॅटरल मॅनेजमेंट एजन्सी या कृषी दळणवळण क्षेत्रातील भारतातील अनेक कंपन्यांपैकी गोदाम व्यवसायाशी निगडित एक प्रकारची कंपनी आहे. शेतीमालाच्या मूल्यसाखळीत सर्व सहभागींना एकाच छताखाली एंड-टू-एंड वेअरहाउसिंग सोल्यूशन्स आणि सेवा देतात. वैज्ञानिकदृष्ट्या निर्मिती केलेल्या गोदामांद्वारे साठवणूक क्षमता निर्माण करणे हे या कंपन्यांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. या कंपन्या संपूर्ण देशभर गोदामविषयक सेवा पुरवितात. या कंपन्या देशभरात पसलेल्या वैज्ञानिकदृष्ट्या तयार केलेल्या साठवणूक विषयक पायाभूत सुविधा देतात.
या कंपन्यांकडे देशभरात प्रति कंपनी किमान ५०० हून अधिक गोदामांचे अत्याधुनिक वेअरहाउसिंग नेटवर्क असते. त्यांचे आकारमान १ कोटी चौरस फुटांपेक्षा जास्त असून २० लाख मेट्रिक टनांहून अधिक साठवण क्षमता असते. एवढ्या मोठ्या क्षेत्राचे सक्षम आणि अनुभवी व्यावसायिकांच्या टीमद्वारे व्यवस्थापन केले जाते. साठवणूक केलेल्या शेतीमालाचे कीटकांपासून आणि चोरी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी या कंपन्यांमार्फत कठोर प्रक्रियांचे पालन केले जाते. ज्यामुळे शेतीमाल काढणीनंतरचे नुकसान कमी होते. या सर्व कंपन्यांकडे आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज शीतगृहे आणि सायलोसारख्या अवाढव्य साठवणूक सुविधा उपलब्ध असतात.
कृषी लॉजेस्टिक्स पार्क
तापमान नियंत्रित गोदामे : गोदामातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी गोदामाचे छत आणि बाजूच्या भिंतीचे आवरण इन्सुलेटेड पद्धतीने तयार केलेले असते.
साठविलेल्या वस्तूंची सुरक्षितता : गोदामाच्या छतावर टर्बो व्हेंटिलेटर आणि छतावरील मॉनिटर्स किंवा रिज व्हेंटिलेटरमुळे वायुप्रवाह नियंत्रित राहतो. यामुळे गोदामातील हवा खेळती राहिल्याने साठविलेल्या वस्तू सुरक्षित राहतात.
शेतीमाल तपासणी सुविधा : या कंपन्यांचे भारतभरातील प्रमाणित प्रयोगशाळांसोबत करार असल्याने या प्रयोगशाळांमध्ये शेतीमालाची चाचणी केली जाते. धान्याच्या स्वच्छतेबाबत हमी मिळते. गवार बियाणे, गवार स्प्लिट, कापूस बियाणे, तेल, केक, तीळ बियाणे, गहू, बार्ली, एरंडेल बियाणे, जिरे, मोहरी, धणे आणि गवार गम यासह सर्व प्रमुख वस्तूंची चाचणी केली जाते. तसेच माती, पाणी, पोलाद, खनिजे, तेल इत्यादींची चाचणी करण्याची सुविधादेखील या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध आहे.
फ्युमिगेशन आणि कीटकनाशक नियंत्रण : स्टॅक आकाराचे फ्युमिगेशन कव्हर, स्प्रेअर आणि डस्टरसह फ्युमिगेशन आणि फवारणी सुविधा गोदामांच्यामध्ये उपलब्ध असते.
पूर आणि आपत्ती व्यवस्थापन : शेतमालाची सोईस्करपणे ‘आत आणि बाहेर’ ने-आण करण्यासाठी किमान १.२ मीटर उंच डॉकिंग व्यवस्था असते, तसेच पुरासारख्या बाह्य धोक्यांपासून शेतमालाच्या साठ्याचे संरक्षण करण्यासाठी विमा सुरक्षा सुविधा उपलब्ध असते.
उंदीर नियंत्रण : उंदीर आणि पक्ष्यांचा गोदामात प्रवेश रोखण्यासाठी उंदीर प्रतिबंधक औषधे, पिंजरे आणि गेटला जाळ्या किंवा पडदे बसविण्यात येतात.
स्वच्छता व प्रतवारीची सुविधा : शेतमालावर प्राथमिक प्रक्रियेसाठी, स्वच्छता व प्रतवारी यंत्रांचा वापर केला जातो. या यंत्राद्वारे दगड, काडीकचरा वेगळा केला जातो. काही प्रमाणात त्याची प्रतवारी केली जाते.
सुलभ वाहन वाहतूक : मोठ्या ट्रॉली, ट्रकच्या सुलभ हालचालीसाठी गोदामाभोवती एकेरी वाहतूक आणि रुंद रस्ते यांची सुविधा उपलब्ध असते.
सुरक्षा आणि माहिती सूचना : कर्मचारी, वाहन आणि साहित्याच्या शिस्तबद्ध आणि सुरळीत हालचालीसाठी संपूर्ण गोदाम संकुलात दिशानिर्देशक, सुरक्षितता आणि महत्त्वाची माहिती देणारे फलक लावलेले असतात.
अग्निशमन नियंत्रण प्रणाली : गोदाम परिसरात २४ तास वीज बॅकअपसह हायड्रंट्स आणि पाण्याचे साठे यासह अग्निशमन प्रणालीची सुविधा उपलब्ध असते.
सुरक्षा : सीसीटीव्ही कव्हरेजसह २४ तास आणि ७ दिवस सुरक्षा सेवा उपलब्ध असते.
वेअरहाउसिंग व्यवस्थापन प्रणाली : शेतमालाच्या साठ्याच्या हालचाली रेकॉर्ड करण्यासाठी, त्यावर देखरेख करण्यासाठी आणि गोदामातून गोदामाच्या पावत्या देण्यासाठी कस्टम अॅप्लिकेशन लिंक्ड ऑनलाइन डेटा एंट्री प्रणालीचा वापर करण्यात येतो.
शेती ते बाजारपेठ : बऱ्याच सीएमए कंपन्यांकडे शीतसाखळी प्रकल्प उपलब्ध असून अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत (MOFPI) सदर प्रकल्प मंजूर केला जातो. उदाहरणादाखल राजस्थानमधील एका सीएमए कंपनीचा शीत साखळी प्रकल्प पाहण्यास हरकत नाही. हा प्रकल्प अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने त्यांच्या ‘शीत साखळी, मूल्यवर्धन आणि संवर्धन पायाभूत सुविधा’ या योजनेअंतर्गत मंजूर केला आहे. ही एक अत्याधुनिक एकात्मिक सुविधा असून ‘शेत ते बाजारपेठ’ संकल्पना म्हणून त्याची स्थापना करण्यात आली आहे आणि त्यात शेतमालाची खरेदी, प्राथमिक प्रक्रिया, शीतगृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहे. धने या शेतमालाच्या बाजारातील वितरण व्यवस्थेत याचा समावेश करण्यात आला आहे.
शीत साखळी सुविधेची वैशिष्ट्ये
शेत ते बाजारपेठ : शीत साखळी प्रकल्प ही एक एकात्मिक सुविधा असून रामगंजमंडी येथे खरेदी आणि प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे. तसेच रामगंजमंडी आणि मंदाना येथे रेफ्रिजरेटेड साठवणूक व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सीएमए कंपन्यांचे विविध प्रमुख वित्तीय संस्थांशी करार करण्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांसह सर्व कृषी मूल्य साखळीतील सहभागींना सीएमए कंपनीद्वारे उभारणी केलेल्या गोदामांमध्ये साठविलेल्या त्यांच्या साठ्यासाठी निधी देण्यास मदत होते. मूल्य साखळीच्या सर्व स्तरातील लाभार्थ्यांना शेतमाल तारण व्यवस्थापन सेवा उपलब्ध झाल्याने जोखीम व्यवस्थापन पद्धतीचा सर्व घटकांना फायदा होत आहे.
‘सीएमए’ कंपन्यांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा
तारण ठेवलेल्या वस्तूंचे व्यवस्थापन.
तारण ठेवलेल्या वस्तूंचे प्रमाण आणि गुणवत्तेची खात्री.
गोदाम पावती देणे.
शेतमाल साठवणूक पावती.
शेतमाल चाचणी आणि प्रमाणीकरण.
तारण ठेवलेल्या वस्तूंचे दैनिक निरीक्षण.
तारण ठेवलेल्या वस्तूंचे धुरीकरण आणि जतन.
तारण ठेवलेल्या वस्तूंचे नियमित ऑडिट.
आघाडीच्या वित्तीय संस्था आणि बँकांसोबतची भागीदारी, त्रासमुक्त व्यापार सुविधा आणि निधी सेवा यामुळे शेतकरी आणि कृषी उत्पादनांचा व्यापार करणाऱ्या बाजारपेठेतील घटकांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज सुविधा मिळविता येतात.
सीएमए संस्था वित्त पुरवठा करण्यासाठी वित्तीय संस्थांचे पॅनल तयार करतात.
चाचणी आणि प्रमाणन सेवांद्वारे कृषी आणि बिगर-कृषी उत्पादनांचे गुणवत्ता मूल्यांकन केले जाते.
काही सीएमए कंपन्यांची स्वत: ची स्वतंत्र नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी वित्तसाहाय्य पुरवठा करण्यासाठी असते. त्या माध्यमातून जलद कागदपत्रे तपासणी आणि कर्ज मंजुरीसाठी आयटी नियंत्रित सक्षम प्रणाली,संघटित क्षेत्रातील सर्वात जलद टर्नअराउंड वेळेपैकी एक, नेटवर्क गोदामे, गोदाम पावत्या / साठवणूक पावत्या देऊ शकतात, ज्यामुळे प्रक्रिया खूप जलद होते, मंजूर कृषी उत्पादनांच्या तारणावर आणि COMTRACK ई-लॉट्सवर कर्ज देण्यात येते. तसेच शेतमालाच्या काढणीपश्चात मूल्य साखळीतील घटकांसाठी निधीची सुलभ उपलब्धता केली जाते.
भारतातील कृषी क्षेत्र सामान्यतः असंघटित आहे आणि बहुतेक शेतीशी संबंधित उपक्रम लहान बाजारपेठेतील घटकांकडून केले जातात, ज्यांना वेळोवेळी निधी मदतीची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर, सीएमए कंपन्यांची स्वत:ची स्वतंत्र नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी शेतीमालाच्या काढणीनंतरच्या टप्प्यात वित्तपुरवठा करण्याचे काम करते. यात प्रामुख्याने सिएमए संस्थेच्या स्वत:च्या गोदामांमध्ये साठविलेल्या साठ्याच्या तारणावर वित्तपुरवठा करण्यात येतो. ज्याची गुणवत्ता सीएमए कंपनीच्या पॅनलमधील प्रयोगशाळांमध्ये तपासली जाते आणि प्रमाणित करण्यात येते.
गोदाम पावत्या वस्तू व्यापाराचे एक प्रमुख साधन बनण्यास सज्ज आहेत. गोदाम मालक, शेतकरी किंवा ग्राहकांसह सर्व भागधारकांसाठी फायदेशीर आहेत. ठेवीदाराला अधिकृतपणे मान्यताप्राप्त पावती मिळते ज्यावर तो पुढील शेती / व्यवसायासाठी बँक कर्ज मिळवू शकतो किंवा पावतीची खात्री करून त्याचे उत्पादन प्रत्यक्ष ताबा न घेता तिसऱ्या व्यक्तीला विकू शकतो. शिवाय, या सीएमए कंपनीशी निगडित नॉन-बँकिंग वित्तीय कंपनीने एनसीडीईएक्ससोबत ‘ई-प्लेज फॅसिलिटेशन करार' केलेला असल्याने ‘एनसीडीईएक्स’वर व्यवहार करता येणाऱ्या वस्तूंवरसुद्धा कर्ज दिले जाऊ शकते.
- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०
(शेतमाल तारण व्यवस्थापन सेवातज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, स्मार्ट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्यादित, साखर संकुल, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.