Natural Mango Ripening : पाड लागल्यानंतर आंबा काढून, तो पारंपरिक पद्धतीने आढी घालून पिकवला जातो. त्यासाठी एक विशिष्ट काळ लागतो. बाजारातील मागणीचा दबाब घेत व्यापारी मंडळी व्यवस्थित पक्व न झालेले आंबे झाडावरून काढतात. आढी घालतेवेळीही लवकर पिकण्यासाठी रसायनांचा वापर करतात.
त्यातून आंब्याला चांगला रंग आला, तरी आतून आंबा चांगला पिकलेला असेलच असे नाही. त्यामुळे फळांना व्यवस्थित चव नसते. त्याच प्रमाणे दोन, तीन दिवसांतच फळांवर काळे चट्टे पडतात. शिवाय ही रसायने आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन आंबा पिकविण्याच्या शास्त्रीय पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.
आंबा पिकवणीच्या घरगुती पद्धती
अ) घरगुती पद्धतीने आंबा पिकविण्यासाठी सामान्यतः उसाचे पाचट, भाताचे तणस, वाळलेले गवत अशा घटकांचा वापर केला जातो. आंबा पिकण्याची नैसर्गिक क्रिया सुरू असताना त्यातून अल्प प्रमाणात इथिलीन वायू बाहेर पडत असतो. उघड्यावरील आंब्यांमध्ये हा वायू वातावरणामध्ये निघून जातो.
हा नैसर्गिकरीत्या तयार होणारा इथिलीन वायू अडविण्यासाठी अडथळा निर्माण करण्यासाठी उसाचे पाचट, भाताचे तणस, वाळलेले गवत यांचा वापर करतात. जवळ जवळ ठेवलेल्या आंब्यांमध्ये उत्सर्जित होणारा इथिलीन वायू एकमेकांना मिळतो. मात्र या प्रक्रियेमध्ये वाढलेल्या हाताळणीमुळे इजांची शक्यता वाढते. गवतामुळे फळांवर धूळ बसून फळे सडण्याचेही प्रमाण वाढते.
हे टाळण्यासाठी फळाखाली वर्तमानपत्राचे पेपरचे एकावर एक असे दोन ते तीन थर द्यावेत. त्यावर तीन ते चार थरात फळे रचावीत. असे दोन ते अडीच फुटांचे व गरजेनुसार लांब गादीवाफे तयार करावेत. त्याच्या बाजूने आणि वरूनसुद्धा वर्तमान पेपरने घट्ट झाकून हवाबंद करावेत.
एकापेक्षा जास्त वाफे करणार असाल, तर दोन्हींमधून पाहणीकरिता चालता यावे, इतकी जागा ठेवावी. या प्रकारे वर्तमानपत्राने बंदिस्त केल्यामुळे संपूर्ण हवाबंद होत नाही. परंतु येथे तयार होणारा वायू एका फळाचा दुसऱ्या फळाला मिळतो. फळे दोन-तीन दिवस लवकर पिकतात. त्यांना आकर्षक रंग येतो.
ब) इथेफॉन दीड मिलि अधिक बेनोमिल* एक ग्रॅम प्रति लिटर पाणी असे द्रावण तयार करून त्यात फळे पाच मिनिटे बुडवावीत. त्यानंतर व्यवस्थित कोरडी करून घ्यावीत. (फळ बुडवणीसाठी या रसायनाचा पीएचआय सामान्यतः ७ ते १० दिवस आहे.) वर सुचविलेल्या पद्धतीने ही फळे पिकविण्यास ठेवावीत. यामुळे फळे देठाकडून सडणे, करपा रोगामुळे फळे सडणे असे प्रकार होत नाहीत. या द्रावणात इथेफॉनचा समावेश असल्यामुळे फळे एक ते दोन दिवस लवकर पिकतात. फळांना आकर्षक रंगही येतो. (*सीएफटीआयआर, म्हैसूर यांची शिफारस)
क) जमिनीवर रचून आंबा फळे पिकविण्याची पद्धत सामान्यतः वापरली जात असली, तरी त्या ऐवजी प्लॅस्टिक क्रेटचाही वापर करता येतो. क्रेटमध्येही खालून आणि बाजूने पेपरचे थर ठेवून फळे ठेवावीत. नंतर वरून पेपर घालावेत. यात फक्त फळ लवकर पिकण्यासाठी प्रति क्रेट चार-पाच पिकलेली केळी किंवा पिकलेले आंबे ठेवावीत. या फळांतून निघणारा इथिलीन वायू अन्य फळांना चांगल्या प्रकारे पिकविण्यास मदत करतो. मात्र पिकविण्यासाठी ठेवलेली (केळी किंवा आंबा) फळे दोन-तीन दिवसांत काढून घ्यावीत. ही पद्धत तर आपल्या घरी सहज वापरता येऊ शकते.
खरेतर आंबा पिकविण्यासाठी २० ते २३ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० ते ९५ टक्के सापेक्ष आर्द्रता ही अत्यंत महत्त्वाची असते. आंबा पिकविण्याच्या खोलीतील वातावरण शक्यतो थंड असावे. पत्र्याच्या शेडऐवजी गवताने शाकारलेली किंवा कौलाचे छत असलेल्या अंधाऱ्या खोलीमध्ये आंबे पिकविण्यासाठी ठेवावेत. येथील आर्द्रता वाढविण्यासाठी रिकामी पोती ओली करून खोलीतच पण आंब्यापासून दूर ठेवावीत. एसी रूम असल्यास त्यात आंबे पिकविण्यासाठी ठेवणे शक्य आहे.
खास पिकवण कक्ष (रायपनिंग चेंबर)
या कक्षामध्ये साधारणतः एक ते दोन टन आंबा एका वेळेस पिकवता येतो. या कक्षातील तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत, सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के ठेवण्यात येते. सामान्यतः वातावरणात कार्बन डायऑक्साइड ०.०३ टक्का (३०० पीपीएम) इतक्या प्रमाणात असतो. मात्र पिकण्याच्या प्रक्रियेमध्ये आंब्याच्या श्वसनातून बाहेर पडणारा कर्बवायू तिथेच साठतो. त्याचे प्रमाण ३ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढते.
हा कार्बन डायऑक्साइड वायू काढून घेण्यासाठीची वेगळी व्यवस्था केलेली असते. या कक्षामध्ये सिलिंडरमधून इथिलीन वायू ५० ते १०० पीपीएम इतक्या प्रमाणात सोडला जातो. अशा चेंबरमध्ये योग्य पक्वतेवर काढणी केलेला आंबा साधारणतः ४८ तास ठेवला जातो. त्यानंतर बाहेर काढून पिकवला जातो. या पद्धतीमध्ये आंबे अत्यंत चांगल्या प्रकारे पिकतात. ही उत्तम पद्धत असली तरी खर्चिक असल्याने सर्वांनाच पिकवण कक्ष उभारणे शक्य नसते. कमी अधिक प्रमाणात कच्चा आंबा असणाऱ्या विशेषतः लहान शेतकरी आणि शहरी ग्राहकांना हे परवडत नाही.
घरगुती आंबा पिकवण कक्ष
नैसर्गिकरीत्या आंबा पिकविण्यासाठी बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने स्वस्तामध्ये तयार करता येईल, असा आंबा पिकवण कक्ष विकसित केला आहे. यातही इथिलिन वायूचा वापर केला जात असला, तरी त्यासाठी इथिलीनचे गॅस सिलिंडर वापरण्याची गरज नसते. त्या ऐवजी इथेफॉन या रसायनामध्ये कॉस्टिक सोडा मिसळून जागेवरच इथिलीन वायू तयार करण्याची पद्धत वापरता येते.
योग्य पक्वतेची निवडक फळे क्रेटमध्ये ठेवावीत. प्लॅस्टिकच्या हवाबंद कक्षामध्ये क्रेट ठेवावा.
या कक्षाच्या प्रति घनमीटर आकारानुसार एका छोट्या वाटीमध्ये दोन मिलि इथेफॉन घ्यावे. या दोन मिलि इथेफॉनमध्ये ०.५० ग्रॅम कॉस्टिक* सोडा मिसळावा. या दोन्ही रसायनांच्या क्रियेतून इथिलिन वायू निर्माण होईल. तो हवाबंद पॉलिथिन चेंबरमध्ये सर्वत्र पसरेल.
हा वायू व्यवस्थितरीत्या कक्षामध्ये पसरण्यासाठी शक्यतो छोट्याशा बॅटरीवर चाललेला फॅन ठेवल्यास फायदा होतो.
या प्रकारे इथिलीन वायू खेळता ठेवलेल्या कक्षामध्ये आंबे २४ ते ३० तास ठेवावेत. त्यानंतर कक्ष उघडून फळे बाहेर काढावीत. ती फळे क्रेटमध्ये खाली वर्तमानपत्राचा कागद पसरवून नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी ठेवावीत. सामान्य तापमानामध्ये साधारणतः सहा ते सात दिवसांत फळे चांगल्या पद्धतीने पिकतात. फळांना आतपर्यंत पूर्ण पक्वता येऊन आकर्षक पिवळा रंग येतो. साखर आणि आम्लता योग्य असल्याने विशिष्ट चवही प्राप्त होते.
डॉ. भगवानराव कापसे, ९४२२२९३४१९
(निवृत्त शास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.