Mumbai News : विंधणे येथील कातकरी आदिवासी बांधवांना उरण परिक्षेत्रात वन अधिकाऱ्यांकडून रोखले जात आहे. त्यामुळे आदिवासींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी कातकरी यांनी केली आहे.
तसेच माणगाव येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी कातकरी आदिवासी बांधव तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा आदिवासी अधिकार संघर्ष समिती रायगडच्या वतीने उरण तहसीलदारांना निवेदनातून दिला आहे.
विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वन जमिनीवर फळ झाडे, भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. तसेच नदी परिसरात मासेमारी करून उपजीविका करत आहेत.
परंतु गेल्या काही दिवासांपासून कातकरी आदिवासी बांधवांना उरण वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी वन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा व पोलिस केसेस दाखल करण्याचा धाक दाखवत आहेत, असा आरोप आदिवासींकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे कातकरी आदिवासी बांधवासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न गहन बनत चालला आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना उरण तहसीलदार, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आदिवासी अधिकार संघर्ष समितीने केली आहे.
तसेच वन अधिकाऱ्यांचा निषेध करून आपल्या न्याय हक्कासाठी रायगड माणगाव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कातकरी आदिवासी बांधवांनी उरणचे नायब तहसीलदार गजानन धुमाळ यांच्याकडे दिलेल्या निवेदन पत्रकाद्वारे दिला.
विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कातकरी आदिवासी बांधव हे पिढ्यानपिढ्या आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वन जमिनीचा वापर करत आहेत. शासनाचा कायदा हा आता बनला आहे. तरी शासनाचे प्रतिनिधी असणाऱ्या महसूल अधिकारी, वन अधिकारी, पोलिस वर्गाने कातकरी बांधवांवर बेघर आणि उपासमारीचे संकट ओढवणार नाही याची खबरदारी घ्यावी.बी. पी. लांडगे, सदस्य उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती.
येथील काही जमिनीवर वन विभागाकडून नर्सरी केली जाते. त्या जमिनीचा ताबा हे कातकरी आदिवासी बांधव सांगत आहेत. तसेच आदिवासी कसत असलेल्या जमिनी या भांडवलदारांना विकत आहेत. असे आमच्या निदर्शनास येत असल्याने या गोष्टींना लगाम घालण्यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालय, पोलिस यंत्रणेकडे तक्रार अर्ज सादर केले आहेत.नथुराम कोकरे, वन अधिकारी, उरण.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.