एकनाथ पवार
Agriculture Innovation: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ (ता. वैभववाडी) येथील सचिन विजय कोलते यांनी आपल्या पारंपरिक शेतीला काजू व आंबा लागवडीतून शाश्वत केले आहे. त्याला पशुपालनाची जोड देत उत्पन्नामध्ये भर घातली आहे. काटेकोर आर्थिक नियोजन करत शेती आणि पूरक व्यवसायात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून करूळ गाव ओळखले जाते. नागमोडी वळणाचा साडेनऊ किलोमीटर घाट उतरताच निसर्ग सौंदर्याचा नजराणा घेऊन करूळ गाव समोर येते. चारही बाजूंनी गर्द झाडीने भरलेल्या डोंगरामध्ये वसलेले हे गाव. सध्या काँक्रिटीकरण सुरू असलेला तळेरे - कोल्हापूर हा महामार्ग याच गावातून जातो. गावातील शेतकरी पारंपरिकरीत्या भात, नाचणी अशी पिके घेतात.
येथे गावठाण (अ) वाडीत सचिन विजय कोलते यांचे घर आहे. बारावीपर्यत शिक्षण झाल्यानंतर २००५ मध्ये नोकरीकरिता दमणचा (गुजरात) रस्ता धरला. मात्र लहानपणापासून शेतीतच राहिल्याने गावाची ओढ काही त्यांना तिथे राहू देईना. जेमतेम वर्षभर खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर वडिलांची प्रकृती खालावल्यामुळे ते गावी परत आले. २००६ मध्ये वडिलांचे निधन झाल्यामुळे शेतीची सर्व जबाबदारी सचिन यांच्यावर आली.
सुरुवातीला वडिलांप्रमाणे भात, नाचणी, भुईमूग अशा पारंपरिक पिके ते घेऊ लागले. या पारंपरिक पिकातून आर्थिक गणित काही जमत नव्हते. त्यामुळे शेतीसोबतच गाव परिसरातील विद्युत विभागाच्या मीटर वाचकाचे काम त्यांनी सुरू केले. हे काम महिन्यातील काही दिवस असते. त्यामुळे काही मिळकत होऊ लागली.
किफायतशीर शेतीचा निर्णय
कोलते यांची शेती प्रामुख्याने डोंगरात आहे. त्यात सपाट आणि लागवडीयोग्य जमिनीचे प्रमाण अगदीच कमी होते. या शेतामध्ये डोंगराळ भागात घेण्यायोग्य व आर्थिक दृष्ट्या फायदेशीर पिकांचा शोध ते घेऊ लागले. काही जागेमध्ये त्यांच्याकडे पहिल्यापासून गावरान काजू झाडे होती. काजू अभ्यासकांचा सल्ला घेतला. डोंगर उतारावरील जमीन काजू लागवडीसाठी उत्तम असल्याचे समजल्यानंतर त्यांनी नव्याने काजू लागवडीचा विचार केला. पण आर्थिक बाजू लंगडी असल्याने खड्डे करण्यापासून सर्व कामांसाठी मजूर घेणे परवडणारे नव्हते.
स्वतः कंबर कसली. कुटुंबातील सदस्यांना सोबत घेत शेतांची साफसफाई व खड्डे अशी कामे सुरू केली. २०१२ पासून पहिल्या वर्षी १००, दुसऱ्या वर्षी २०० अशी टप्प्याटप्पाने काजू लागवड करत गेले. सुरुवातीला लागवड केलेल्या काजू झाडांपासून तिसऱ्या वर्षानंतर उत्पादन सुरू झाले. त्यातून उत्पन्नाचा स्रोत सुरू झाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. या मिळणाऱ्या उत्पन्नातून हळूहळू काजू लागवड आणखी वाढवत नेली. आता त्यांच्याकडे ९०० काजू कलमे, तर १०० गावरान काजू झाडे आहेत.
शेतीला दिली पशुपालनाची जोड
ग्रामपंचायतीद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील पशुपालकांचे उत्तम गोठे पाहण्यासाठी नेलेल्या शेतकरी सहलीसोबत सचिन गेले होते. ही सहल त्यांचे डोळे उघडणारी ठरली. पशुपालनातून शेतकऱ्यांनी मिळवलेली समृद्धी त्यांना डोळ्यांनी पाहिली. खरेतर पूर्वीपासून त्यांच्याकडे काही जनावरे असली, तरी त्यांचे पालन व्यावसायिक विचारातून केले जात नव्हते. कोल्हापूर भेटीनंतर व्यावसायिकरीत्या दुग्ध व्यवसाय करायचे मनावर घेतले.
शेतात काजूचे बस्तान चांगले बसले होते. त्यातून मिळालेल्या रकमेतून २०१९ मध्ये सुरुवातीला दोन म्हशी खरेदी केल्या. त्यानंतर एक गायदेखील खरेदी करत त्यांना दूध व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्याकडे ५ म्हशी, ४ गाई आहे. लहानमोठी मिळून १३ जनावरे आहे. त्यातील दोन म्हशी व एक गाय दुधामध्ये आहे.
सध्या त्यांना सरासरी १२ लिटर दूध प्रति दिन मिळते. ते डेअरी व रतिबाला जाते. त्याला डेअरीला सरासरी ५५ रुपये, रतिबाला ६० रुपये प्रति लिटर असा दर मिळतो. वर्षभरात सरासरी १० ते १२ लिटर दुधाप्रमाणे ४ ते ४.५ हजार दूध उत्पादन मिळते. त्यातून वर्षाला २ ते २.५ लाख उत्पन्न हाती येते. घरचाच चारा व अन्य किमान खर्च असे एक लाख रुपये वजा जाता दुग्ध व्यवसायातून चांगला नफा शिल्लक राहतो.
नुकतेच पशुपालनाला जोड म्हणून त्यांनी गावरान कोंबडीपालन सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ५० कोंबड्या असून, त्यातून अंडी उत्पादन सुरू झाले आहे. आजवर गावातच दहा रुपये प्रति नग या प्रमाणे ३० डझन अंडी विकली आहेत.
व्यवसायातच केली गुंतवणूक
काजू उत्पादनांसह दुग्ध व्यवसायातून शिल्लक रकमेतून ३ लाख ७५ हजार रुपये खर्चून त्यांनी ७३० वर्गफुटाचा आधुनिक गोठा उभारला आहे. यात १५ जनावरांची सोय होऊ शकते. मिळणाऱ्या उत्पन्नातून आणखी दोन एकर शेती खरेदी केली आहे.
उत्तम दर्जेदार उत्पादनावर भर
काजू उत्पादन ः वर्षातून एकदा जूनमध्ये सेंद्रिय व रासायनिक खतांचा डोस बागेला दिला जातो. काजू बागेमध्ये शक्यतो कोणताही फवारणी घेणे टाळले जाते. त्यामुळे रासायनिक अवशेषमुक्त अशा त्यांच्या काजू बीला व्यापारी प्राधान्य देतात. या बीचा दर्जा उत्तम असल्यामुळे व्यापारी शेतातून बाजारभावापेक्षा १० रुपये अधिक दराने खरेदी करतात. मागणीनुसार ओली काजू बी देखील शेकडा २०० ते २५० रुपये दराने विकली जाते.
पशुपालनातही नावलौकिक ः सातत्यपूर्ण दुग्ध व्यवसाय करत असल्यामुळे वैभववाडी तालुका खरेदी विक्री संघाचा २०२१-२२ चा उत्कृष्ट पशुपालन व्यवस्थापन शेतकरी पुरस्कार कोलते यांना मिळाला आहे.
- सचिन विजय कोलते, ९४०३२३०९३३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.