Dairy Farming : दुग्ध व्यवसायातून कुटुंब नांदतेय समाधानी आयुष्य

Dairy Business : सुमारे १३ सदस्यांच्या या एकत्रित कुटुंबातील सदस्यांनी मेहनत घेत उत्कृष्ट व्यवस्थापनातून दिवसाला ३२ लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी तयार केल्या.
Cow Shed
Dairy Farming Agrowon
Published on
Updated on

Dairy Farming Success Story : कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लजपासून चार किलोमीटरवर गडहिंग्लज- आजरा रस्त्यालगत आत्याळ हे छोटे गाव आहे. गावाला शेती कमी असली, तरी पोल्ट्री, दुग्ध व्यवसाय करणारे अनेक शेतकरी गावात आहेत. यापैकीच संदीप पाटील यांचे कुटुंब आहे.

गजानन, संदीप व आनंदा अशा या तिघा बंधूंचे हे कुटुंब आजच्या युगातही एकत्रित असून कुटुंबात १३ सदस्य आहेत. त्यांची आठ एकर शेती आहे. त्यातील पाच एकरांत ऊस, तर तीन एकरांमध्ये वर्षभर चारा पिकांची लागवड केली आहे. शेती व दुग्धोत्पादनाशिवाय सिमेंट ब्लॉक्स तयार करण्याचाही पूरक व्यवसाय आहे. मात्र प्रमुख ‘फोकस’दुग्ध व्यवसायावरच आहे.

व्यवसायाची उभारणी

सन २००३ मध्ये परिसरातून पाच ‘एचएफ’ संकरित गायी आणून व्यवसायास प्रारंभ झाला. आई लक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मेहनतीची साथ लाभली. त्यातूनच प्रत्येक वर्षी गोठ्यात जनावरांची संख्या वाढू लागली. आजमितीस लहान-मोठी मिळून ५० पर्यंत जनावरांची संख्या आहे.

आत्याळ गावातील नंदापाचीवाडी भागात दहा गुंठ्यांत गोठ्याचे बांधकाम आहे. मुक्त व बंदिस्‍त अशीच त्याची रचना आहे. पावसाळा वगळता वर्षातील इतर महिने जनावरे मुक्त गोठ्यातच असतात. यामुळे जनावरांच्या स्वच्छतेचे काम कमी होते. मोकळ्या वातावरणात असल्याने त्यांचे आरोग्यही चांगले राहते.

...असे होते व्यवस्थापन

सकाळी सहा वाजता गोठ्यास जाग येते. गजानन, त्यांची पत्नी सविता, संदीप, त्यांची पत्नी मनीषा व आनंदा व त्‍यांची पत्नी ममता सकाळी सहा वाजता गोठ्यात दाखल होतात. एकमेकांच्या चर्चेतून गोठ्याची स्वच्छता, पाणी, चारा, पशुखाद्य आदींचे नियोजन होते. तीन ‘मिल्किंग मशिन्स’च्या साह्याने धारा काढण्यात येतात.

दूध कॅनमध्ये भरल्यानंतर सकाळच्या सत्रातील गोठ्याचे कामकाज संपते. दुपारी चारपासून दुसऱ्या सत्रातील कामांना सुरुवात होते. दोन मजूरही गोठा व्यवस्‍थापनासाठी ठेवले आहेत. गरजेनुसार चारा कापणी व अन्‍य कामे त्यांच्यामार्फत होतात. महिला सदस्यांनी घरातील कामे व गोठा व्यवस्‍थापन यामध्ये चांगल्या प्रकारे ताळमेळ ठेवल्याने कोणत्याही कामास विलंब होत नाही.

Cow Shed
Dairy Farm Success Story : दुग्ध व्यवसायाच्या मार्गावर तांबिले कुटुंबाचा संघर्ष आणि विजय!

खाद्य व आरोग्य व्यवस्थापन

जनावरांना प्रथिनयुक्त चारा देण्याचा प्रयत्न असतो. त्याचा प्रमुख भर सुपर नेपियर गवत व कडबा कुट्टीवर ठेवण्यात आला आहे. स्थानिक ठिकाणाहून ज्वारीचा कडबा विकत घेऊन त्याची कुट्टी करण्यात येते. गवत व कुट्टी एकत्र करून जनावरांना देण्‍यात येते. या भागात उसाचे क्षेत्र असले तरी त्याचे वाडे चारा म्हणून टाळण्याचा कुटुंबाचा प्रयत्न असतो.

दररोज गवताचे २० मोठे भारे आणले जातात.दुधाळ जनावरांसाठी एका वेळेला पाच ते सहा किलो पशुखाद्य, मका भरडा देण्यात येतो. गाभण गायी व वासरांसाठी गोकूळ दूध संघाकडील खाद्याचा वापर होतो.

जिल्हा परिषद व दूध संघाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्व लसी गायींना देण्यात येतात. खाद्यामध्ये प्रमाणानुसार ‘मिनरल मिक्शर’चे मिश्रण करून जनावरांची प्रतिकारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जनावरांची मरतुक कमी होऊन तोटा होत नसल्याचा अनुभव आहे.

Cow Shed
Dairy Farming: गायी, म्हशींची ‘डीएनए’ चाचणी वरदान ठरणार

उन्हाळ्यात दुधाचे दैनंदिन संकलन ४०० ते ५०० लिटरपर्यंत असते. पावसाळ्यात हेच प्रमाण ५०० लिटरच्या आसपास जाते. खर्च वजा जाता महिन्याला चाळीस टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. याशिवाय वर्षाला सुमारे साठ ट्रॉली शेणखत मिळते. बहुतांशी शेणखत स्वतःच्या शेतात वापरले जाते. उर्वरित खताची शेतकऱ्यांना विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायातून कुटुंबाच्या अर्थकारणास गती मिळाली आहे.

मिळालेल्या नफ्यातील उत्पन्न गोठ्यातील कामांसाठीही उपयोगात येते. कर्ज घेऊन काही जनावरे खरेदी करावी लागली. व्यवसायातील उत्पन्नातून त्याची कर्जफेड करणे शक्य झाले आहे. उसाचे एकूण लागवड क्षेत्रातून दोनशे टनांपर्यंत उत्पादन मिळते. लहान मुलांसह तेरा जणांचे कुटुंब शेतीसह गोठा व्यवसायातून सुखी समाधानी जीवन जगते आहे.

पुरस्कारांनी सन्मान

पाटील कुटुंबीयांच्या गोठ्यात अनेक चांगल्या दुधाळ गायी तसेच एका वेळेस सात ते पंधरा लिटरपर्यंत दूध देणाऱ्या गायी आहेत. काही गायी दिवसाला ३२ ते ३३ लिटरपर्यंत दूध देतात. त्यामुळे दैनंदिन दूघ संकलनाची सरासरी वर्षभर कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. दुधाचे फॅट ४ तर एसएनएफ ९ पर्यंत असते.

एकूण व्यवस्थापन व गायींची दूध उत्पादनक्षमता वाढविण्याच्या कार्याबद्दल एकदा नव्हे तर तब्बल तीन वेळा सर्वोत्कृष्ट दूध उत्पादनाचा गोकूळ दूध संघाचा पुरस्कार पाटील यांनी पटकाविला आहे. वासरांची काळजी घेत चांगल्‍या गायी तयार केल्या. सध्या पन्नास गाईंपैकी १० ते१५ गायी गोठ्यात तयार झालेल्या आहेत. कोणाकडे चांगल्या गायी असल्यास गरजेनुसार त्याही विकत घेतल्या जातात.

संदीप पाटील ९९२३१३३६९८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com