Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Management : अचूक हवामान सल्ल्यामुळे पीक व्यवस्थापन होतेय काटेकोर

Article by Manik Rasve : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अखिल भारतीय समन्वित हवामान संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. त्यामुळे आपल्या स्थानिक हवामानुसार शेतकऱ्यांना काटेकोर पीक व्यवस्थापन करून जोडीला पूरक, प्रक्रिया व्यवसायातूनही यशस्वी उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

माणिक रासवे

माणिक रासवे

VNMK Weather Research Project : परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एक एप्रिल, १९९३ पासून अखिल भारतीय समन्वित हवामान संशोधन प्रकल्प सुरु झाला. त्या अंतर्गत मध्यवर्ती वेधशाळा आहे. त्यात सूक्ष्म हवामान निरीक्षणे घेण्यासाठी स्वयंचलित हवामान केंद्रासह विविध उपकरणे आहेत. त्यायोगे तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग, जमिनीचे तापमान, दव, बाष्पीभवन, वाऱ्याची दिशा आदी हवामान घटकांची नोंद दररोज सकाळी व दुपारी घेण्यात येते.

या सर्व नोंदीचा उपयोग विविध पिकांवरील संशोधनासाठी होतो. त्या अनुषंगाने खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस, तूर रब्बी हंगामात ज्वारी व हरभरा आदी पिकांची प्रात्यक्षिके घेतली जातात. कुलगुरू डॉ. इंद्र मणी, संशोधन संचालक डॉ.जगदीश जहागीरदार यांचे मार्गदर्शन विभागाला मिळते. कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे या विभागाचे प्रमुख आहेत. तर विभागात संशोधन सहाय्यक यादव कदम, प्रमोद शिंदे, रामकृष्ण माने, दत्ता बोबडे, क्षेत्रीय सहायक ए. आर. शेख आदी कार्यरत आहेत.

निक्रा प्रकल्प

हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू कृषी संशोधन संस्था (क्रीडा) अंतर्गत ‘नॅशनल इनोव्हेटिव्ह क्लायमेट रेसिलन्ट ॲग्रिकल्चर अर्थात निक्रा प्रकल्प देशपातळीवर कार्यरत आहे. परभणी येथील या हवामान संशोधन प्रकल्पातर्फेही २०११ पासून तो राबविला जात आहे. यात विभागातील गावे दत्तक घेऊन तेथील २० ते ४० शेतकऱ्यांची त्याअंतर्गत निवड केली जाते. त्यांच्यासह अन्य गावांमधील शेतकऱ्यांना हवामान आधारित कृषी सल्ला देण्यात येतो.

पहिल्या टप्यात २०११ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत हा प्रकल्प शेकटा व शेरेगाव (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे राबविला गेला. यात पीक व्यवस्थापन, डाळ मिल, शेळी व कुक्कुटपालन, शेततळे निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या दुसऱ्या टप्प्यात परभणी तालुक्यातील गावांचा समावेश होता. एप्रिल २०२१ पासून परभणी जिल्ह्यातील दामपुरी व इटलापूर गावांमध्ये तिसरा टप्पा राबविला जात आहे.

या गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. तेथील पर्जन्याच्या नोंदीनुसार आठवड्यातून दोन वेळा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतावर जाऊन निरीक्षणे घेऊन पीक व्यवस्थापन सल्ला देतात. त्यातून शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक गरजांवर आधारित काटेकोर पीक व्यवस्थापन करणे शक्य होऊन उत्पादन व उत्पन्न वाढवणे शक्य झाले आहे. दामपुरी (ता.परभणी) येथील अशोक सालगोडे यांची यशकथा याच प्रकल्पाच्या मार्गदर्शनातून घडली आहे.

ग्रामीण कृषी हवामान सेवा प्रकल्प

भारतीय हवामान विभाग (आयएमडी) अंतर्गत १९९३ पासून ग्रामीण कृषी मौसम (हवामान) सेवा प्रकल्प परभणीच्या या हवामान संशोधन प्रकल्पात राबविला जात आहे. जिल्हा, तालुका स्तरावर शास्त्रीय पद्धतीने उपग्रहांकडून मिळणारी रिअल टाइम डाटा’ (आकडेवारी), छायाचित्रे आदी तपशील या माध्यमातून संकलित केला जातो.

त्यातून जमिनीतील ओलावा, पीक परिस्थिती व आरोग्य या अनुषंगाने माहिती व तिचे विश्‍लेषण केले जाते. त्या आधारे मराठवाड्यातील जिल्हे व त्यातील तालुक्यातील पीक स्थितीनुसार अचूक हवामान सल्ला दर मंगळवारी व शुक्रवारी देणे शक्य झाले आहे. यात कीड- रोग, पाणी व्यवस्थापनासह पशुधन, काढणी पश्‍चात, साठवणूक, रेशीम शेती अशी सल्ल्याची व्याप्ती आहे.

सर्व माध्यमांद्वारे सल्लाप्रसार

जिल्हा, तालुक्यांचे ‘व्हॉट्‍स ॲप ग्रुप्स’ तयार करून त्यामाध्यमातून कृषी हवामान पत्रिका प्रसारित केली जाते. फेसबुक, आकाशवाणी, विद्यापीठाचे संकेतस्थळ, ब्लॉग, यू-ट्यूब याद्वारेही त्याचा प्रसार केला जातो. गारपीट, अवकाळी पाऊस यांचेही ‘अलर्ट’ देण्यात येतात.

‘एम -किसान पोर्टल’ अंतर्गत मराठवाड्यातील सुमारे १२ लाख शेतकऱ्यांपर्यंत हा सल्ला पोहोचवला जात आहे. या सल्ल्यासंबंधी ‘फीडबॅक’ घेण्यात येतो. जेणे करून शेतकऱ्यांच्या समस्यांचे आकलन होते. याशिवाय दरवर्षी विविध गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांद्वारे हवामान साक्षरता वृद्धीचे प्रयत्न केले जातात.

धोरण निश्‍चितीसाठी फायदा

भारतीय हवामान विभागांतर्गत २०१० पासून ‘फसल’ प्रकल्प राबविला जात आहे. त्या अंतर्गत हवामान मॉडेल्सचा वापर करून मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस, तूर, ऊस, ज्वारी, हरभरा या मुख्य पिकांचा उत्पादन अंदाज काढला जातो. त्याचे निष्कर्ष केंद्र सरकारला शेतीमाल विषयक धोरणे निश्‍चित करण्यासाठी उपयोग पडतात. मॉन्सून मिशन अंतर्गत २०१८ ते २०२१ या कालावधीत काही गावांतील शेतकऱ्यांकडे पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली. त्यातून पावसाच्या नोंदी घेतल्या जात असून त्यावर आधारित गावस्तरावर सल्ला दिला जात आहे.

मागील वर्षी मराठवाड्यात प्रचंड पाऊस झाला. त्या वेळी केंद्राकडून उपग्रहाद्वारे संकलित केलेल्या माहितीचा उपयोग शासनाला शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यासाठी झाला. याच माहितीच्या आधारे सरकारने यासंबंधीचा अध्यादेशही जारी केला असे केंद्रप्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले.

पुरस्काराने सन्मान

सन २०१९ मध्ये ग्वाल्हेर येथील राजमाता विजयाराजे सिदिंया कृषी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत सर्वोत्कृष्ट केंद्र पुरस्काराने कृषी विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. सन २०२० मध्ये कृषी हवामान शास्त्रज्ञा संघटनेतर्फे दिल्ली येथे डॉ. कैलास डाखोरे यांना सर्वोत्कृष्ट तरुण शास्त्रज्ञ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सन २०२२ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठात (अमेरिका) त्यांनी प्रशिक्षणही पूर्ण केले आहे.

डॉ. कैलास डाखोरे : ९४०९५४८२०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT