Issue of Accidental Wildlife Deaths : अन्नामधून होणाऱ्या विषबाधेचे मृत्यू मनुष्य प्राण्यांना नवीन नाहीत. काळ बदलला, वैद्यकीय क्षेत्रात प्रगती झाली. माणसांना विशेषतः लहान मुलांना अन्नातून झालेल्या विषबाधेस त्वरित उपचार उपलब्ध होतात म्हणून मृत्यू सहज टाळले जातात पण प्राण्यांचे तसे आहे काय? उत्तर नकारार्थी आहे. घटना २९, ३० आणि ३१ ऑक्टोबरची.
मध्य प्रदेशामधील तब्बल १५०० चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेल्या बांधवगड या राष्ट्रीय उद्यानात तब्बल १० हत्ती मरण पावले, त्यात त्यांची तीन लहान बाळे सुद्धा होती. निमित्त होते या हत्तींनी आदिवासी बांधवाच्या शेतामधील कोदो हे भरडधान्य प्रमाणाबाहेर खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. शवविच्छेदनामध्ये या दहाही हत्तींच्या पोटात मोठ्या प्रमाणात कोदो हे भरडधान्य त्याच्यावरील बुरशीजन्य रोगासह आढळले.
कित्येक तास त्यांना कसलीही वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे तडफडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वनखाते आणि मध्य प्रदेश राज्य प्रशासनसुद्धा जागे झाले. मुख्यमंत्र्यांनी यावर एक समिती नेमली, मुख्य वन अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, काहींना सेवामुक्त करण्यात आले, लोकसभेत येणाऱ्या अधिवेशनात यावर प्रश्न- उत्तरे होतीलही, पण यामुळे भविष्यात असे प्रसंग टाळता येणार का, यावर मंथन होणे गरजेचे आहे.
कारण मे २०२० मध्ये केरळ राज्यात एका गर्भार हत्तिणीला ती शेतात येऊन अननस खाते म्हणून त्या शेतमालकाने तिच्या मुखात स्फोटकाने भरलेले अननस देऊन त्याच स्फोट घडवून आणला आणि वेदनेने व्याकूळ होऊन त्या जिवाने नदीपात्रात जाऊन प्राण सोडले. त्या वेळी मुक्या वन्य जिवासंबंधीचा प्रश्न लोकसभेत उपस्थित झाला होता.
आपणास फक्त गहू, ज्वारी, मका, ऊस, तूर, हरभरा अशा मोजक्या पिकांचीच ओळख आहे कारण ही सर्व पिके मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतात आणि आपल्या देशाच्या अन्न सुरक्षिततेत त्यांचा बहुमोल वाटा आहे.
आजही आम्ही आदिवासींना गौण समजतो मग त्यांच्याकडे शेकडो प्रकारची पारंपरिक भाताची, भरडधान्याची, तृणधान्यांची वाणे आणि त्यांची श्रीमंती आहे याचा आपल्याशी काय संबंध. आज आपल्या आदिवासी भागात शेकडो बीजमाता या सर्व पारंपरिक वाणांचा संग्रह करतात. या अशा बहुमोल कार्यासाठीच राहिबाई पोपेरे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे.
कोदो म्हणजेच कोद्रा हे भरडधान्य मध्य प्रदेशामधील आदिवासी बांधव खरिपामध्ये मोठ्या प्रमाणावर लावतात. जेमतेम चार महिन्यांचे गवतासारखी पाने असलेले हे पीक चार फुटापर्यंत वाढते, त्याला लांब ओंब्या येतात, बाजरी, भगर सारखे त्याचे दाणे गोलाकार असून रंग पिवळसर तांबूस असतो.
भरडल्यानंतर त्याचे अन्नपदार्थ शरीरास अत्यंत पोषक तर असतातच पण ते मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग नियंत्रण, मायग्रेन यावर प्रभावी नैसर्गिक उपायसुद्धा आहे. यात तंतुमय भाग, खनिजे, जीवनसत्त्वे तर भरपूर असतात. वातावरण बदलास प्रभावीपणे सामोरे जाणारे, दुष्काळात सुद्धा निकृष्ट जमिनीवर हमखास उत्पादन देणारे हे पीक आहे.
मात्र काढणीच्या वेळी ओलावा असेल तर यावर ‘अॅस्परजिलस’ या बुरशीचा मोठा प्रादुर्भाव होतो, दाणे काळे, हिरवे होतात, त्यात अॅफलोटोक्सिनचे प्रमाण वाढते. वन्य प्राण्यांच्या आहारात हे थोडेफार आले तर प्राणी सावध होतात, पण भुकेपोटी त्यांच्या ते लक्षात आले नाही तर मोठ्या प्रमाणात ते पोटात जाते आणि वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही, तर मृत्यूस सामोरे जाण्याशिवाय प्राण्यांसमोर पर्यायच उरत नाही. बांधवगडमधील या मृत हत्तींच्या पोटात तब्बल पाच किलो हे बुरशीजन्य कोदो मिळाले म्हणूनच हे मृत्यू झाले.
कोदो हे भरडधान्य ‘अरगॉट’ या बुरशीने सुद्धा प्रभावित होते. या बुरशीच्या काळ्या लेंड्या विषारी असतात. हत्तींच्या मृत्यूचे हे एक कारण असू शकते. शास्त्रज्ञांना असे आढळले आहे, की बुरशी प्रभावित कोदो धान्यात साक्लोपायझोनिक अॅसिड म्हणजे सीपीओ (Cyclopiazonic Acid) मोठ्या प्रमाणात तयार होते.
ज्यामुळे प्राण्यांना विषबाधा होऊ शकते. मध्य प्रदेशमधील झाबुवा या आदिवासी जिल्ह्यात मला कोदो शेती जवळून पाहताना त्याची गरम ताजी भाकरी खाण्यास मिळाली. काढणीच्या वेळी पाऊस पडला तर कोदो बुरशीग्रस्त होते म्हणून येथील आदिवासी बांधव त्याला झाकून ठेवतात. पावसात भिजलेला कोदो येथील आदिवासी खात नाहीत.
उलट शेतात तसेच सोडून देतात. कोदो या भरडधान्याचे मध्य प्रदेश हे माहेरघर असले तरी ते छत्तीसगड, तमिळनाडू, कर्नाटक आणि आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पिकवितात. बांधवगडमधील कोदो विषबाधेतून आपण काय बोध घ्यावा? यावर मंथन होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाज आहे जो भात, वरई, नाचणी बरोबरच इतर अनेक भरडधान्यांची खरिपामध्ये शेती करतो. अशी शेती मी नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाहिली आहे. कोदोचे पोटापुरते पीक या भागात पारंपरिक पद्धतीने अनेक शेतकरी घेतात.
त्याचबरोबर अनेक आदिवासी स्त्रियांच्या बीज बँकेत ते उपलब्ध आहे. आदिवासी शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे बऱ्यापैकी कृषी सेवा उपलब्ध असली, तरी अति दुर्गम भागापर्यंत ती मिळेलच असे नव्हे. बांधवगडमधील दहा हत्तीच्या मृत्यूमुळे कोदो या भरडधान्यातील बुरशीचा प्रभाव प्रसारमाध्यमामुळे सर्वांच्या लक्षात आला आहे. कृषी विभागाने आदिवासी बहुल पट्ट्यातील कोदो उत्पादनाची पाहणी त्वरित करावी.
मॉन्सूनच्या परतीच्या पावसाने या वर्षी मोठाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काढणीच्या वेळी कोदो हे पीक बुरशीने प्रभावित झाले असणार आहे. बुरशीजन्य कोदो खाण्यात येऊ नये यासाठी आदिवासी बांधवांनी देखील काळजी घ्यावयास हवी. अनेक वेळा ती घेतली जाते सुद्धा, तरीही काढलेले धान्य योग्य पद्धतीने वाळवून साठवून ठेवावे, खराब झाले असेल तर जनावरांना, कोंबड्यांना, बकऱ्यांना खाऊ घालू नये, उभे खराब झालेले पीक शेतात तसेच ठेवू नये, गोळा करून जाळून टाकावे.
शासनाने त्यांना त्याची योग्य नुकसान भरपाई द्यावी. दुर्गम डोंगराळ भागात बुरशीजन्य रोग प्रतिबंधक कोदो वाणांचा जास्त प्रसार व्हावयास हवा. कोदो हे अतिशय पौष्टिक सुपर फूड असलेले भरडधान्य आहे हे आपणच आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष - २०२३ मधून अवघ्या जगाला पटवून दिले आहे.
याला श्रीअन्न असेही म्हणतात. आपला देश कोदो उत्पादनात जगात प्रथम स्थानावर आहे. हे भरडधान्य अतिशय शुद्ध रूपातच आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. जेवढी काळजी आपण आपल्या आहाराची घेतो तेवढीच आपण आपल्या आदिवासी बांधवांची, त्यांच्या पशूधनाची सुद्धा घेणे आवश्यक आहे. दहा हत्तींचा मृत्यू हा आपणासाठी योग्य संदेश ठरावा, हीच अपेक्षा!
(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.