Latur News : ‘महावितरण’ने वीज जोडणी कायमस्वरूपी तोडलेल्या थकबाकीदारांसाठी सुरू केलेल्या अभय योजनेला प्रतिसाद मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील २ हजार ७२१ वीज ग्राहकांनी २ कोटी १६ लाख रुपयांची थकबाकी भरून वीज जोडणी पूर्ववत करण्यात आलेली आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात सवलत मिळत असल्याने योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘महावितरण’च्या वतीने करण्यात आले आहे.
अभय योजना ही ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
जिल्ह्यातील लातूर विभागातील ६३९ वीज ग्राहकांनी ६३ लाख ४५ हजार रुपयांचा भरणा करून योजनेचा लाभ घेतला आहे. तर, उदगीर विभागातील ९१७ वीज ग्राहकांनी ६५ लाख ३७ हजार रुपयांचा भरणा करून योजनेत सहभाग नोंदवला आहे. अभय योजनेला सर्वाधिक पसंती निलंगा विभागात मिळाली असून १ हजार १६३ वीज ग्राहकांनी ८४ लाख ५० हजार रुपयांचा भरणा करून वीज पुनर्जोडणी करून घेतली आहे.
उच्चदाब वर्गवारीतील २ ग्राहकांनी २ लाख ६९ हजारांचा भरणा केला आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येणार आहे.
वीज बिलाचा वाद न्याय प्रविष्ट असलेल्या पीडी ग्राहकांनाही या योजनेचा काही अटी व शर्तीवर लाभ घेता येईल. मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलतही या योजनेतील ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल.
...येथे संपर्क साधा
संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात.
योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.