Sahyadri Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Life : एक दिवस बळीराजासोबत...

राज्य सरकारकडून सध्या गावागावांत ‘बळीराजासोबत एक दिवस’ असा राबवला जात आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी शेतशिवारात जावे व त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा हेतू या उपक्रमामागे आहे. मात्र अनेक गावांमध्ये अधिकारी पोहोचलेलेच नाहीत.

मनोज कापडे

पुणे जिल्ह्यातील वेल्हे (Welhe) तालुक्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले विंझर गाव दुधाची पंढरी म्हणून ओळखले जाते. शेतकऱ्यांना (FArmer) दुधाचा उत्तम जोडधंदा मिळवून देत समृद्धीकडे नेणारी फडके डेअरी याच गावाची. गावातील भोसले कुटुंबीयांनी दुधाच्या जोडधंद्यात झोकून काम केले आहे. याच गावातील धनगरवस्तीनेही दूध संकलनाला हातभार लावला आहे.

या भागातूनच पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक (कात्रज) संघासाठी दूध संकलित केले जाते. त्यात धनगरवस्तीमधील कचरे कुटुंबाचाही सहभाग असतो. याच धनगरवस्तीमधील मालू कोंडिबा कचरे या ५० वर्षीय शेतकऱ्याकडे मी दिवसभर थांबलो. दूध उत्पादकाला रोज किती कष्ट आणि संघर्षमय स्थितीचा सामना करावा लागतो याचा धांडोळा घेतला.

विंझर गावापासून धनगरवस्ती दीड-दोन किलोमीटर लांब आहे. वस्तीतल्या एका गल्लीत शेतकरी मालू कचरे याचे छोटेसे घर आहे. मात्र दुभती जनावरे बांधण्यासाठी गल्लीत जागा नाही. त्यामुळे जनावरांना डोंगरावर ठेवावे लागते. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगेतून एक उपरांग विंझरच्या दिशेने उतरते. याच रांगेत एक दीड तास उंच चालून गेल्यानंतर मालू कचरे आपल्या दुभत्या जनावरांच्या गोठ्यात पोहोचतात. पर्वतरांगेमध्ये सध्या भरपूर गवत असल्यामुळे जनावरांना थंडीगारठ्यात डोंगरावरच ठेवावे लागते. स्वतः मालू कचरे व त्याची पत्नी प्रियंका कचरे दोघेही जनावरांबरोबर गोठ्यात झोपतात.

पहाटे चार वाजता

दिवसभर जनावरांमागे हिंडून मालू थकलेला असतो. तर १५० ते २०० पेंढ्या गवत कापून मानपाठ एक झालेली प्रियंकादेखील गाढ झोपलेली असते. मात्र दोघांनाही गोठ्यातील गायी हंबरण्याने जाग येते. पहाट झाल्याने त्यांना धन्याला उठवायचे असते. कारण धारा काढायच्या असतात. डोंगरावर सोसाट्याचा गार वारा हाडांमध्ये सुया टोचाव्यात तसा अंगाखाद्याला छळत असतो. तरीही दोघांना उठावे लागते.

गोठ्यात चार गायी, तीन म्हशी असतात. त्यांचं शेणमूत काढण्यासाठी मालू आणि प्रियंका सरसावतात. चहापाणी न घेताच दोघेही जनावरांना मायेने हाका मारतात आणि बाजूला करीत अलगद शेण काढू लागतात. प्रियंका गोठा झाडून स्वच्छ करते आणि मालू आता भुसा, सरकी, गोळीपेंड अशा पशुखाद्यांच्या पाट्या भरू लागतो.

दोघे जण धारा काढायला बसतात. धारा काढणे कष्टाचं आणि कसब असलेले काम असूनही प्रियंका कुठेही कमी पडत नाही. दोघे १५ लिटरच्या दोन किटल्यांमध्ये दूध गोळा करतात. त्यानंतर ते डोक्यावर किटल्या घेऊन भला मोठा डोंगर उतरत गावाकडे चालू लागतात. तीन-चार किलोमीटर पायी चालत डोक्यावर भल्या मोठ्या किटल्यांचे ओझे सांभाळत गावातील हानाजी भोसले यांच्या दूध डेअरीवर दूध आणले जाते.

सकाळी आठ वाजता

डेअरीत दूध घालून थकलेले मालू व प्रियंका पुन्हा वस्तीवर येतात आणि किटल्या धुण्याचे काम करतात. एक वेळ देव्हाऱ्यातील देव धुतले जाणार नाहीत; मात्र किटल्या काळजीपूर्वक व अतिस्वच्छ धुतल्या जातात. कारण नाही तर सारे दूध नासण्याची भीती असते. या दूध उत्पादक दांपत्याची अकरावीत शिकणारी रंजना सकाळपासूनच आई-बाबांची वाट बघत असते.

ती सकाळचा नाश्‍ता तयार करून ठेवते. दूधधंद्यावर कचरे कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. त्यामुळे त्याचा दहावी शिकलेल्या अशोक नावाच्या मुलाने हॉटेलमध्ये नोकरी पत्करली आहे. तर दुसरा मुलगा राजीव अकरावीत शिकतो आणि आईवडिलांना दुधाच्या कामात सकाळ, संध्याकाळ मदत करतो.

सकाळी ९ वाजता

प्रियंका भराभर घरातील कामे आटोपते. भाजीभाकरी तयार करते. मालू आपला दुधाचा हिशेब तपासतो. दोघे जण मुलांची विचारपूस करतात. पुन्हा डोक्यावर जनावरांचं आंबवण घेतात आणि वस्तीकडून डोंगरावरील गोठ्याकडे जायला निघतात. कारण दुपारी बाराच्या आत डोंगरावरील रानातून गवत कापून आणि डोंगरातील घळीत जनावरांना पाणी पाजून आणायचे असते.

दोन किलोमीटरची पायपीट करून मालू आणि प्रियंका पुन्हा डोंगरावरील गोठ्यात येतात. हातात विळे घेऊन रानातल्या गवताळ भागात येतात. गवतातील साप, विंचू, काटेकुटे, दरी याचा विचार न करता दोघे जण भराभर गवत कापू लागतात. या वेळी हात कापतो. काटे रुततात. पण दुखऱ्या शरिराकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे असतो? कापलेल्या गवताच्या भराभर पेंढ्या बांधल्या जातात. दोघेही या पेंढ्यांचे भारे डोक्यावर टाकतात आणि डोंगरधारेतून गोठ्याकडे आणतात.

दुपारी १२ वाजता

गोठ्यातील जनावरे सोडली जातात. डोंगरातील विहिरीवर जनावरांना पाणी पाजून आणले जाते. रानातल्या माश्या जनावरांना खूप त्रास देतात. दुभती असल्याने तसेच लम्पी स्कीन रोगाची भीती असल्यामुळे जनावरे धुवावी लागतात. डोंगरातील घळीतून वाहणाऱ्या ओढ्यावर त्यासाठी मालूने एक डोह तयार केला आहे. तेथे जनावरे धुतली जातात. म्हशी भरदुपारी आनंदाने डुंबतात. म्हशी धुतल्यानंतर गोठ्यात येताच प्रियंका त्यांना कीटकनाशकाची पावडर चोळते.

दुपारी २ वाजता

दुभती जनावरे बांधून ठेवली जातात व इतर जनावरांना रानात मोकळं चरण्यासाठी सोडून दिली जातात. प्रियंका गोठ्यातील एका बाजूला असलेली चूल पेटवते व त्यावर भाजीभाकरी तयार करते. दोघेही जेवतात आणि पुन्हा रोजच्या जगण्यातील समस्या आणि उपायांवर चर्चा होते.

दुपारी ३ वाजता

जंगलात सोडलेली जनावरे पुन्हा वळवून आणण्यासाठी मालू जनावरांचा माग काढत रानात निघून जातो. प्रियंका पुन्हा गोठा साफ करू लागते. ती आता कडबा कुट्टी तयार करते. कुट्टी तयार करण्यासाठी डोंगरावर यंत्र नाही आणि वीजदेखील नाही. त्यामुळे विळ्यानेच कष्टपूर्वक कुट्टी तयार करावी लागते. जंगलातून जनावरे येताच धारा काढण्याची तयारी आता सुरू होते. जनावरांसाठी ती सरकी, गोळी पेंड याच्या पाट्या भरून ठेवते.

दुपारी चार वाजता

डोंगरधारेतील जंगलात फिरून मालू सारी जनावरे शोधतो. पाण्यावर नेतो. त्यांना पाणी पाजतो आणि काहींना धुतो. जनावरे गोठ्यात आल्यानंतर छोटी पाडसं, कालवडी, खोंड उड्या मारू लागतात. गायी, म्हशी आपापल्या मुलांना मायेने चाटू लागतात. आता मालू आणि प्रियंका पुन्हा धारा काढू लागतात.

संध्याकाळी सहा वाजता

जनावरांच्या धारा काढून पुन्हा दुधाच्या किटल्या तयार ठेवल्या जातात. दोघे जण पुन्हा गोठ्याची आणि आजूबाजूची आवरासावर करतात. मांजरीला दूध देतात. गोठ्याला कारवीच्या काड्यांचे फाटक लावतात. डोक्यावर चुंबळ रचून त्यावर दुधाच्या किटल्या ठेवतात आणि पुन्हा डोंगरावरून तास भर लांब असलेल्या गावाकडे नजर टाकतात. एव्हाना अंधार झालेला असतो.

संध्याकाळी सात वाजता

डोंगरधारेने भल्या मोठ्या किटल्या घेऊन उतरताना मालू आणि प्रियंकाचे सर्व कसब पणाला लागते. मोठे दगडधोंडे, नाले, खड्डे ते सरसर पार करीत असतात. किटलीच्या वजनाने डोके खूप दुखते. चालून चालून गुढघ्यावर ताण पडतो; पण दोघांना डोक्यावरचे शुद्ध दूध गावातल्या डेअरीवर पोहोचवायचे असते. भयाण अंधारात पायपीट करीत एकदाचे दोघे जण गावात येतात. डेअरीवर दूध पोहोचवतात.

रात्री दहा वाजता

डेअरीतून दूध पोहोचवून आल्यानंतर प्रियंकाला पुन्हा घरकाम करावे लागते. मुलामुलांच्या समस्या आणि इतर विषयांवर कुटुंबात चर्चा होते. सारे कुटुंब एकत्र भाजीभाकरी खाते. “शिकून काही होणार नाही. आता कुठतरी नोकरी पकड..” असा सल्ला मालू आपल्या अकरावीत शिकणाऱ्या मुलाला देतो. प्रियंकालाही मुलगी रंजनाची सतत काळजी असते.

पहिली मुलगी रेश्माचं लग्न जुळून संसार चांगला चालू असतो. तसाच छान संसार रंजनाचा फुलावा, असं प्रियंकाला वाटते. घरातील सुखदुःखाच्या गप्पा मध्येच संपवून आता मालू आणि प्रियंका पुन्हा डोंगराकडे जायला निघतात. डोक्यावर दहा किलोचे पशुखाद्य आणि रिकाम्या किटल्या असतात. मुलांना आतून घराचे दार काळजीपूर्वक लावायला सांगून प्रियंका आणि मालू आता भयाण अंधारात पुन्हा डोंगरधार चढू लागतात...

दूध उत्पादनासाठी डोंगराभोवती चोवीस तास जखडून पडलेल्या या कष्टकरी ‘बळीराजासोबतचा माझा एक दिवस’ अशा प्रकारे संपला.

(लेखक ‘ॲग्रोवन’चे

उपमुख्य बातमीदार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT