Poultry farming Agrowon
ॲग्रो विशेष

Poultry Farming : अंडी विक्रीसाठी तयार केला ब्रॅण्ड

बोरीपार्धी (ता.दौंड,जि.पुणे) येथील प्रवीण आणि प्रदीप पांडुरंग सोडनवर बंधूंनी सहा वर्षांपूर्वी शेतीला पूरक उद्योग म्हणून लेअर पोल्ट्री फार्म सुरू केला. कोंबडी व्यवस्थापनामध्ये सुधारित तंत्रज्ञानाचा वापर तसेच अंडी विक्रीसाठी स्वतःची यंत्रणा तयार केली.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

कुक्कुटपालन (Poultry Farming) हा परिसरातील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन विस्तारत जाणारा व्यवसाय (Business). पंचक्रोशीतील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन बोरीपार्धी (ता.दौंड,जि.पुणे) प्रवीण आणि प्रदीप पांडुरंग सोडनवर या बंधूंनी सहा वर्षांपूर्वी अंडी विक्रीसाठी लेअर पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.

त्यांची वडिलोपार्जित साडे तीन एकर शेती आहे. त्यासोबत महा-ई सेवा केंद्र आणि वॉशिंग सेंटर असे व्यवसाय सुरू होते. परंतु त्यातून फारसे आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी लेअर पोल्ट्री फार्म उभारण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला सोडनवर बंधूंनी ब्रॉयलर आणि लेअर अशा दोन्ही प्रकारच्या कुक्कटपालनाची तज्ज्ञ तसेच व्यावसायिकांच्याकडून माहिती घेतली.

परिसरातील बाजारपेठ, खर्च, व्यवस्थापन आदी बाबी लक्षात घेऊन लेअर पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. हा व्यवसाय सुरू करताना आर्थिक अडचणी आल्या. परंतु नातेवाईक, मित्र मंडळी यांच्या सहकार्याने जवळपास १५ लाख रुपयांची तजवीज केली. परंतु खर्च अधिक आल्याने गावपरिसरातील खासगी पतसंस्थेकडून ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले.

लेअर पोल्ट्री फार्मची उभारणी

सोडनवर बंधूंनी स्वत:जवळ असलेल्या रकमेतून शेड उभारणीस सुरवात केली. एकूण ४५ फूट बाय १०० फूट आकारमानाच्या शेडचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्यात सुमारे सहा हजार लेअर कोंबड्या बसतील अशी व्यवस्था केली. त्यानंतर चांगला जम बसल्यानंतर तीन वर्षानंतर ४५ फूट बाय २२० फूट आकारमानाच्या दुसऱ्या शेडमध्ये कॅलिफोर्निया डिझाईन प्रमाणे लेअर फार्मची उभारणी केली.

सध्या दोन्ही शेड मिळून १९ हजार कोंबड्यांच्या संगोपनाची क्षमता आहे. पहिल्यांदा १८ आठवड्यांपर्यंत वाढीच्या टप्यात कोंबड्यांचे चांगले संगोपन करावे लागते. या कालावधीत लसीकरण, खाद्य व्यवस्थापनावर बारीक लक्ष ठेवले जाते. साधारणपणे १८ आठवड्यांपासून कोंबड्या अंडी देण्यास सुरवात करतात. सुरवातीच्या काळात अंडी लहान असल्याने दरही कमी असतो.

परंतु पंचविसाव्या आठवड्यापासून अंड्यांचा आकार चांगला मिळत जातो. त्यामुळे दरात वाढ मिळते. साधारणपणे लेअर कोंबड्या ९० आठवड्यांपर्यंत अंडी देतात. लेअर पोल्ट्री फार्म उभारणी तसेच व्यवस्थापनासाठी सोडनवर बंधूंना डॉ. संभाजी जगताप यांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच त्यांनी कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेअंतर्गत विविध अभ्यासदौरे केले. शेतकरी प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून देखील तांत्रिक माहिती मिळविली.यासाठी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांचे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना मिळत आहे.

- प्रदिप सोडनवर ९८६००३८७७२

स्वतःची विक्री व्यवस्था

सुरवातीला सोडनवर बंधूंनी अंडी विक्रीसाठी परिसरातील विक्रेत्यांसोबत करार केला. परंतु कोविड काळात विक्रेत्यांनी सहकार्य न केल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले. यावर मात करण्यासाठी त्यांनी स्वतः अंडी विक्री करण्याचे ठरवले. कोविडनंतर बाजारपेठेत अंड्यांची मागणी वाढल्याने अपेक्षित दर मिळू लागला.

यातून काही प्रमाणात नुकसान भरून निघण्यास मदत झाली. परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन दोन दुकाने सुरू केली. तसेच एक गाडी घेऊन परिसरातील आठ गावांमध्ये जाऊन स्वतः अंडी पोहोचविण्यास सुरवात केली. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. आज दिवसाला १२ हजार अंड्यांची विक्री ते स्वतः करत आहेत. अंडी विक्रीसाठी ‘उदय पोल्ट्री फार्म‘ हा ब्रँड बनविला आहे.

प्रवीण यांच्याकडे मजूर व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. प्रदिप यांच्याकडे कोंबड्यांचे आरोग्य तसेच अंडी विक्रीची जबाबदारी आहे. दररोज अंड्यांचे दर बदलत असतात. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार कमीअधिक दराने अंडी विक्री करावी लागते. साधारणपणे सध्या प्रति नग ३ ते ६ रुपयांपर्यंत दर मिळतो.

यामध्ये सतत चढउतार होतात. पोल्ट्री व्यवसायातून दरमहा १५ लाखांची उलाढाल होते. त्यामध्ये दैनंदिन व्यवस्थापन, वाहतूक, खाद्य, मजूर, वीज बिल असा खर्च होतो. सध्या खर्च वजा जाता दीड लाख रुपये नफा मिळतो. बँक कर्ज परतफेड व्यवस्थित करता आल्याने समाधान वाटत आहे, असे प्रदीप सोडनवर सांगतात.

कोंबड्यांचे व्यवस्थापन

सुरवातीचे दोन महिने कंपनीचे कोंबडी खाद्य वापरले. त्यानंतर तज्ज्ञांच्या सल्याने स्वतः कोंबडी खाद्य निर्मितीला सुरवात केली.यासाठी आधुनिक यंत्रणा विकत घेतली. यामुळे प्रति किलोमागे एक ते दीड रुपयांची बचत झाली.

पहिल्यांदा कोंबड्यांना मजुरांकडून खाद्य दिले जायचे. यासाठी दोन तास वेळ जायचा. तसेच कोंबड्यांना पुरेसे खाद्य मिळत नव्हते. हे लक्षात घेऊन कोंबड्यांना खाद्य देण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली. यामुळे आठ ते दहा मिनिटात सर्व कोंबड्यांना पुरेसे खाद्य दिले जाते.यातून वेळ आणि मजूर बचत झाली.

कोंबड्यांना कूपनलिकेचे पाणी दिले जाते. या पाण्यातील घटकांची तपासणी करून कोंबड्यांना योग्य गुणवत्तेच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यासाठी शेडमध्ये स्वतंत्र तीन टाक्या बसविलेल्या आहेत. स्वयंचलित निप्पल सिस्टम पद्धतीने कोंबड्यांना जागेवरच पाणी पिण्याची सोय उपलब्ध आहे.

सुरवातीच्या काळात अंड्याचे उत्पादन कमी होते. परंतु हळूहळू त्यात वाढ झाली. सध्या दोन्ही शेड मिळून दैनंदिन १८,००० अंड्यांचे उत्पादन होते.

कोंबडी खत चांगल्या प्रतीचे मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी आहे. खत विक्रीतून वर्षभरात सहा लाख रुपयांची उलाढाल होते.\

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT