Sri Lanka Organic Farming : श्रीलंकेचा धडा सर्वांसाठीच...

वातावरण बदलावर सेंद्रिय शेती हाच प्रभावी उपाय असला, तरी त्याचा विनानियोजन अतिरेकही किती धोक्याचा आहे. हेच श्रीलंकेच्या उदाहरणावरून दिसून येते. कोणत्याही निर्णयामागे भल्याबुऱ्याची जाण आणि एक तपश्‍चर्या असावी लागते. भूतान, सिक्कीम यांचे अनुकरण करताना त्यांची मोठी तपश्‍चर्या जाणूनच नियोजनपूर्वकच पावले उचलली पाहिजेत. हाच धडा सर्वांसाठी आहे.
Sri Lank Organic Farming
Sri Lank Organic FarmingAgrowon

भारताच्या दक्षिण टोकाकडील हिंदी महासागरातील श्रीलंका हे राष्ट्र. जेमतेम २.२ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला हिंदी महासागर, बंगालचा उपसागर (Bay Of Bengal) आणि अरबी समुद्र (Arabian Sea) या तीन महासागरांचा वेढा. हे बेट भारताबरोबर ‘गल्फ ऑफ मन्नार’ आणि ‘पाल्क स्ट्रेट’ या दोन निमुळत्या समुद्रधुनीने जेमतेम पाच मीटर खोल समुद्री प्रवाहाने जोडलेले आहे. सध्याच्या वातावरण बदलाच्या (Climate Change) प्रभावाखाली या देशात सुरू असलेल्या उलथापालथीमध्ये याच दोन चिंचोळ्या जल मार्गाने श्रीलंकेमधील लोकांचे भारतामधील दक्षिण भागाकडे स्थलांतर होऊ शकते.

भारत आणि मालदिव हे या राष्ट्राचे दोन सख्खे शेजारी. या राष्ट्राची भौगोलिक स्थिती वातावरण बदलास अतिशय पोषक आहे. ६५६१० चौ.किमी क्षेत्र असलेल्या या देशाच्या मध्य भागात १००० ते २५०० मीटर उंचीच्या पर्वतीय रांगा आहेत. अनेक दऱ्या, खोरी, पठारे यांनी समृद्ध असलेल्या या भूभागातून १०३ नद्यांचा उगम होऊन देशाच्या चारही बाजूंनी रेडियल पद्धतीने वाहत समुद्रास मिळतात. या नद्यांमुळेच श्रीलंका आज ४५ खाड्या आणि तेथील खारफुटीने समृद्ध आहे. या मध्य भागातील पर्वतीय रांगांचा व काही टेकड्यांचा अपवाद वगळता उरलेला श्रीलंका चारही बाजूंनी सपाट आहे.

Sri Lank Organic Farming
Organic farming: केंद्र सरकार १४ दशलक्ष हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणणार

समुद्र सपाटीपासून या भागाची उंची अंदाजे ३० मीटर आणि पुढे २०० मीटरपर्यंत आहे. थोडक्यात, बशी पालथी ठेवल्याप्रमाणे भौगोलिक स्थिती आहे. याचा परिणाम वाऱ्यांची दिशा, दक्षिण- पश्‍चिम मॉन्सून, उत्तरपूर्व मॉन्सून व त्या बरोबर पडणारा पाऊस, तापमान आणि आर्द्रता यावर सातत्याने होतो. या देशाचा दक्षिणपूर्व आणि उत्तर- पश्‍चिम भाग दुष्काळी समजला जातो. येथील पावसाचे प्रमाण सरासरी ९०० मिमी आहे, तर उर्वरित भागात ५००० मिमीपर्यंत पाऊस पडतो. थोडक्यात, श्रीलंकेच्या पश्‍चिम भागात पाऊस भरपूर पडतो. मुबलक पावसामुळे या देशात ४० नैसर्गिक निळ्या पाण्याचे साठे (लगुन्स) आहेत.

चारही बाजूंनी या देशाचा समुद्र किनारा १५८५ किमी एवढा आहे. ७००० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले खारफुटीचे जंगल ही या देशाची खरी निसर्ग श्रीमंती आहे. उष्ण कटिबंधीय (Tropical) वातावरण असल्यामुळे येथे पावसाचे तीन ऋतू आढळतात. दक्षिण- पश्‍चिम मॉन्सून मे ते सप्टेंबर बरसतो, थोडी विश्रांती घेऊन पुन्हा ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये बरसतो, तर उत्तरपूर्व मॉन्सून डिसेंबर ते फेब्रुवारी या कालखंडात पडतो.

Sri Lank Organic Farming
Sri Lanka Organic: श्रीलंका इफ्कोकडून नॅनो युरिया खरेदी करणार

मात्र वातावरण बदलाच्या प्रभावाखाली या देशामधील चार, पाच दशकांपूर्वी नियमित पडणारा पाऊस आता विस्कळीत झाला आहे. त्याची उग्रताही वाढलेली आढळते. पावसाच्या या अनियमितपणामुळे येथील दुष्काळी पट्टा जास्त तापत असून, राष्ट्र उष्णतेच्या झळा अनुभवत आहे. मागील काही दशके नद्यांचे महापूर, मोठमोठी चक्रीवादळे, कडे कोसळणे, दुष्काळाची तीव्रता आणि समुद्राचे भूपृष्ठाकडे आक्रमण हे मुद्दे नित्याचेच झाले आहे.

२००३ मध्ये या देशात नद्यांना प्रचंड महापूर आले, अनेक दरडी कोसळल्या. त्यात ३६९ लोकांचा मृत्यू झाला आणि ७ लाख लोकसंख्या प्रभावित झाली. याचीच पुनरावृत्ती २०१० आणि २०११ मध्ये सुद्धा झाली.

२६ डिसेंबर २००४ च्या हिंदी महासागरात आलेल्या सुनामीने या राष्ट्राला पूर्णपणे उद्ध्वस्त केले. या निसर्गाच्या आक्रमणात तब्बल ३५ हजार लोक मृत्युमुखी पडले. ५ हजार लोक अद्याप बेपत्ता आहेत, तर एक लाख घरे उद्ध्वस्त झाली आणि १.३ दशलक्ष लोकसंख्या विस्थापित झाली.

Sri Lank Organic Farming
Sri Lanka Organic Farming : श्रीलंकेची सेंद्रिय शेती : प्रचार आणि वास्तव

आज या देशात सतत विजा पडणे, जंगलामध्ये वणवे, वेगवान वारे, साथीचे रोग याच बरोबर जंगली हत्तींचे मानवी वस्तीवरील आक्रमण हे नित्याचेच झाले आहे.

या प्रत्येक नैसर्गिक घटना वेगवेगळ्या असल्या, तरी त्यामागे वातावरणातील बदलच कारणीभूत आहे, हे शासनाला उमगू लागले आहे. मात्र त्यास सामोरे जाण्यासाठी अभ्यासपूर्ण तयारी नाही, हीच शोकांतिका आहे.

‘सेंद्रिय’चा वाढलेला गुंता...

अचानक जाग आलेल्या सरकारने वातावरण बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणत्याही अभ्यासाशिवाय शेतीतील रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरावर जून २०२१ मध्ये राष्ट्रीय स्तरावर बंदी घातली. त्याचा विपरीत परिणाम शेत उत्पादनावर होऊन ते ५० टक्क्यांच्याही खाली आले. भुकेचा कोलाहल उठला.

श्रीलंकेमध्ये सप्टेंबर २०२१ मध्ये आणीबाणी जाहीर करावी लागली. ‘संपूर्ण सेंद्रिय शेती करणारे जगामधील पहिले राष्ट्र’ ही घोषणा त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्येच मागे घ्यावी लागली. वातावरण बदलावर सेंद्रिय शेती हाच प्रभावी उपाय असला, तरी त्यामागे मोठी तपश्‍चर्या करावी लागते. भूतान, सिक्कीम यांचे अनुकरण करताना त्यांची मोठी तपश्‍चर्या जाणूनच नियोजनपूर्वकच पावले उचलली पाहिजेत, हेच श्रीलंकेच्या उदाहरणावरून दिसून येते.

शेती आणि त्यातील समस्या

श्रीलंका हा कृषिप्रधान देश आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये १९७४ पर्यंत कृषी क्षेत्राचा वाटा ३३.५० टक्के होता. आज २०१९ मध्ये तो जेमतेम ७.२४ टक्के एवढाच आहे. थोडक्यात, जगाच्या १०.४८ टक्क्यांच्या तुलनेत तो कमी आहे. म्हणूनच आज या देशासमोर अन्नसुरक्षेचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे या देशाचे कृषी क्षेत्र १९९१ मध्ये २३,४२० चौय किमी एवढे होते, ते वाढून २०१६ मध्ये २७,४०० चौ. किमी झाले आहे. कृषी क्षेत्र वाढताना मध्यवर्ती भागामधील जंगल कापले गेले आहे. या भागात चहाचे मळे जास्त असून, हत्तींचे आक्रमण का वाढले आहे, याचे अप्रत्यक्ष उत्तर मिळते. श्रीलंका पूर्वी लोकसंख्येस पुरेसे धान्य उत्पादन करत असे. फक्त गहू, साखर आणि दुग्धजन्य पदार्थच आयात केले जात असत. आज हा देश कृषिक्षेत्रामधील सर्वच उत्पादने आयात करत आहे. त्यातील मोठा वाटा जागतिक अन्न कार्यक्रमातून (world food programme) या देशाला मोफत मिळतो.

पूर्वी हा देश भात उत्पादनात स्वयंपूर्ण होता; मात्र वाढत्या तापमानामुळे भात उत्पादन कमी होऊ लागले. वाढत्या उष्णतामानास सामोरे जाणारी अनेक भात वाण जागतिक भात संशोधन केंद्राने विकसित केलेली असली, तरी येथील शेतकऱ्यापर्यंत ती पोहोचलीच नाहीत. नद्यांच्या अकस्मात वाढलेल्या महापुराच्या भीतीने आता तर शेतकऱ्यांनी भातशेतीच सोडून दिलेली आहे.

हा उद्ध्वस्त शेतकरी चहाच्या मळ्यात मजूर म्हणून काम करत आहे. आज या देशाच्या २५ टक्के लोकसंख्येचे उत्पन्न प्रति दिन सरासरी अडीच डॉलरपेक्षाही कमी आहे. ४.६ दशलक्ष लोक (त्यात लहान मुलांची संख्या मोठी) कुपोषित आहेत. २०५० पर्यंत त्यात २.४ दशलक्ष लोकसंख्येची भर पडणार आहे. म्हणजेच भूक, गरिबी, कुपोषणसुद्धा तेवढ्याच वेगाने वाढणार आहे.

श्रीलंकेतील ८०% शेतकरी अल्पभूधारक असून, त्यांनाच वातावरण बदलाचे जास्त चटके बसत आहेत. २०१६ मध्ये या देशात प्रचंड मोठा दुष्काळ पडला आणि ४० टक्के भात उत्पादन कमी झाले. २०१७ मध्ये प्रचंड पाऊस झाल्याने पूर्ण तयार झालेले अडीच लाख हेक्टर भात क्षेत्र पूर्णपणे वाहून गेले आणि ६ लाख शेतकरी विस्थापित झाले. पूर्वी सहा महिने पडणारा पाऊस आता जेमतेम दोन महिनेच पडत आहे. या देशावरील संकट माणुसकीच्या दृष्टिकोनामधून अवघ्या विश्‍वासमोरच आव्हानात्मक ठरत आहे.

तिन्ही बाजूंनी समुद्राच्या आक्रमणामुळे चक्रीवादळे, उंच लाटा यामुळे मासेमारी अवघड झाली आहे. मासेमारीवर अवलंबून असणाऱ्या २.७ दशलक्ष लोकांसमोर अन्नाचा मोठा प्रश्‍न उभा राहिला आहे. देशाच्या दुष्काळी पट्ट्यामध्ये मागील ३-४ दशकांत दुष्काळ जास्तच प्रभावी होत आहे. परिणामी, तेथील जनतेचे मध्यभागाकडे स्थलांतर वाढत आहे. सर्व बाजूंच्या किनारपट्टीवरील शेती उद्ध्वस्त होत आहे.

तेथील लोकसंख्याही मध्यभागाकडे सरकत आहे. सपाट भागातील भातशेती पावसाच्या आक्रमकतेमुळे नष्ट होत आहे. हे शेतकरीही मजूर म्हणून मध्य भागाकडे वळत आहेत. मध्यभागामध्ये जंगल कापून तयार जमिनीवर चहा, कॉफी, रबर, विलायची ही निर्यातक्षम शेती वाढत आहे. जंगलावरील मानवी आक्रमणामुळे जंगली हत्ती वस्तीत शिरत आहेत. असे सर्व प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले आहेत.

(लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com