नितीन गडकरी, (केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री)
जागतिक स्तरावर शेती क्षेत्रात अनेक स्थित्यंतरं होत आहेत. भारतीय शेतकऱ्यांनी देखील त्यानुसार शेतीपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय जागतिक स्पर्धेत भारतीय शेतकरी टिकाव धरू शकणार नाहीत. अशा वेळी शेतकऱ्यांचे मनोबल वाढविण्यासोबतच त्यांना नवीन बदल स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ‘ॲग्रोवन’ गेल्या १८ वर्षांपासून याच दिशेने काम करत आहे. त्यामुळेच हे दैनिक भारतीय शेतीसाठी मोठी उपलब्धी असल्याचे माझे मत आहे.
ग्रामीण संपत्तीनिर्मितीत साखर उद्योगाचा वाटा मोठा आहे. आज इथेनॉल नसते तर साखर कारखाने बंद पडले असते. देशातील ऊस उत्पादकांची अवस्था विदारक झाली असती. आज इथेनॉलमुळे नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. बायोफ्युएल, बिटूमन, बायोएव्हीऐशन फ्युएल तयार होत आहे. त्यामुळे भारतीय शेतीचा चेहरामोहरा निश्चितच बदलणार आहे. ही सुरुवात असून त्याला अपेक्षित गती लवकरच मिळेल, असा मला विश्वास आहे. या आघाडीवर ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांच्या प्रबोधनासाठी पुढे आले पाहिजे.
जल, जंगल, जमीन आणि जानवर याची उपलब्धता हे आपले बलस्थान आहे. त्याला जागतिक स्तरावर उपलब्ध तंत्रज्ञानाची जोड देत ग्रामीण भागात उद्योग उभारण्याची गरज आहे. बांबूसारख्या पिकामध्ये अनेक संधी आहेत. फर्निचर, क्रॅश बॅरियर्स, कोळशाला पर्याय म्हणून वीज केंद्रात बांबू पॅलेटचा वापर असे बांबूचे अनेक उपयोग आहेत.
बांबूची मागणी लक्षात घेता पडीक जमीनीवर बांबू लागवड वाढवता येईल. सध्या जिनिंग, प्रेसिंग, ऑइल, डाळ मिल यापुढे गावस्तरावर उद्योग दिसत नाहीत. परंतु आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांबूपासून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फर्निचर तयार होत आहे. बेंगळुरू विमानतळाच्या बांधणीत बांबूचा वापर होतो आहे. विमानात प्लॅस्टिकऐवजी बांबू चमच्यांचा वापर होत आहे.
नाशिक येथील विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीने यशस्वी बिजनेस मॉडेल विकसित केले आहे. द्राक्ष निर्यातीपासून सुरुवात करून या कंपनीने आता शेतीमाल प्रक्रिया, निर्यात व एकूणच मूल्यसाखळी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अशा प्रकारचे व्यावसायिक धोरण असेल तरच शेतकरी कंपन्या यशस्वी होतात. शेती क्षेत्रातील यशस्वी मॉडेलची माहिती ‘ॲग्रोवन’मुळेच माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना मिळाली. अशा यशोगाथा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत.
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.