Pune News : जून महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पेरणीस सुरुवात झाली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरी दहा लाख ६५ हजार ४८ हेक्टरपैकी १० लाख २२ हजार २६२ हेक्टर म्हणजेच ९६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात पेरणी कमी असली तरी सोलापूर जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात काहीशी वाढ झाली आहे. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळत आहे.
पुणे विभागात एक जून ते ८ जुलैपर्यंत नगर जिल्ह्यात सरासरीच्या २०५.७ मिलिमीटरपैकी १९२.९ मिलिमीटर म्हणजेच ९४ टक्के पाऊस पडला. तर पुणे जिल्ह्यात सरासरीच्या ४८५.५ मिलिमीटर पैकी २३८.२ मिलिमीटर म्हणजेच ४९ टक्के, तर सोलापूरमध्ये सरासरीच्या १९७.३ मिलिमीटरपैकी २७०.९ मिलिमीटर म्हणजेच १३७ टक्के पाऊस पडला.
यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मुळशी, भोर, मावळ तालुक्यांमध्ये जोरदार तसेच वेल्हे तालुक्यात अति जोरदार पावसाची नोंद झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्ताहात हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला आहे. त्यानुसार सात ते १५ जूनच्या दरम्यान पावसास सुरुवात झाली होती. तोपर्यंत पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावलेली नव्हती.
त्यामुळे सर्वच ठिकाणी खरिपातील पेरण्या रखडल्याने खरीप वाया जातो की काय अशी धास्ती शेतकऱ्यांना लागून राहिली होती. सात जूनच्या दरम्यान पावसास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करण्यास सुरुवात केली होती.
जिल्हानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा --- सरासरी क्षेत्र -- पेरणीचे क्षेत्र --- टक्के
नगर --- ५,७९,७६८ -- ५,५२,४२८ -- ९५
पुणे --- १,९५, ७१० -- १,२२,४२७ --- ६३
सोलापूर --- २,८९,५७० -- ३,४७,४०८ -- १२०
एकूण --- १०,६५,०४८ -- १०,२२,२६२ --९६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.