Sangli News : जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. यामुळे दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करून पाणी द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार म्हैसाळ योजना सुरू केली.
मिरज, कवठेमहांकाळ आणि तासगाव या तीन तालुक्यांत असलेल्या १७४ पैकी ७६ बंधारे म्हैसाळच्या पाण्याने भरले आहेत. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून तब्बल ५.४ टीएमसी इतका पाणी उपसा करण्यात आला.
‘एल निनो’चा मोठा फटका यावर्षी जिल्ह्याला बसला आहे. पाऊस झाला नसल्याने टंचाईची स्थिती आहे. तलाव कोरडे आहेत. भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे. ओढे कोरडे आहेत. नदी कोरडी पडण्याचे संकट सातत्याने सांगलीकरांनी अनुभवले आहे. कोयना धरण अद्याप शंभर टक्के भरलेले नाही. सुदैवाने चांदोली धरण यावर्षी शंभर टक्के भरले आणि सतत ते भरत राहिले.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्याचा फायदा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेला झाला आहे. जुलैपासून सातत्याने आणि टप्प्याटप्प्याने पाणी उपसा करण्यात आला. त्यासाठी चांदोली धरणातून सातत्याने विसर्ग कायम ठेवण्यात आला होता. त्यामुळे ऑक्टोबरच्या मध्यावर ५.४ टीएमसी इतका प्रचंड पाणीउपसा करण्यात आला आहे. आणखी पंधरा दिवस पाणीउपसा केला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.
मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्यांतील गावांना त्याचा लाभ झाला आहे. दुष्काळाचे सावट गडद होत असताना बागायती शेती वाचवतानाच पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ लोकांवर आली नाही. या पाण्याचे वीजबिल टंचाई निधीतून भरता यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जानेवारीपासून नियमित उन्हाळी आवर्तन सुरू करणे गरजेचे असणार आहे. त्यासाठी संपूर्ण पंपगृहाची देखभाल दुरुस्ती गरजेची आहे. त्यासाठी किमान दीड महिना अवधी लागतो. त्यासाठी पंधरा दिवसांनी पाणीपुरवठा बंद करावा लागेल, असे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी सांगितले. उन्हाळ्यात पूर्ण क्षमतेने योजना चालवण्यासाठी सज्जता गरजेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
तालुका बंधारे संख्या भरलेले बंधारे
मिरज १२३ ३३
कवठेमहांकाळ ३४ २९
तासगाव १७ १४
एकूण १७४ ७६
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.