Chh. Sambbhajinagar News : मराठवाड्यातील ३ व खानदेशातील ३ मिळून ६ जिल्ह्यांत यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी १ लाख ४२ हजार ९०१.२९ हेक्टरवरील ऊस उपलब्ध असल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड तसेच खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार या सहा जिल्ह्यांतील कारखान्यांचे नियोजन छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या माध्यमातून चालते. गतवर्षी या सहा जिल्ह्यांतील २३ कारखाने ऊस गाळप करीत होते.
जवळपास १ लाख ५० हजार हेक्टरवरील ऊस गाळपासाठी गतवर्षी उपलब्ध होता. यंदा १ लाख ४२ हजार ९०१.२९ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. त्यामध्ये आडसाली ५९२३.८३ हेक्टर, पूर्वहंगामी २९ हजार ५४६.८४ हेक्टर, सुरू ३५ हजार ५९६.८८ हेक्टर तर खोडवा ७१ हजार ८३३.७४ हेक्टर ऊस क्षेत्राचा समावेश आहे.
जिल्हानिहाय विचार करता नंदुरबार जिल्ह्यात २० हजार ६१२.६१ हेक्टर, धुळ्यामधून ५७४० हेक्टर, जळगावमधून ३७०७ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३१ हजार ७०२ हेक्टर, जालन्यातून ३१ हजार ६९४ हेक्टर तर बीडमधून ४९ हजार ४४५ हेक्टर क्षेत्र यंदाच्या ऊस गाळपासाठी उपलब्ध असेल. सरासरी ८०.५१ टन प्रति हेक्टर उत्पादकता लक्षात घेता १ कोटी १५ लाख ५ हजार ४४०.२५ टन उसाचे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे.
यंदाच्या ऊस गाळपासाठी २१ कारखाने प्रत्यक्षात सहभागी होतील. त्यामध्ये ११ खासगी, तर १० सहकारी कारखान्यांचा समावेश असेल. अपेक्षित असलेले उत्पादन व सर्व कारखान्यांची मिळून सरासरी ९६ हजार टन प्रतिदिन ऊस गाळपाची क्षमता लक्षात घेता. साधारणतः ११९ दिवस कारखाने चालण्याची अंदाज प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला.
...अशी असेल सरासरी उत्पादकता
नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी ७४.१४ टन प्रति हेक्टर उत्पादकता लक्षात घेता १५ लाख २८ हजार १५९.५० टन ऊस उत्पादित होईल. धुळे जिल्ह्यातून सरासरी ८८.०४ टन प्रति हेक्टर उत्पादकतेने ५ लाख ५ हजार ३३० टन ऊस उपलब्ध होईल.
जळगाव जिल्ह्यात सरासरी ७१.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकतेने २ लाख ६६ हजार २०६ टन, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ८४.६५ टन प्रति हेक्टर उत्पादकतेने २६ लाख ८३ हजार ४२.२५ टन, जालना जिल्ह्यात सरासरी ८५.६७ प्रति हेक्टर उत्पादकतेने २७ लाख १५ हजार २३४ टन, तर बीड जिल्ह्यात ७६.९९ टन प्रति हेक्टर उत्पादकतेने ३८ लाख ७ हजार ७८.५० टन ऊस उत्पादन होणे अपेक्षित असल्याचे साखरे विभागाच्या सूत्राने सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.