Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शेतकऱ्यांनी ऊस लागवडीसाठी धावपळ सुरू केली असून चांगला उतारा देणाऱ्या उसाच्या बेण्यांचा शोध व अभ्यास सुरू केला आहे. काही भागात ऊस लागवडीची लगबग असून लागवडीच्या कामात मजुरांचा तुटवडा भासताना दिसत आहे.
काही ठिकाणी सोयाबीनची काढणी करून मळणी करण्यासोबत शेतकरी उसाच्या लागवडीचेही काम करताना दिसत आहेत. उसाचे क्षेत्र वाढणार असल्यामुळे दोन्ही जिल्ह्यात हरभराचे क्षेत्र कमी होणार आहे.
कृषी विभागाने यंदा खरीपातच नवीन ऊस लागवडीचा अंदाज बांधला होता. दोन्ही जिल्ह्यात खरीप हंगामात कमी प्रमाणात उसाची लागवड केली जाते. ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्येच ऊस लागवडीला शेतकरी प्राधान्य देताना दिसतात.
यंदा कृषी विभागाने लातूर जिल्ह्यात ३६ हजार ५८४ हेक्टरवर तर धाराशिव जिल्ह्यात ७४ हजार २७५ हेक्टरवर नवीन ऊस लागवड प्रस्तावित केली होती. मात्र, त्याहून अधिक लागवड होणार असल्याचे चित्र दोन्ही जिल्ह्यात आहे. मागील वर्षी हरभरा पिकांत मर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. यामुळे शेतकरी यंदा हरभरा पिकाला पर्याय शोधताना दिसत असून मोठ्या संख्येने शेतकरी ज्वारी व करडईसोबत ऊस लागवडीला प्राधान्य देताना दिसत आहेत.
लातूर जिल्हा प्रस्तावित रब्बी क्षेत्र
ज्वारी ७१ हजार ४ हेक्टर
मका दोन हजार ६३ हेक्टर
गहू १० हजार ५२२ हेक्टर
हरभरा दोन लाख ७६ हजार ९५२ हेक्टर
जवस १८० हेक्टर
सूर्यफूल ८६ हेक्टर
करडई २१ हजार ७२० हेक्टर
एकूण ३ लाख ८२ हजार ५३७ हेक्टर
धाराशिव जिल्हा प्रस्तावित रब्बी क्षेत्र
ज्वारी एक लाख ८४ हजार दोनशे हेक्टर
मका ४ हजार सातशे हेक्टर
गहू २० हजार आठशे हेक्टर
हरभरा दोन लाख ४० हजार हेक्टर
जवस एक हजार सहाशे हेक्टर
सूर्यफूल शंभर हेक्टर
करडई पाच हजार पाचशे हेक्टर
एकूण ४ लाख २२ हजार ८४७ हेक्टर
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.