पुणेः देशात मागील काही महिन्यांपासून गव्हाची काहीशी टंचाई (Wheat Shortage) भासून दर (Wheat Rate) वाढत आहेत. त्यामुळे चालू रब्बी हंगामात गव्हाचा पेरा (Rabi Wheat Sowing) कसा राहतो? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आत्तापर्यंत देशात ५४ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला. तर हरभरा (Chana) आणि रब्बी ज्वारीची पेरणीही (Rabi Jowar Sowing) वाढली आहे.
देशात गहू लागवड आजपर्यंत (ता. २८ ऑक्टोबर) ५४ हजार हेक्टरवर झाली. मागील हंगामात याच तारखेपर्यंत ३४ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. उत्तर प्रदेशात गव्हाचा सर्वाधिक ३९ हजार हेक्टरवर पेरा झाला. तर उत्तराखंडमध्ये ९ हजार हेक्टर तर राजस्थानमध्ये २ हजार हेक्टर क्षेत्र गव्हाखाली आलं आहे.
मागील हंगामात देशात गव्हाचा पेरा सरासरीएवढा होता. तसंच पाऊसमान चांगले झाले होते. वातावरणही गहू पिकाला पुरक होते. त्यामुळे देशातील गहू उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंदाज होता. मात्र ऐन गहू दाणे भरण्याच्या काळात उष्णता वाढण्यास सुरुवात झाली. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील उष्णतेने १२५ वर्षांतील विक्रम मोडला होता. याचा परिणाम गहू पिकावर होऊन उत्पादन घटलं. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर तेजीत आले. सरकारने गहू आणि गहू पदार्थांची निर्यातबंदी केल्यानंतरही दरातील वाढ कायम होती.
सरकारची खरेदी यंदा निम्म्यापेक्षाही कमी झाली. देशात गहू टंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून गव्हाचे दर पुन्हा वाढले. ऑक्टोबरमधील दराने २ हजार ५०० रुपयांचा टप्पा गाठला. त्यामुळे सहाजिकच रब्बीतील गहू पेरणीकडे सर्वांचे लक्ष होते. उत्तर भारतात साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच गव्हाच्या पेरण्या सुरु होतात.
मात्र ऑक्टोबरमध्ये बहुतांशी भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी खरिपातील भात आणि सोयाबीन ही पिके काढणीस उशीर झाला. कडधान्यामध्ये हरभाऱ्याचा पेरा जवळपास सात लाख हेक्टरवर झाला. मागील हंगामात याच काळातील पेरणी जवळपास सहा लाख हेक्टरवर झाली होती. तर रब्बी ज्वारीचा पेरा मागील हंगामात १ लाख ५८ हजार हेक्टरवर होता तो यंदा साडेतीन लाख हेक्टरवर पोचला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.