Ekanath Shinde Agrowon
ताज्या बातम्या

Maharashtra Political Crisis : आम्ही गद्दार नाही, शिंदेंचे प्रथमच प्रत्युत्तर

निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, त्याबाबत पाचवेळा पक्ष नेतृत्वाकडे विचारणा केली. तरीही ही कोंडी फुटत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात सांगितले.

Team Agrowon

आम्ही गद्दार नाही. बाळासाहेबांच्या विचारांशी आम्ही तडजोड केलेले नाही, कधीही करणार नाही. बाळासाहेबांच्या विचारांचे, हिंदुत्वाचे संस्कार असताना त्यापेक्षा वेगळ्या विचारसरणीच्या लोकांसोबत सत्तेत जावे लागले. त्या काळात निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला, त्याबाबत पाचवेळा पक्ष नेतृत्वाकडे विचारणा केली. तरीही ही कोंडी फुटत नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात सांगितले.

भाजपच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापना केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहाला त्यांची भूमिका आणि नव्या सरकारच्या वाटचाल कशी असणार हे सांगितले.

आपल्या समर्थक आमदारांना घेऊन स्वतंत्र भूमिका घेतल्याबद्दल शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे गटाकडून टीका केली जात आहे. विशेषतः शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्यावर नेहमीच आक्रमकपणे निशाणा साधत आहेत. या टीकेबाबत शिंदे यांनी एकदाही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज सभागृहाच्या माध्यमातून शिंदे यांनी याबाबतही आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपल्यावर पातळी सोडून टीका होत आहे. गद्दार ठरवले, रेडे म्हणाले. मात्र आपण शिवसेना सोडली नाही, सोडणार नाही, शिवसैनिक हीच आपली ओळख आहे. शिवसेनेसाठी जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी करून शिवसेनेत काम केले. वयाच्या १८ व्या शाखाप्रमुख झालो. आनंद दिघे यांनी शाखाप्रमुख केले त्यावेळीही त्यावेळेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना संधी द्या, असे म्हणालो होतो, मात्र दिघे यांनी मलाच ती जबाबदारी दिली. मला पदाची लालसा नाही, कधीच नव्हती. १९९७ ला नगरसेवक झालो. मी शिवसेना (Shivsena) वाढवण्यासाठी काम केले. पक्ष हेच कुटुंब मानले. अहोरात्र पक्षाचाच विचार केला. घराला, कुटुंबाला वेळ दिला नाही.

बाळासाहेब आणि दिघेसाहेबांनी सावरले

माझी दोन मुलं गेली तेंव्हा कोलमडलो होतो. बाळासाहेब आणि दिघे यांनी सावरले. धीर दिला. मी दुःख विसरून कामाला लागलो. खुप मेहनत केली. महापालिकेतील काम करत असताना रात्र रात्र माझे कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी उघडे असायचे. त्यावेळी लेडीज बार होते, १६ लेडीज बार स्वतः तोडले आहेत. १०० केसेस आहेत. साखरेसाठी, तेलासाठी, जीवनावश्यक वस्तूसाठी , विजेसाठी अनेकवेळा आंदोलने केली. लाठ्याकाठ्या खाल्यात. दिघे साहेब गेले अन मी पुन्हा कोलमडले. त्यांच्या मृत्यूनंतरचा उद्रेक थांबवला. त्यात अटक झालेल्यांना सोडवले. दिघे साहेबांच्या पुण्याईने ठाणे, पालघर येथे शिवसेना वाढवली. पुढे आमदार झाले, मंत्री झालो. फडणवीसांसोबत काम केले. त्यांनी समृद्धी महामार्गाचे काम दिले.

मी एकटा कुठे कुठे पुरणार ?

अडीच वर्ष शिवसेना (Shivsena) सत्तेत होती. मुख्यमंत्री सेनेचे पण सत्तेचा शिवसेनाला काहीच फायदा झाला. तळागाळातल्या शिवसैनिकाला झाला पाहिजे, हीच आपली भूमिका होती. सत्ता असताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण नाही करणार तर कधी करणार? असा सवाल करत शिंदे यांनी, या काळात शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना शिवसैनिकांना तडीपाऱ्या, नोटीसेस , केसेस याशिवाय काय मिळाले ? असा सवाल उपस्थित केला.अशा तक्रारी घेऊन शिवसैनिक माझ्याकडे यायचे. मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो, तसा रिकामाच होतो, त्यामुळे मी त्यांना जमेल तशी मदत करत होतो, मात्र मी एकटा कुठे कुठे पुरणार? आपली सत्ता असताना शिवसैनिकांची कामे झाली नाहीत तर या सरकारमध्ये राहून काय करायचे? अशी खंत वाटत होती.

शिंदे यांनी सांगितले की, अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मलाच मुख्यमंत्री करणार होते. पण नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.आपली तक्रार नव्हती. मला पदाचा मोह नाही, पूर्वी नव्हता. मात्र निवडून आलेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. आपण नैसर्गिक मित्रापासून (Natural Alliance) दूर चाललोय, अशी तक्रार होती.

पाच वेळा याबाबत विचारले. पण उत्तर मिळाले नाही. काँग्रेसने सावरकरांवर (Savarkar)टीका केली. आम्ही बोललो नाही कारण काँग्रेस सत्तेत सोबत आहे. ज्या दाऊदने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले, त्याबाबत बोलायचे नाही. औरंगाबादला संभाजीनगर म्हणायचे नाही कारण काँग्रेस सोबत आहे. आता या सरकारने हा निर्णय घेतला, आमचे या निर्णयास समर्थन आहे.

बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार कोणी काढला?

आम्ही बाळासाहेबांचे विचार, शिकवण घेणारे शिवसैनिक आहोत. त्यांच्या विचारांशी तडजोड कशी सहन करणार? ज्यांच्याशी वैचारिक संघर्ष केला त्यांच्यासोबत सत्तेत गेलो. आमची वैचारिक कुचंबणा होत होती. बाळासाहेबांचा (Balasaheb Thackeray) मतदानाचा अधिकार कोणी काढला? रमेश प्रभूंच्या प्रचारात त्यांनी घोषणा दिली होती. 'गर्व से कहो हम हिंदू है'. काँग्रेसच्या तक्रारीमुळे बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार गेला. याच बाळासाहेबांनी मुंबई बेचिराख होण्यापासून वाचवली.असे असताना यांच्यासोबत काम कस करायचं ? आम्हाला पदाचा लोभ नाही. कुठल्याही पदासाठी हे केलेले नाही. अडीच वर्षे जी कुचंबणा होत होती त्यातून हा निर्णय घेतला. हे केले ते हिंदुत्वाच्या विचारासाठी केले. आमचे हिंदुत्व इतर इतर धर्मियांचा अवमान करणारे नाही, असे शिंदे म्हणाले.

मंत्री असतानाही आक्षेप घेतला नाही

मी नगरविकास खात्याचा मंत्री होतो. पण माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु होता. अगदी अजित दादा (Ajit Pawar) माझ्याही खात्याच्या बैठका घ्यायचे. सकाळी सकाळी लवकर त्यांच्या बैठका सुरु असायच्या. मी पहायचो, पण अडवले नाही, कारण ते काम करत होते. माझ्याच खात्यात समांतर यंत्रणा काम करत होती.

जो बोलला तो रेडा नको

आमच्यावर टीका केली गेली. आम्हाला समोर करून निशाणा साधला जाईल. कामाख्या देवीसमोर ४० रेडे बळी दिले जातील,असे सांगितले गेले. प्रत्यक्ष कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? कामाख्या देवी म्हणाली आम्हाला बोलणारा रेडा नको.

... अन्यथा गावाकडे जाऊन शेती करीन

आमच्या भाजपकडे (BJP) जाण्याच्या कृतीवर शंका घेतली गेली. आता माझ्यासोबत आलेले लोक पुन्हा निवडून येणार नाहीत, असे सांगितले जात आहे. मात्र खात्री देतो, की हे ५० जण निवडून आणेल. भाजप आणि आम्ही २०० जागा आणू नाहीतर गावाकडे जाऊन शेती करेन.

सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही

आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, आपल्याला कुठलीही राजकीय राजकीय पार्श्वभूमी नाही. आमच्या भूमिकेवर टीका करताना आम्हाला भाजीवाला म्हणाले, टपरीवाला म्हणून हिणवले, गाडीवाला म्हणाले, मात्र आम्ही आहोतच ना टपरीवाले. प्रामाणिकपणे व्यवसाय करणे चुकीचे आहे का ? भाजी विकणे चुकीचे आहे का? हे सरकार सर्वसामान्य नागरिकांचे आहे, भाजीवाल्याचे आहे, टपरीवाल्याचे आहे, रिक्षावाल्याचे आहे. हे सरकार आपले आहे असे प्रत्येकाला वाटेल, असा कारभार हे सरकार करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. यावेळी शिंदे यांनी, हिरकणी गावाच्या विकासासाठी २१ कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली. राज्यातील शेतकऱ्यांसाठी काम करायचे आहे. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करायचा आहे, विरोधी पक्षाचे सहकार्य लागेल, असेही शिंदे म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT