Pune News : येथील उपबाजारात टोमॅटो व कोथिंबीर, मेथी शेपूच्या बाजारभावात मागील दोन दिवसांमध्ये वाढ झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. शनिवारी (ता. १०) झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार टोमॅटो क्रेटला शंभर रुपये ते साडेचारशे रुपये तर कोथिंबीर जुडीला प्रतवारीनुसार शेकडा दोनशे ते साडेतीन हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे.
उपबाजारात शनिवारी जुन्नर, आंबेगाव, शिरूर, संगमनेर, पारनेर भागातून सुमारे पंचेचाळीस हजार टोमॅटो क्रेटची (प्रति क्रेट वीस किलोग्रॅम) आवक झाली. मागील सहा महिन्यांत प्रथमच टोमॅटोच्या बाजारभाव वाढ झाली आहे, अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.
मागील वर्षी पाऊस झाल्याने समाधानकारक पाणीसाठा असल्याने उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करण्यात आली आहे. टोमॅटोचा हंगाम मार्च महिन्यात सुरू झाला. मात्र यावर्षी तापमानात वाढ झाल्याने टोमॅटोच्या प्रतवारीवर परिणाम झाला. मार्च ते मे दरम्यान टोमॅटोचे बाजार भाव कमी झाले.
याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला. टोमॅटोचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी वर्गात नाराजी होती. दरम्यान, २४ मे २०२३ रोजी शेतकऱ्यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून आंदोलन केले होते. मात्र, मागील चार-पाच दिवसांपासून तापमानात घट झाली असल्याने इतर राज्यांमध्ये टोमॅटोला मागणी वाढली आहे.
नारायणगाव उपबाजारातून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात टोमॅटो विक्रीसाठी पाठवली जात आहेत. व्यापाऱ्यांची संख्या बाजार समितीच्या आवारात वाढली आहे. यामुळे आवक स्थिर असून देखील टोमॅटो क्रेटच्या बाजारभावात वाढ झाली आहे. हीच परिस्थिती कोथिंबीर, मेथी व शेपूच्या बाजार भावाची आहे.
उपबाजारामध्ये कोथिंबीर, शेपू व मेथीच्या दोन लाख २७ हजार ७०० जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर जुडीला शेकडा २०० रुपये ते साडेतीन हजार रुपये. मेथीच्या जुडीला शेकडा ५५१ रुपये ते दोन हजार चारशे रुपये, शेपूच्या जुडीला शेकडा ७०० रुपये ते अठराशे रुपये भाव मिळाला.
बदलत्या हवामानाचा फटका शेतीपिकांना बसला आहे. या वर्षी तापमानात वाढ झाल्याने टोमॅटोचे मोठे नुकसान झाले आहे. सद्यःस्थितीत तापमानात घट झाल्याने इतर राज्यात टोमॅटोच्या मागणीत वाढ झाल्याने बाजार भावात वाढ झाली आहे. कोणत्याही मालाची विक्री केल्यानंतर व्यापाऱ्यांकडून पैसे घ्यावेत. काही तक्रार असल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा.संजय काळे, सभापती, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.