जळगाव ः शासनाने पोटखराबा क्षेत्र (Potkharaba Land) वहिवाटिखाली आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. पण जळगाव जिल्ह्यात या मोहिमेला नाकर्त्या व कचखाऊ प्रशासनामुळे हरताळ फासला गेला आहे. यातच पोटखराब क्षेत्र (Area Unfit To Cultivation) वहिवाटिखाली आणण्यासंबंधीचे जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा आदी गावांचे प्रस्ताव किंवा प्रस्ताव यादीच जळगाव येथील प्रांत (उपविभागीय अधिकारी) कार्यालयातून गहाळ झाली आहे.
ही यादीच गहाळ झाल्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासन पोटखराबा मोहिमेसंबंधी किती कृतिशील व शेतकऱ्यांसंबंधी असंवेदनशील आहे, हेदेखील दिसून आले आहे. जळगाव जिल्ह्यात पोटखराब क्षेत्र वहिवाटिखाली आणण्यासंबंधीचे काम सुरुवातीपासून संथच आहे. अधिकारी याबाबत आढावा घेत नाही.
अत्यल्प प्रस्ताव जिल्ह्यात यासंबंधी मार्गी लागले. मध्यंतरी जळगाव तालुक्यातील काही गावांमधील अत्यल्प प्रस्ताव प्रशासनाने मार्गी लावले. जळगाव जिल्हा या कामात राज्यात पिछाडीवर आहे. यातच जळगाव तालुक्यातील कानळदा, फुपनगरी या गावांचे पोटखराबा क्षेत्र वहिवाटीखाली आणण्याचे प्रस्तावच प्रांत कार्यालयातून गहाळ झाल्याने शेतकऱ्यांत संताप वाढला आहे.
‘अॅग्रोवन’ने याबाबत कानळदा येथील तलाठी ज्ञानेश्वर माळी यांच्याशी संपर्क साधला, त्यात तलाठी म्हणाले, की सुमारे दीड महिन्यापूर्वी तलाठी यांनी यासंबंधीची सविस्तर यादी प्रांत कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्याकडे दिली होती. आपण प्रांत कार्यालयात विचारणा करा. यानुसार अॅग्रोवनने प्रांत कार्यालयात विचारणा केली, पण ही यादीच कर्मचाऱ्याकडे नाही. तलाठी यांना माझ्याशी संपर्क करायला सांगा, यादीच नाही, असे कर्मचाऱ्याने सांगितले.
पोटखराबा क्षेत्र शेतकऱ्यांनी वहिवाटीखाली आणले आहे. ते वहिवाटीखाली आणण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत महसूल प्रशासन सक्रिय असायला हवे. हा शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा मुद्दा आहे. जळगाव तालुका व इतर भागातील पोटखबारा क्षेत्र वहिवाटीखाली आणण्याचे प्रस्ताव प्रशासनाने मार्गी लावावेत, यासाठी मी जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली आहे.खासदार उन्मेष पाटील, जळगाव
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.