Paddy Farming Agrowon
ताज्या बातम्या

Paddy Production : रत्नागिरी जिल्ह्यातील भाताचे उत्पादन ५ टक्क्यांनी घटणार

Paddy Farming : सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादन यंदा ५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : सरासरीपेक्षा कमी पडलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भात उत्पादन यंदा ५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अनियमित पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून, भविष्यात असेच चित्र राहिले तर त्यात आणखी वाढ होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पाण्याअभावी भात रोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत, तर काही ठिकाणी उंचीच वाढलेली नाही. कातळावरील रोपे पिवळी पडल्याने उत्पादन किती मिळेल याबाबत शेतकरी साशंक आहे.

जून महिन्यात मॉन्सून उशिराने दाखल झाला. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर मंदावला. हेच चित्र सप्टेंबर महिन्यातही दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसांत अधूनमधून एखाद-दुसरी सर पडत आहे. तर दिवसभर कडकडीत पडणाऱ्या उन्हामुळे कातळावरील भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात १ जून ते ७ सप्टेंबर या कालवधीत सरासरी २५८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

गतवर्षी याच कलावधीत २९७१ मिमी पाऊस झाला होता. तुलनेत चारशे मिमी कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी कातळावरील शेतीचे प्रमाण २० टक्के म्हणजेच सुमारे १३ हजार हेक्टर इतके आहे. अनियमित पावसामुळे कातळावरील शेतीसह उशिराने लावणी झालेल्या क्षेत्रालाही फटका बसला आहे.

रोपांची वाढ व्यवस्थित झालेली नाही. भात रोपे उन्हामुळे पिवळी पडली असून, करपण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यांत वरकस जमीन अधिक असल्याने भात उत्पादन घटीचा परिणाम जाणवण्याची भीती कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात या वर्षी जून महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या भाताची पेरणी उशिराने झाली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी २० ते २४ जूनदरम्यान पेरण्या केल्या. त्यामुळे भात लावणी पंधरा दिवस पुढे गेली. जुलै महिन्यात जिल्ह्यात सरासरी पाऊस चांगला झाला. जूनची सरासरी भरून काढली. मात्र ऑगस्ट महिन्यात सरासरी पाऊस कमी झाला. ऑगस्टपर्यंत सरासरी २६०० मिमी पाऊस पडतो.

यंदा तो २५०० मिमीचे झाला. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा फरक आणखीन वाढत आहे. दिवसातून एखादी सर किंवा दोन दिवसांत एखादी सर अशा अनियमित स्थितीचा फटका भातशेतीला बसला आहे.

१ सप्टेंबरला शून्य पावसाची नोंद आहे. मात्र गतवर्षी पहिल्याच आठवड्यात पेरण्या झाल्या. त्यामुळे २१ दिवसांनी म्हणजेच साधारणपणे जूनच्या अखेरीस भात लावणीला सुरुवात झाली होती. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना कसरत करावी लागली होती.

खरिपातील लागवडीचे क्षेत्र घटले

जिल्ह्याचे मुख्य पीक भात आहे. जिल्ह्यात ६८ हजार ८८.३७ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मात्र यंदा ६१ हजार २४९.१३ हेक्टरवर प्रत्यक्ष लागवड झाली. नाचणीचे १० हजार ३९८.२१ हेक्टर क्षेत्र असून, प्रत्यक्ष लागवड ९ हजार ३७९.६८ हेक्टरवर झाली.

तृणधान्य, तूर, मूग, उडीद व अन्य कडधान्य पिकाखालील लागवडही पावसाअभावी कमी झाली आहे. जिल्ह्यात ७९ हजार ८७१.६५ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट होते. यंदा अनियमित पावसामुळे ७१ हजार ४११ हेक्टरवर लागवड झाली आहे. या वर्षी ८९ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.

जमिनीत पाणी साठवून ठेवण्याची क्षमता अधिक असलेल्या क्षेत्रातील भातशेती चांगली आहे. मात्र कातळावरील, रेताड जमीन किंवा पाणी नाही अशी शेती अडचणीत सापडली आहे. शेते पिवळी पडली असून रोपांचे शेडे करपून गेले आहेत. फुटवे कमी आल्यामुळे यंदा जिल्ह्याचे भात उत्पादन सुमारे ५ टक्क्यांनी घटेल. भाताची हेक्टरी उत्पादकता ३२ क्विंटल आहे.
- सुनंदा कुऱ्हाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
भात रोपांवर करपा पडला असून ती पिवळी पडलेली आहे. सुरुवातीला लावणी केलेली रोपं पसवायला लागली आहेत. मात्र उशिराने लावलेली पिकांची परिस्थिती वाईट आहे. संगमेश्‍वरमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी स्थिती आहे.
- बंड्या लिंगायत, शेतकरी, राजवाडी

सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे रोपांना अधिकचे फुटवे आलेले नाहीत. अन्नद्रव्य न मिळाल्याने रोपांची उंची कमी राहिली आहे. या कालावधीत रोपांना पोटऱ्या येतात. मात्र हा कालावधी आठ दिवस पुढे जाईल. निमगरव्या आणि गरव्या रोपांना पोटऱ्या येण्यासाठी अजून पंधरा दिवस लागतील. तोपर्यंत पाऊस येईल अशी अपेक्षा आहे. या परिस्थितीमध्ये उत्पादन कमी होईल हे नक्की आहे, असे शिरगाव येथील भात संशोधन केंद्राचे संशोधक व्ही. व्ही. दळवी यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT