Paddy Production : चारसूत्री तंत्रातून भात उत्पादनात वाढ...

Paddy Cultivation : कोल्हेवाडी (ता.जुन्नर,जि.पुणे) या आदिवासी भागातील महिला शेतकरी चांगुणाबाई गवारी आणि अलका गभाले यांनी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करून उत्पादनामध्ये चांगली वाढ केली आहे.
Paddy Production
Paddy ProductionAgrowon

संदीप नवले
Paddy Crop : कोल्हेवाडी (ता.जुन्नर,जि.पुणे) या आदिवासी भागातील महिला शेतकरी चांगुणाबाई गवारी आणि अलका गभाले यांनी चारसूत्री पद्धतीने भात लागवड करून उत्पादनामध्ये चांगली वाढ केली आहे. गावामध्ये महिला समुहाच्या माध्यमातून त्यांनी पीक उत्पादनवाढ, पूरक उद्योगातील तंत्रज्ञान प्रसार आणि थेट ग्राहकांना तांदूळ विक्रीवर भर दिला आहे. जुन्नर तालुका हा टोमॅटो,भात आणि भाजीपाला पिकांचे आगार समजला जातो.

तालुक्यात जवळपास सर्वच शेतकरी इंद्रायणी या वाणाची पारंपारिक पद्धतीने लागवड करतात. मात्र मागील काही वर्षांपासून मजूर टंचाईमुळे भात लागवड क्षेत्रामध्ये घट होऊ लागली. यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी चारसूत्री, एसआरटी, एसआरआय त्याचबरोबर यंत्राद्वारे भात लागवडीवर भर दिला आहे. यापैकीच एक आहेत चांगुणाबाई भिका गवारी.

गेल्या काही वर्षांपासून त्या चारसूत्री पद्धतीने भात लागवड करीत आहेत. या भात शेतीमध्ये मुलगी अलका राजेंद्र गभाले यांची चांगली साथ मिळाली आहे. दरवर्षी सरासरी दोन एकरामध्ये भात लागवड असते. उन्हाळ्यात बाजरी, भुईमूग लागवड असते. शाश्वत पाणी व्यवस्थापनासाठी एक कूपनलिका खोदलेली आहे.

भात शेतीमध्ये सुधारणा
चांगुणाबाई गवारी आणि अलका गभाले या पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने भात लागवड करत होत्या. परंतु अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. यावर मात करण्यासाठी त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यास सुरवात केली. त्यानुसार जमीन व्यवस्थापन, भात उत्पादन वाढीसाठी जातींची निवड, खत व्यवस्थापन, लागवड तंत्र आदीबाबत सविस्तर माहिती घेतली.

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी भाताच्या इंद्रायणी जातीची निवड केली. दरवर्षी कृषी विभागाच्या शेतीशाळांना उपस्थित राहून त्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. भात बीजप्रक्रिया, लागवड पद्धती, रोग-किडीचे नियंत्रण, काढणी आणि प्रक्रियेबाबत त्यांनी मार्गदर्शन घेऊन भात लागवडीमध्ये सुधारणा केली. याशिवाय तालुका, जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तंत्रज्ञान समजाऊन घेतात.

Paddy Production
Paddy Production : कर्जतमध्ये भात उत्पादनात वाढ

भात पीक व्यवस्थापनाबाबत अलका गभाले म्हणाल्या की, पूर्वी पारंपारिक पद्धतीच्या भात लागवडीमध्ये रोपांमध्ये योग्य अंतर नसल्याने युरिया- डीएपी ब्रिकेटचा वापर करण्यात अडचणी येत होत्या. रोपांच्या दाट लागवडीमुळे कीड,रोगांचे प्रमाण वाढायचे. योग्य पोषण होत नव्हते.

उत्पादन कमी मिळायचे. त्यामुळे आम्ही चारसूत्री पद्धतीने लागवडीवर भर दिला. यामध्ये दर्जेदार बियाणे निवड, बीज प्रक्रिया, हिरवळीच्या खताचा वापर, माती परिक्षणानुसार रासायनिक खतांच्या योग्य वापरावर भर दिला.

त्यातून चांगले उत्पादन मिळण्यास सुरवात झाली.
उन्हाळ्यात शेणखत, भाताचा पेंढा टाकून आडवी उभी नांगरणी केली जाते. त्यानंतर एकरी सुमारे एक टन गिरीपुष्पाचा पाला टाकून चिखलणी केली जाते. चारसूत्री पद्धतीने लागवड केल्याने रोपाची संख्या नियंत्रित असल्याने हवा खेळती राहते, कोळपणी करणे सोपे जाते.

या पद्धतीमध्ये युरिया-डीएपी ब्रिकेट खोचणे सोपे झाले आहे. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करता येते. परिणामी फुटवे जास्त निघतात. पूर्वी एक एकर लागवडीसाठी १५ मजूर लागत होते. आता दहा मजूर लागतात. भात पिकाची चांगली वाढ होत असल्याने टप्याटप्याने उत्पादनात देखील वाढ मिळत आहे.


Paddy Production
आधुनिक तंत्रातून ब्रोकोली उत्पादनात मिळवली वाढ

पीक उत्पादनात वाढ
पीक उत्पादनाबाबत अलका गभाले म्हणाल्या की, तीन वर्षापूर्वी आम्हाला एकरी १८ क्विंटलपर्यंत भात उत्पादन मिळायचे. मात्र चारसूत्री पद्धतीचा अवलंब केल्यानंतर दोन वर्षापूर्वी एकरी २८.५०क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. गेल्या वर्षी एकरी ४४ क्विंटल उत्पादन झाले होते. पू

र्वी पारंपारिक पद्धतीने लागवड करत असल्यामुळे चांगुणाबाई गवारी आणि अलका गभाले यांना भाताचे अपेक्षित उत्पादन मिळत नव्हते. परंतु मागील सहा वर्षांपासून चारसूत्री पद्धतीने भात लागवड करून त्यांनी अपेक्षित उत्पादन वाढ साधली. गेल्या दोन वर्षांपासून त्या कृषी विभागाच्या पीक स्पर्धेत भाग घेत आहेत. याबाबत कृषी विभागाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळाले आहे. येत्या काळात यंत्राने भात लागवड करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.


उत्पादित तांदळाची गावपरिसरात तसेच कृषी विभागातर्फे आयोजित तांदूळ महोत्सव,भरड धान्य महोत्सवातून विक्री केली जाते. दरवर्षी १० क्विंटल इंद्रायणी तांदळाची ५० रुपये प्रति किलो दराने विक्री होते. थेट विक्रीच्या माध्यमातून त्यांनी १०० कायमस्वरूपी ग्राहक जोडलेले आहेत.

महिला समुहातून शेती प्रगती...
भात शेतीतून चांगले उत्पादन मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर अलका गभाले यांनी गावातील महिलांना त्यांनी पीक उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यास सुरवात केली. २०१९ पासून त्यांनी गावातील महिलांना एकत्रित आणण्यास सुरवात केली. या मध्यमातून त्यांनी महिला कल्याणकारी स्वयंसहाय्यता समूहाची सुरवात केली.मागील तीन वर्षांपासून समुहाच्या माध्यमातून शेतीशाळांचे आयोजन केले जाते.

विविध योजनांबाबत जनजागृती केली जाते. तसेच तांदूळ विक्रीसाठी प्रयत्न केले जातात. सेंद्रिय खत निर्मितीसाठी त्यांनी नाडेप पद्धतीचा अवलंब करण्यास सुरवात केली आहे. शेतीशाळेमध्ये तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, गणेश भोसले, मंडळ कृषी अधिकारी हरीश माकर, कृषी सहाय्यक सुभाष मडके, निलम काटे, भगवान पोटे यांचे गटातील महिलांना सातत्याने मार्गदर्शन मिळत असते.त्यामुळे पीक लागवड तसेच पूरक उद्योगामध्ये महिलांनी बदल करण्यास सुरवात केली आहे.
-----------------------------------------------------
संपर्क ः अलका गभाले, ७२६३९५५९८३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com