Pune News : पुणे बाजार समितीमधील फळे-भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने काढलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणीला अखेर मंगळवारचा (१ ऑगस्ट) मुहूर्त उजाडला.
बाजार समिती प्रशासनाला न जुमानणाऱ्या अडत्यांवर अखेर दंडात्मक कारवाईला प्रारंभ झाला असून, मंगळवारी (१ ऑगस्ट) ८२१ अडत्यांपैकी ९६ अडत्यांवर प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड ठोठावत जीएसटीसह १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बाजार समितीमध्ये अडते असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने डमी अडत्यांचा सुळसुळाट झाला असून, या सुळसुळाटाला पायबंद घालण्यासाठी संचालक मंडळाने अडत्यांनी दोन मदतनीस असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश १७ जूनच्या परिपत्रकाद्वारे दिले होते.
मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत विरोध केला होता. मात्र बाजार समितीने सातत्याने स्मरणपत्रे देऊन प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर दीड महिन्याने वाट बघून प्रशासनाने १ ऑगस्टपासून कारवाईला प्रारंभ करत ९६ अडत्यांवर केली. कारवाई दरम्यान जीएसटीसह १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
बाजार समितीमध्ये अडते असोसिएशनसह बाजार आवारातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडतीच्या मूळ व्यवसायातून निवृत्ती घेत, इतर व्यवसायात बस्तान बसविले आहे.
तर बाजार समितीमधील गाळे पाचपेक्षा जास्त डमी अडत्यांना बेकायदा पद्धतीने भाडेतत्त्वावर देत, केवळ भाडे घेण्याचा उद्योग सर्रास झाला आहे. यामुळे बाजार आवारात दोन हजारांपेक्षा अधिक डमी अडते कार्यरत असून, यांच्यावर निर्बंध आणण्यासाठी संचालक मंडळाने गाळ्यावर केवळ दोन जणांना कामावर ठेवण्याची परवानगी दिली आहे.
८२१ पैकी केवळ ९६ प्रतिज्ञापत्रे सादर
फळे आणि भाजीपाला विभागात ८२१ गाळे असून, त्यापैकीच केवळ ९६ अडत्यांनी प्रतिज्ञापत्रे सादर केली असून, उर्वरित प्रतिज्ञापत्रे सादर होण्याची वाट प्रशासन बघत आहे.
बाजार आवाराला शिस्त लावण्यासाठी आणि डमी अडत्यांवर नियंत्रणासाठी १७ जून २०२३ रोजी परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या होत्या. यानतंरही सातत्याने स्मरण पत्र देऊनही एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर केले नव्हते. यानंतर अडते असोसिएशन ३१ जुलैची मुदत मागितली होती. ती आम्ही दिली होती. यानंतर मंगळवार (१ ऑगस्ट)पासून कारवाईला प्रारंभ करून १ लाख ३६ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.- महेंद्र काळभोर, विभाग प्रमुख, फळे भाजीपाला, बाजार समिती, पुणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.