APMC Pune
APMC Pune Agrowon

Pune APMC : पुणे बाजार समितीमध्ये ठेकेदारांचा सुळसुळाट

Pune APMC Contractors News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर किरकोळ कामांसाठी ठेकेदारांची नियुक्ती केल्याने सुळसुळाट वाढला आहे.
Published on

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची नियुक्ती झाल्यानंतर किरकोळ कामांसाठी ठेकेदारांची नियुक्ती केल्याने सुळसुळाट वाढला आहे. त्यातच विविध कामांच्या ठेक्यांचे संचालक मंडळांच्या निकटवर्तीयांनाच वाटप करून, त्यांचे पुनर्वसन केले जात असल्याने शेतकरी, अडते, व्यापारी, खरेदीदार त्रस्त झाले आहेत. या ठेकेदारांना आवर घालण्याची मागणी बाजार घटकांकडून होत आहे.

बाजार समितीमध्ये प्रशासकीय राजवट असताना, एक हाती प्रशासन होते. मात्र संचालक मंडळ नियुक्तीनंतर प्रत्येक संचालकांनी आपला सवता सुभा उभा केला आहे. बाजार समितीमधील पार्किंग, सुरक्षा, स्वच्छता, किरकोळ बांधकाम, दुरुस्ती आदी विविध कारणांसाठी प्रशासकीय राजवटीमध्ये काही निवडक कंत्राटदार ठेकेदार होते. मात्र संचालक मंडळ आल्यानंतर विविध रस्त्यांवरच्या पार्किंगचे ठेके वाटप करून घेण्यात आले आहेत.

APMC Pune
Pune APMC : सकाळी दहाला बाजार बंद करण्यावरून मतभिन्नता

यामुळे पार्किंग ठेकेदारांची मनमानी सुरू झाली असून, बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, प्रत्येक रविवारी वाहतूक कोंडी होत आहे. बाजार समितीत प्रशासनाच्या आशीर्वादाने ठेकेदारांकडून वाहनचालकांची सर्रास लूट सुरू आहे. प्रवेशद्वारावर वाहनचालक आणि ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची वारंवार भांडणे होत असून, ग्राहकांनी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहेत.

बाजार समितीच्या गूळ-भुसार विभागात भूखंड क्रमांक ४१२ ते ४१९ लोढा बिल्डिंगच्या मागील मोकळ्या जागेत वाहनतळ आहे. केवळ या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या वाहनांचे शुल्क आकारण्याचे आदेश बाजार समितीने एका ठेकेदाराला दिले आहेत.

याव्यतिरिक्त बाजार समितीचे फळे व भाजीपाला विभागाच्या मुख्य प्रवेशद्वारा वजन काट्यामागे एक वाहनतळ, गेट क्रमांक चार येथील गुरांच्या बाजाराच्या मागे आणि पूर्वीच्या बांबू बाजाराच्या जागेतील वाहनतळ आदी ठिकाणी वाहनतळे आहेत.

या वाहनतळांत पार्क केलेल्या वाहनांचे पार्किंग शुल्क आकारणे बंधनकारक आहे. असे असले तरी संचालक मंडळाच्या मर्जीतले ठेकेदार दिसेल त्या मोकळ्या जागेवरील पार्किंगसाठी शुल्क आकारणी करून लूट करीत आहेत.

APMC Pune
Pune APMC : पुणे बाजार समितीमधील डमी अडत्यांवर कारवाई होणार

गूळ-भुसार बाजारात बहुतांश अन्नधान्याची वाहने ही परराज्यातून येतात. परराज्यातील वाहनचालकांना मराठी बोलता येत नाही. बाजारात येताना प्रवेश फीचे पैसे दिल्याचे सांगितल्यानंतर देखील पार्किंगच्या नावाखाली त्यांच्याकडून बेकायदा पैसे घेतले जात आहेत. वसुली करणारा ठेकेदार संचालक मंडळाच्या खास मर्जीतील असल्याने त्याला पाठीशी घातले जात असल्याची चर्चा बाजार समितीच्या गोटात आहे.

कार्यादेशाप्रमाणे पार्किंग शुल्क घेण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत. बाजारात कोठेही उभ्या वाहनांकडून पार्किंग शुल्क घेतल्याचे निदर्शनास आल्यावर तसेच याबाबत तक्रार आल्यावरच संबंधित ठेकेदारावर कारवाई करू.
- डॉ. राजाराम धोडकर, सचिव, बाजार समिती, पुणे
बदलत्या बाजार व्यवस्थेमुळे अलीकडे खर्च वाढला असून, त्याचा परिणाम बाजाराच्या उलाढालीवर होत आहे. बाजार समितीतील बाजारात परराज्यासह, शहरातील सर्वसामान्य वाहनचालक येत असतात. त्यांच्याकडून पार्किंग नसताना पार्किंग शुल्क घेतले जाते. यामुळे भविष्यात व्यापाराला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
- प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com