Sugarcane  Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crop : राजापुरातील उसाला कमी पावसाचा फटका

Team Agrowon

Ratnagiri News : वरुणराजाने दडी मारल्यामुळे भातशेतीप्रमाणे ऊस पीकही धोक्यात आले आहे. पुरेशा पाण्याअभावी उसाच्या कांड्या जमिनीकडून काहीशा मरू लागल्या आहेत. तर, काही भागामध्ये पाण्याअभावी उसाच्या रोपांची चांगली वाढ आणि उसाच्या कांड्यांची अपेक्षित जाडीही झालेली नाही. त्यामुळे यावर्षी उसाच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.

पावसाचा लहरीपणा, जंगली श्‍वापदांकडून होणारी नासधूस, मजुरांची कमतरता, आधुनिकता अन् व्यवसायिक दृष्टिकोनाचा अभाव आदी विविध कारणांमुळे भातशेतीकडील शेतकऱ्यांचा कल कमी होत आहे. त्यामुळे राजापूर तालूक्यातील शेतकऱ्यांनी हमखास उत्पन्न देणाऱ्या ऊस शेतीला प्राधान्य दिले आहे.

यंदा लहरी पावसामुळे ऊस लागवडीला तडाखा बसण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. पुरेशा पाण्याअभावी उसाच्या कांड्याची पुरेशी वाढ नाही, जाडी नाही. उसाच्या कांड्या जमिनीच्या बाजूने काहीशा मरू लागल्या आहेत.

पावसाची दडी आणखी काही दिवस अशीच कायम राहिल्यास या स्थितीमध्ये अधिकच भर पडणार आहे. त्यातून, उसाच्या सरासरी उत्पन्नामध्ये सुमारे पाच ते दहा टक्क्यांनी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमधून वर्तविली जात आहे.

उसाच्या कांड्या लागवड केलेल्या दोन सरींमधून वा शेतामधून फिरणे सुलभ व्हावे, खतांची मात्रा देणे सोयीचे व्हावे या उद्देशाने उसांच्या रोपांच्या वाढलेल्या पात्यांची सर्वसाधारणपणे या महिन्यात शेतकऱ्यांकडून कापणी केली जाते.

रोपांची कापलेली पाती सरीमध्ये टाकून त्यावर माती टाकली जाते. जेणेकरून त्याचे कंपोष्ट खत तयार होऊन ते रोपवाढीसाठी उपयुक्त ठरते. मात्र, कापूनरींमध्ये टाकलेल्या पाती कुजण्यासाठी गणेशोत्सवानंतरही पुरेसा पाऊस गरजेचा आहे.

ऊसाची लागवड असलेली राजापुरातील गावे ः

मूर, पाचल, रायपाटण, गोठणे-दोनिवडे, केळवली, मोसम, मोरोशी, कोळंब, काजिर्डा, जवळेथर, पाजवेवाडी, मांजरेवाडी, सौंदळ, तळवडे, हरळ. राजापूरचे ऊस लागवडीखाली क्षेत्र ः ४१ हेक्टर

उसासाठी पोषक वातावरणामुळे कोकणात शेतकऱ्यांकडून उसाचे पीक घेतले जाते. त्यातून, गेल्या काही वर्षांत उसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र, पावसाच्या दडीचा भातशेतीप्रमाणे उसावरही प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. पुरेशा पाण्याअभावी ऊस रोपे जमिनीकडून मरू (जळू) लागली. पाऊस आल्यास त्यामध्ये सातत्य किती दिवस राहणार, ही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे यावर्षी उसाचे उत्पन्न घटण्याची शक्यता आहे.
- विलास हर्याण, शेतकरी, केळवली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT