नाशिक : जिल्ह्यात विविध भागात खरीप हंगामातील (Kharip Season) पिके काढणीच्या (Crop Harvesting)अवस्थेत असताना पावसाने तडाखा दिला. त्यामुळे मका, बाजरी, सोयाबीन या पिकांचे पावसात भिजल्याने नुकसान वाढले आहे. जिल्ह्यात उत्तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान असून सोयाबीन शेंगा, मका व बाजरीच्या कणसांना मोड आले आहेत. त्यामुळे शिवरातच नुकसान झाल्याने काढणीपूर्वीच माल खराब झाला आहे.
गेल्या सप्ताहात जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे निफाड, येवला, सटाणा, मालेगाव, चांदवड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यातच सटाणा, नांदगाव, सिन्नर तालुक्यांत पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी धास्तावले आहेत. अनेक ठिकाणी काढणी झाली आहे. तर काही ठिकाणी सोंगणीविना शिल्लक राहिलेली पिके पावसात भिजल्याने नुकसान वाढते आहे.
सततच्या पावसामुळे शिवारात पाणी साचल्याने सोंगणी करताना अडचणी येत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी सोंगणी केल्यानंतर खळ्यावर आणलेली पिके पावसात भिजल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे उत्पादनात घट येण्यासह काढणीपश्चात प्रतवारीचा प्रश्न उभा आहे.
रविवारी (ता. १७) सटाणा तालुक्यात पावसाची पुन्हा हजेरी लावली आहे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव परिसरात जोरात पाऊस झाला. ज्यामध्ये नांदगाव हिसवळ, वेहेळगाव, मनमाड परिसरात मध्यम हलक्या सरी झाल्या. सिन्नर तालुक्यांच्या पूर्व भागातील वावी, शहा तर येवला तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, पाटोदा, सावरगाव, जलगाव भागात पावसाने दणका दिला आहे. जोरात पाऊस नसला तरी होणाऱ्या सरीमुळे माल भिजून खराब होत आहे. मालेगाव, नांदगाव तालुक्यांत पाऊस झाला. त्यामुळे वेचणीला आलेला कापूस ओला झाला आहे. तर काही ठिकाणी तो गळून जमिनीवर पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
जिल्ह्यात खरीप पिकांचे ३५ टक्क्यांपर्यंत नुकसान
जिल्ह्यात मका २,३६,९२९, बाजरी ६७,१३२ तर सोयाबीन १,१८,२१८ हेक्टरवर पेरणी झालेल्या होत्या. त्यापैकी गेल्या सप्टेंबर महिन्यात व चालू ऑक्टोबर महिन्यात झालेली अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापणी अवस्थेत पेरणीच्या तुलनेत अनुक्रमे ३५,२५ व ३० टक्के नुकसान असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पेरणीच्या तुलनेत उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. तर काढलेली पिकांची प्रतवारी घटल्याने दराला मोठा फटका बसणार आहे, असे शेतकऱ्यांनी कळविले आहे.
सोयाबीन ज्या ठिकाणी सोंगून ठेवली होती, तिथे दाणे सडून गेले. ज्यांची सोयाबीन उभी होती त्या ठिकाणी दाणे काळे पडल्याचे दिसून येत आहेत. अनेक भागांमध्ये सोयाबीन गळून त्या दाण्यांना मोडदेखील आले आहेत.
- सचिन होळकर,
शेतकरी, लासलगाव, ता. निफाड.
मक्याच्या दाण्याला कोंब आहे. काही प्रमाणात, सोयाबीन काढायची बाकी आहे. आता जर पाऊस आला तर मोठे नुकसान होईल.
- दीपक खैरनार,
शेतकरी, आखावाडे, ता. सटाणा.
बाजरी व सोयाबीन पिके कापणी करून खळ्यावर आणली होती; मात्र पावसाचे पाणी त्यात शिरल्याने कष्ट करून केलेल्या मालाचे नुकसान झाले आहे.
- सचिन कडलग,
शेतकरी, विंचूर, ता. निफाड.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.