Akola News : या भागात यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला जवळपास एक महिना पाऊस न आल्याने पेरण्यांचा कालावधी लांबला आहे. याचा विपरीत परिणाम मूग, उडीद पिकाच्या लागवडीवर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंगळवार (ता. ११) पर्यंत झालेल्या पेरण्यांची स्थिती पाहता या दोन्ही पिकांची लागवड सरासरीच्या जेमतेम २० टक्के क्षेत्रावरही झालेली नाही.
पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये मिळून आतपर्यंत मुगाची अवघी तीन हजार हेक्टरपर्यंत लागवड होऊ शकलेली आहे. वास्तविक या पिकाचे सुमारे ५४ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. अशीच स्थिती उडीद पिकाचीसुद्धा आहे. उडदाचे सरासरी क्षेत्र ४५ हजार हेक्टरपर्यंत असून आतापर्यंत केवळ २७०० हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे.
मूग, उडदाची लागवड प्रामुख्याने जून महिन्यात पेरण्या झाल्या तर अधिक साधतात. उशिरा पेरण्या होत असल्याने या पिकांचे बहुतांश क्षेत्र हे सोयाबीन किंवा कपाशी या पिकांखाली येण्याची शक्यता आहे. कमी कालावधीत येणारी ही दोन्ही पिके खरीप हंगामात फायदेशीर मानली जातात. मात्र, मागील काही वर्षात सातत्याने पावसामुळे या पिकांचे काढणीच्या काळात नुकसान होत आलेले आहे.
लावलेला खर्चसुद्धा शेतकऱ्यांचा निघालेला नव्हता. दोन वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यात मुगाचे पीक व्हायरसने संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या हातातून गेले होते. इतर जिल्ह्यातही असाच फटका बसला. यामुळे आधीच लागवड क्षेत्राला उतरती कळा लागली होती.
त्यातच यंदा उशिराने पाऊस दाखल झाल्याने पेरण्यांनाही विलंब झाला. त्यामुळे आता बरेच शेतकरी मूग, उडदाऐवजी दुसरे पीक घेण्यास पसंतीची शक्यता आहे. या दोन्ही डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र सातत्याने घटत असल्याने चिंताजनक परिस्थिती बनलेली आहे.
राज्यस्तरावरही चिंताजनक स्थिती
राज्यात मुगाचे ३ लाख ९३ हजार ९५७ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी केवळ १६ टक्के म्हणजे ६४ हजार ४०८ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. तर, उडदाचे तीन लाख ७० हजार २५२ हेक्टर क्षेत्र असून आजवर ५२ हजार ७७८ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी १४ टक्केच लागवड होऊ शकलेली आहे. सध्या पेरण्या सुरू झालेल्या असून संपूर्ण लागवडीनंतरच या दोन्ही पिकांची किती लागवड झाली हे स्पष्ट होईल.
झालेली प्रत्यक्ष लागवड
जिल्हा मूग टक्के उडीद टक्के
बुलडाणा १५६३ हेक्टर ८ टक्के १७४८ ८
अकोला ७२४ ४ ५५३ ५
वाशीम ३३२ ४ ३७८ ४
जिल्हानिहाय सरासरी क्षेत्र
जिल्हा मूग सरासरी उडीद सरासरी
बुलडाणा २०४०६ २२६९५
अकोला १७६१५ ११४६०
वाशीम १५७२९ १०४९१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.