Soybean Crop News : देशात चालू हंगामातील सोयाबीन लागवड गेल्यावर्षीपेक्षा तब्बल १८ टक्क्यांनी पिछाडीवर दिसत आहे. यंदा राजस्थान आणि गुजरातमध्ये लागवड वाढली. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील लागवड कमी दिसते. महाराष्ट्रातील लागवड तब्बल ५८ टक्क्यांनी पिछाडीवर दिसते, असो सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपाने म्हटले आहे.
सोयाबीन लागवडीचा कालावधी मुख्यतः जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत समजला जातो. सध्या सोयाबीन लागवड पूर्ण वेगाने सुरु आहे. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. परिणामी चालू हंगामात या दोन्ही राज्यांमधील सोयाबीन लागवड आघाडीवर आहे.
पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सोयाबीन लागवड पिछाडीवर दिसते. देशात ९ जुलैपर्यंत ६३ लाख ५४ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. मागील हंगामात याच काळातील लागवड जवळपास ७८ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच आतापर्यंत सोयाबीनचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा १८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे.
मध्य प्रदेशात आतापर्यंत ३७ लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला. मागील हंगामात याच काळातील लागवड जवळपास ३९ लाख हेक्टरवर होती. म्हणजेच मध्य प्रदेशातील घट कमी आहे. कर्नाटकातील लागवडही गेल्यावर्षीच्या ४ लाख हेक्टरवच्या तुलनेत यंदा ३ लाख हेक्टरपर्यंतच पोचली.
पण राजस्थानमध्ये सोयाबीनचा पेरा जवळपास ५० टक्क्यांनी वाढला. गेल्या हंगामात ९ जुलैपर्यंत राजस्थानमध्ये ७ लाख हेक्टरवर सोयाबीन होते. पण यंदा जवळपास ११ लाख हेक्टरवर लागवड झाली. गुजरातमध्येही लागवड लक्षणीय वाढ झाली आहे.
देशातील एकूण लागवड क्षेत्राचा विचार करता निम्म्यापेक्षा अधिकची लागवड पूर्ण झाली. सोपाच्या मते यंदा सोयाबीन लागवडीत गेल्यावर्षीपेक्षा २ ते ३ टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामात १५ जुलैला लागवड संपूण ११३ लाख हेक्टरवर क्षेत्र सोयाबीनखाली आले होते.
यंदा गुजरात आणि राजस्थानमध्ये लागवड जास्त दिसते. पण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात लागवड कमीच राहण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात यंदा सोयाबीनऐवजी कापूस तुरीला शेतकरी पसंती देत आहेत.
सोयाबीन हे देशातील महत्वाचे तेलबिया पीक आहे. खरिपातील जवळपास १२० लाख हेक्टर क्षेत्र या पिकाखाली असते. त्यातही महाराष्ट्राचा देशातील एकूण क्षेत्रातील वाटा मोठा आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड झाली होती. पण यंदा महाराष्ट्रातील लागवडही माघारली.
महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ ११ लाख हेक्टरवरच सोयाबीनची लागवड झाली. मागील हंगामात २६ लाख १३ हजार हेक्टरवर या कालावधीपर्यंत लागवड होती. म्हणजेच यंदा लागवड तब्बल ५८ टक्क्यांनी पिछाडीवर आहे, असे सोपाने स्पष्ट केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.