Parbhani News : परभणी जिल्ह्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत गरजेच्या वेळी पिकांना देण्यासाठी युरिया खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवार (ता. २७)पर्यंत ५ हजार २४६ टन युरिया खत शिल्लक होते. बफर साठ्यातून ४०० टन युरिया खुला करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्यातील युरिया खताचा सरासरी वापर ३५ हजार २०० टन आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी यांच्याकडून ६२ हजार ४०० टन युरिया खताची मागणी केली होती. परंतु कृषी आयुक्तालयाकडून ३३ हजार ४९० टन साठा मंजूर केला आहे.
जुलैअखेर युरियाचा ३१ हजार १४६ टन खतासाठा मंजूर आहे. मार्चअखेर ११ हजार ५८४ टन युरिया शिल्लक होता, तर १ एप्रिलपासून १३ हजार १५७ टन युरिया खताचा पुरवठा झाला. त्यामुळे एकूण २४ हजार ७४१ टन युरिया उपलब्ध झाला होता. गुरुवार (ता. २७) पर्यंत १९ हजार ४९५ टन युरियाची विक्री झाली, तर ५ हजार २५६ टन युरिया शिल्लक होता. यंदा युरियाचा १ हजार २९० टन खतसाठा संरक्षित (बफर स्टॉक) केला होता.
यंदा जून महिन्यात अल्प पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या पंधरवाड्यातही पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे खतांची मागणी कमी राहिली. परंतु रविवार (ता. १६)पासून जिल्ह्यात एक, दोन दिवस वगळता पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचून राहत आहे. नाले, नद्या काठच्या, सखल भागातील जमिनी चिभडण्याच्या स्थितीत आहेत. अनेक भागांत वाफसा खुरपणी, कोळपणी आदी आंतरमशागतींची कामे करणे अशक्य होत आहे.
त्यामुळे पिकांमध्ये तणांची वाढ झाली आहे. सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून युरिया खताची मागणी वाढली आहे. परंतु कृषी केंद्रावर युरिया मिळत नाही.
काही भागांत युरियाची कृत्रिम टंचाई करून जादा दराने विक्री सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. पिकांना देण्यासाठी पुरेशी प्रमाणात युरिया उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागणी लक्षात घेऊन बफर स्टॉकमधून ४०० टन युरिया खुला केला आहे.येत्या काही दिवसांत युरिया उपलब्ध होईल. इतर ग्रेडची खते उपलब्ध आहेत.- दीपक सामाले, जिल्हा कृषी विकास अधिकारी, परभणी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.