Team Agrowon
देशात यंदा युरिया उत्पादनात १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात युरियाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आयातही ३७ टक्क्यांनी वाढली. पण एप्रिल आणि मे महिन्यातील युरियाची विक्री कमी झाली आहे.
या दोन्ही महिन्यांमध्ये ३१ लाख टन युरिया विकला गेला. गेल्या हंगामात या काळातील युरियाची विक्री ३२ लाख ३० हजार टन होती, असे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.
देशात खरिपाच्या पेरण्या मे महिन्यापासून जोर धरतात. सिंचनाच्या व्यवस्था असलेल्या भागांमध्ये देशात माॅन्सून दाखल होण्याच्या आधीच पेरण्या होतात. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात पाऊस चांगला झाला होता. यामुळे काही भागातील पेरण्या मे महिन्यातच आटोपल्या.
उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात जवपास १२ लाख टन युरियाची विक्री झाली होती. तर मे महिन्यात १९ लाख ४० हजार टनांची विक्री झाली. या दोन्ही महिन्यांमध्ये युरियावरील अनुदान १६ हजार १३३ कोटी रुपये होते. त्यापैकी एप्रिल महिन्यातील अनुदान ६ हाजर ८६७ कोटी आणि मे महिन्यातील अनुदान ९ हजार २६५ कोटी रुपये होते.
माॅन्सून आता काही भाग सोडल्यास संपूर्ण देश व्यापला. अनेक भागांमध्ये पाऊसही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना गती दिली. परिणामी जुलै महिन्यात खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
देशात एरवी एप्रिल आणि मे महिन्यात युरियाची जवळपास ४९ लाख टनांची मागणी असते. त्यापैकी खत कंपन्यांकडून ६४ टक्क्यांची विक्री झाली. खत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील हंगामात माॅन्सून उशीर आला नव्हता. तसेच एल निनोची स्थितीही नव्हती.