Old Pension Scheme Protest Agrowon
ताज्या बातम्या

Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी संपामुळे कृषीसह संलग्न सेवा ठप्प

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.१४) पुकारलेल्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील कृषी व संलग्न सेवा ठप्प झाल्या.

Team Agrowon

Pune News पुणे ः जुनी निवृत्तिवेतन योजना लागू (Old Pension Scheme) करण्याच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता.१४) पुकारलेल्या बेमुदत संपामुळे राज्यभरातील कृषी व संलग्न सेवा ठप्प (Agriculture Scheme) झाल्या. कृषी सचिवालय, कृषी आयुक्तालय, कृषी विद्यापीठांमधील दैनंदिन सेवा विस्कळित झाल्या.

राज्यस्तरीय सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने बेमुदत संपाची हाक दिली आहे.

पहिल्याच दिवशी १७ लाख कर्मचारी संपात सहभागी झाले. राज्यभरातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, कृषी विभागाची मंडले, तालुका व जिल्हा कार्यालये, कृषी विद्यापीठे व संशोधन केंद्रे तसेच महसूल कचेऱ्या, रुग्णालयांमध्ये काम होऊ शकले नाही.

त्यामुळे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे हाल झाले. राज्यातील खासगी व सरकारी सार्वजनिक सेवा केंद्रांमध्येही काम न झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय झाली.

कृषी आयुक्तालय, साखर संकुल, कृषी भवनातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाले होते. कृषी आयुक्तालयाचे मुख्यालय असलेल्या पुण्यातील सरकारी मध्यवर्ती इमारतीत सकाळपासून विविध संघटनांचे व खात्यांचे कर्मचारी जमा होत होते.

त्यामुळे या इमारतीच्या आवाराला जत्रेचे रूप आले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने व घोषणाबाजी केली. संपामुळे कृषी संबंधित जलसंपदा, भूमी अभिलेख, जमाबंदी, दस्तनोंदणी, दुग्धविकास, पशुसंवर्धन या विभागाच्या सर्व कार्यालयांमधील सेवा विस्कळीत झालेल्या होत्या.

जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्यासाठी एका बाजूला संप सुरू असतानाच राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांनीही आंदोलन छेडले. योग्य वेतन श्रेणी मिळण्यासाठी सामुदायिक रजा टाकून सरकारी कार्यालयांसमोर नायब तहसीलदारांनी धरणे धरले. त्यामुळे तहसीलदार कार्यालयांमध्येही कामकाज होऊ शकले नाही.

...अन्‌ वसंतदादांची रोखठोक भूमिका

मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यात शेकडोवेळा वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने केली. मात्र संघटनेने पुकारलेले तीन संप गाजले.

पहिला बारा दिवसांचा मोठा संप तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या काळात १९७० मध्ये झाला. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुन्हा १९७५ मध्ये संप केला व ३७ दिवस चालला.

तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या काळात १९७८ मध्ये सर्वात मोठा म्हणजे ५४ दिवसांचा संप झाला. परंतु “तुम्ही काहीही करा. मी तुमच्या मागण्या मान्य करणार नाही,” अशी रोखठोक भूमिका वसंतदादांनी घेतली.

त्यामुळे दीड महिन्यानंतर संपकरी कर्मचारी शेवटी कंटाळले आणि बिनशर्त कामावर हजर झाले. संपाच्या या आठवणी सध्याच्या बेमुदत आंदोलनाच्या निमित्ताने सरकारी कचेऱ्यांमध्ये रंगवून सांगितल्या जात आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT