Dheeraj Kumar
Dheeraj Kumar Agrowon
ताज्या बातम्या

कृषी आयुक्तपदाची तात्पुरती सूत्रे रावसाहेब भागडे यांच्याकडे

टीम ॲग्रोवन

पुणे ः कृषी आयुक्त (Agriculture Commissioner) धीरज कुमार (Dheeraj Kumar) एक महिन्याच्या रजेवर गेले असून त्यांच्या बदलीची चर्चा क्षेत्रिय पातळीवर रंगली आहे. मात्र, आयुक्तांची बदली झालेली नसून ते प्रशिक्षणासाठी परराज्यात गेल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

भारतीय प्रशासकीय सेवेतील महाराष्ट्र संवर्गाच्या २००५ च्या तुकडीतील धीरज कुमार या आधी उत्तर प्रदेशच्या समाज कल्याण मंत्रालयात कार्यरत होते. कृषी व ग्रामविकासात विशेष रुची असलेल्या धीरज कुमार यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विदर्भात उत्तम काम केलेले होते. त्यामुळे कृषी आयुक्तपदाची सूत्रे घेताच एक महिन्यात त्यांनी कृषी विभागाची घडी बसवली. आयुक्तालयाच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही अधिकाऱ्यांवर त्यांनी विश्वास टाकला; तर कामचुकार अधिकाऱ्यांची बेधडक कानउघाडणी करण्याची पद्धत त्यांनी अवलंबिली. त्यामुळे आयुक्तांनी प्रशासनावर तत्काळ वचक बसविला.

आयुक्तांच्या बदलीची चर्चा सुरू झाली ती त्यांना पदोन्नती मिळाल्यापासून. ‘‘कृषी आयुक्त झाल्यानंतर धीरज कुमार यांना केवळ पाच महिन्यांत सचिवपदी पदोन्नती देण्यात आली. सचिव श्रेणीत इतरत्र चांगल्या पदावर त्यांची बदली होण्याची शक्यता होती. मात्र, शासनाने त्यांच्या पदोन्नतीचे आदेश काढतानाच सध्याच्याच म्हणजेच कृषी आयुक्त या पदावरच त्यांना पदोन्नती देण्यात आल्याचे नमूद केले. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीची चर्चा थंडावली होती. आता ते एक महिन्याच्या रजेवर गेले आहेत. या कालावधीत अन्यत्र बदली होण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे,’’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

प्रशासनातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘धीरज कुमार हे नियमित प्रशिक्षणासाठी एक महिनाभर मसुरी येथे गेलेले आहेत. प्रशिक्षण पूर्ण होताच ते १२ ऑगस्टनंतर आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारतील.’’

एका अधिकाऱ्याने सांगितले, की आयुक्त सध्या प्रशिक्षणाला गेले असल्याचे सांगितले जात असले तरी ते वैयक्तिक कारणास्तव प्रशिक्षणात तूर्त तरी सहभागी झालेले नाहीत. अर्थात, काही दिवसानंतर ते पुन्हा प्रशिक्षणात सहभागी होऊ शकतात. मात्र मधल्या काळात ते बदलीसाठीदेखील प्रयत्न करू शकतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र बदलीच्या या चर्चेत काहीही तथ्य वाटत नाही. ‘‘धीरज कुमार यांना आयुक्तपदी अद्याप तीन वर्षे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे त्यांची अचानक बदली होण्याची शक्यता नाही. त्यांनी ठरविल्यास किंवा राज्य सरकारचे नवे मंत्रिमंडळ आल्यानंतर नव्या कृषिमंत्र्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी या पदावर आणायचा असेल तरच धीरज कुमार यांची बदली होऊ शकेल. मात्र सध्या तशा दोन्ही शक्यता दिसत नाहीत.’’

सुस्तावलेल्या कृषी विभागात धीरज कुमार यांनी साप्ताहिक बैठकीची प्रथमच पद्धत लागू केली. त्यात ते कामाचा सूक्ष्म आढावा घेतात आणि झाडाझडतीही करतात. ‘‘आयुक्त रजेवर गेल्यामुळे या बैठकी बंद पडतील, अशी अटकळ काही अधिकाऱ्यांनी बांधली होती. मात्र, आता त्यांच्याऐवजी स्वतः कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले बैठकांना मार्गदर्शन करीत जाब विचारतात. तसेच प्रभारी आयुक्तदेखील उशिरापर्यंत कामकाज बघत असल्यामुळे काही कामचुकार अधिकाऱ्यांना अद्यापही मोकळीक मिळालेली नाही,’’ अशी माहिती आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

प्रभारी आयुक्तपदी रावसाहेब भागडे

धीरज कुमार रजेवर गेल्यामुळे कृषी आयुक्तपदाची सूत्रे राज्य शासनाच्या मान्यतेने रावसाहेब भागडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. भागडे सध्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. ते मुळचे महसूल विभागातून आलेले असून यापूर्वी महाराष्ट्र शेती विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांनी कामकाज पाहिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Production : वाढत्या उष्णतेचा पशुधनावर थेट परिणाम, मुदतपूर्व प्रसूतीच्या घटनांत वाढ

Climate Change : जो स्वतःला बदलेल, तोच टिकेल

River Pollution : नदी प्रदूषणाबाबत गंभीर कधी होणार?

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

SCROLL FOR NEXT