Raigad Rain Agrowon
ताज्या बातम्या

Raigad Rain : रायगडला मुसळधार पावसाने झोडपले

Raigad Rain Update : मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने आपत्ती विभाग दक्ष झाला होता.

Team Agrowon

Raigad Monsoon News : मुसळधार पावसामुळे खालापूर तालुक्यातील जनजीवन विस्कळित झाले असून पाताळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने आपत्ती विभाग दक्ष झाला होता. सतत तीन दिवस पडणाऱ्या पावसाचा जोर सोमवारी (ता. १७) रात्रीपासून वाढला. खालापूरामध्ये चोवीस तासांत २३१ मिमी पावसाची नोंद झाली.

रायगड जिल्ह्यात माणगावनंतर (२५४ मिमी) सर्वाधिक पाऊस खालापूर तालुक्यात पडला आहे. पाताळगंगा नदीची इशारा पातळी २०.५० मीटर इतकी आहे, तर धोकापातळी २१.५२ मीटर आहे. चोवीस तासांत विक्रमी पाऊस पडल्याने पाताळगंगा नदी इशारा पातळी ओलांडून (२१.२०मी.) धोक्याच्या पातळी ओलांडण्याच्या स्‍थितीत आहे.

पाताळगंगा नदीपात्रात सोमवारी मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून तहसीलदार आयुब तांबोळी यांनी, दरडप्रवण तसेच किनाऱ्यावरील रहिवासी भागाची पाहणी केली.

पाताळगंगा औद्योगिक वसाहतीत काही ठिकाणी दीड ते दोन फूट पाणी साचल्याने दुचाकीस्‍वारांना कसरत करावी लागली. दांड-आपटा रस्‍त्‍यावर आपटा गावाजवळ पाणी साचल्याने शाळांना सुटी जाहीर करण्यात आली होती.

खोपोलीत अनेक सखल भागात पाणी घुसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. मंगळवारी दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्‍याने पूरपरिस्‍थिती टळली, मात्र मासेमारी तसेच इतर कारणासाठी नदीकाठी जाऊ नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

कुंडलिकेने ओलांडली इशारा पातळी

रोहा : शहरातील कुंडलिका नदीने सोमवारी सायंकाळी इशारा पातळी ओलांडली. त्‍याअनुषंगाने नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पावसाचा फटका शहराबरोबरच ग्रामीण भागालाही बसला असून जनजीवन विस्‍कळित झाले आहे. तालुक्‍यातील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्‍याने नागरिकांचे हाल झाले. शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचल्‍याने खोलीचा अंदाज येत नसल्‍याने लहान-मोठे अपघाताच्या घटना घडल्‍या. तर खड्ड्यात पडून काही पादचारी जखमी झाले आहेत. वारंवार तक्रार करूनही खड्डे जैसे थे असल्‍याने नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्‍त करण्यात येत आहे.

मुरूडमध्ये १०१६ मिमी पाऊस

मुरूड ः तालुक्यात समाधानकारक पावसामुळे भात लावणीच्या कामाला गती आली. आतापर्यंत १०१६ मिमी पावसाची नोंद झाली असून राब वाढीसाठी पाऊस योग्य असल्याचे चित्र आहे. जवळपास ३० टक्के भात लागवड पूर्ण झाली असून आठ-दहा दिवसांत लावणी पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. तालुक्यात नद्या, पाटबंधारे दुथडी भरून वाहत आहेत. भात लागवड क्षेत्र ३२०० हेक्टर असले तरी खर्च परवडत नसल्‍याने बहुतांश शेतजमिनी पडीक आहेत.

पोलादपुरात दक्षतेचा इशारा

पोलादपूर ः गेल्‍या दोन दिवसांपासून सुरू असलेल्‍या संततधारेने पोलादपूर तालुक्‍याला झोडपून काढले आहे. सावित्री नदीसह इतर उपनद्या दुथडी भरून वाहत असून काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला. नदीकिनारी तसेच डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून आपत्‍कालीन परिस्‍थिती उद्‌भवल्‍यास त्‍वरित स्‍थलांतरित होण्याच्या सूचना करण्यात आल्‍या आहेत.

भेरवमधील अंबा नदीवरील पूल पाण्याखाली

पाली : कोकणासह रायगड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पुढील पाच दिवस अतिवृष्‍टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सुधागड तालुक्यातील अंबा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून भेरव येथील अंबा नदीच्या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली. मंगळवारी दुपारपर्यंत भेरव नदीवरील पूल पाण्याखाली होता. भेरव पूल पाण्याखाली गेल्यामुळे आजूबाजूच्या गावांचा संपर्क तुटला. पुलाच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काहींनी उद्धरमार्गे प्रवास केला.

पातळगंगेचे पाणी रसायनीतील रस्त्‍यावर

रसायनी : रसायनीत सोमवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. पाताळगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्‍याने आपटा येथील बस थांबा, शंकराचे मंदिर परिसर आणि मुख्य दांड-पेण रस्‍ता पाण्याखाली गेला. परिणामी आपटे, पेण, उरणकडे जाणारी वाहतूक पूर ओसरेपर्यंत चावणेमार्ग वळवण्यात आली होती.

वासांबे-मोहोपाडा, पनवेलकडे जाणाऱ्यांची मात्र यामुळे गैरसोय झाली. दुपारनंतर वाहतूक आपटेमार्गे पूर्ववत झाल्‍याचे रसायनी पोलिसांनी सांगितले. पातळगंगा नदीची पातळी वाढली की मुख्य रस्‍त्‍यावर तीन ठिकाणी पाणी येत असल्‍याने वाहतूक ठप्प होती.

काथोड धबधब्यावर बंदोबस्‍ताची मागणी

पेण : पेणपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्‍या सातेरिया दुर्गम भागात काथोड धबधब्‍यावर पर्यटकांच गर्दी होत आहे. गेल्‍या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. याठिकाणी धोक्‍याचे फलक लावले असले तरी पर्यटकांना वर्षासहलीसाठी मोठ्या संख्येने येत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी याठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्‍थानिकांकडून होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar | अतिवृष्टीने पिकांचे नुकसान, शेतकरी संकटात, सरकारने लक्ष द्यावे- शरद पवार

Crop Advisory: कृषी सल्ला: कोकण विभाग

Trade War: व्यापारयुद्धात शेतकऱ्यांचे हित सांभाळा!

Agriculture Growth Rate: आकड्यांत अडकलेला विकास

Rain Crop Damage: पावसाने सोयाबीन, कापूस पिकांची हानी

SCROLL FOR NEXT