Akola News : महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाच्या (एमएआयडी) गोदामात ठेवलेला कीटकनाशकांचा ३८ लाख ९१ हजार रुपये किमतीचा साठा गायब झाला आहे. याबाबत विभागीय व्यवस्थापक सी. पी. साळुंखे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
तक्रारीनुसार, ‘एमएआयडी’च्या विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर मंदार वाशीमकर (रा. गायत्रीनगर, हिंगणा रस्ता, अकोला) हे कर्मचारी असल्यामुळे त्यांच्याकडे लिपिक, भांडारपाल म्हणून तत्कालीन विभागीय व्यवस्थापकांनी कार्यभार सोपवला होता.
या कार्यालयाकडून येथील एमआयडीसी क्रमांक चारमध्ये गोदाम भाडे तत्त्वावर घेण्यात आले. या गोदामाच्या चाव्या सुरवातीपासून वाशीमकर यांच्याकडे होत्या. महामंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार मार्चअखेर साठा पडताळणी करण्यात आली.
३१ मार्च २०२१ रोजी अकोल्यातील विशाल ट्रान्सपोर्ट कंपनीकडे कीटकनाशकांचा साठा पाठवून त्यांच्या सही व शिक्क्यानिशी पोहच पावती या कार्यालयात सादर केल्या होत्या. त्यांनी तेव्हा संपूर्ण साठा हा हस्तांतरित केला. मात्र या व्यवहारात ३८ लाख ९१ हजार १९५ रुपये किमतीचा साठा पुरविल्याबाबत बनावट चलने सादर करण्यात आली.
दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर याबाबत वाशीमकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यांनी समाधानकारक खुलासा सादर न करता महामंडळाची दिशाभूल केली, असे पोलिस तक्रारीत साळुंखे यांनी म्हटले आहे.
ट्रान्स्पोर्ट कंपनीचे सही व शिक्के सुद्धा बनावट असल्याचेही समोर आले आहे. २९ जुलैला याबाबत पोलिस तक्रार दाखल झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी वाशीमकर यांच्याविरुद्ध फसवणुकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला.
कीटकनाशकांची विल्हेवाट कुठे?
‘एमएआयडी’च्या गोदामातील सुमारे ३८.९१ लाख रुपयांची कीटकनाशके मिळत नसल्याची अफरातफर समोर आली आहे. संबंधिताने ही कीटकनाशके कुणाला व कशी विकली याबाबत चौकशीची गरज आहे.
ज्यांनी हा माल विकत घेतला त्यांनासुद्धा आता चौकशीच्या फेऱ्यात आणणे आवश्यक आहे. हा प्रकार उघडकीस झाल्याने यापूर्वीही असे गुन्हे घडलेले असू शकतात, अशा शंकाही आता घेतल्या जात आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.