माणिक रासवेAgriculture Success Story : मांडाखळी (ता. जि. परभणी) येथील अल्पभूधारक शेतकरी रमेश राऊत यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, ताळेबंद मांडून त्यानुसार नियोजन यातून शेती यशस्वी केली आहे. गावातील सर्व सार्वजनिक व आध्यात्मिक कामांत ते हिरिरीने भाग घेतात. या सर्व कामांतूनही वेळ काढत त्यांनी वाचनाचा, लेखनाचा छंद जोपासला आहे. शेतीसोबत आयुष्याचा ताळेबंदही फायद्यात आणण्याची त्यांची धडपड असते. .मां डाखळी (ता. परभणी) येथील रमेश राऊत यांची धडपड बालमित्रांप्रमाणे शिक्षक व्हायची होती. पण तो योग काही जुळून आला नाही. मग घरची शेती करताना खर्च - उत्पन्नाचा ताळेबंद ठेवून, शक्य तिथे खर्चात बचत साधत नफ्याची शेती साधली आहे. तसे क्षेत्र कमी असले तरी एकविचाराने शेती करणारे राऊत दांपत्य समाधानी आहे. ते सांगतात, ‘‘मित्रांप्रमाणे शिक्षक झालो असतो, तर अर्ध आयुष्य नोकरीत आणि दुसऱ्यांची हांजी हांजी करण्यात गेलं असतं.’’ शेतीत उतरल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत भरपूर अडचणी, समस्या आल्या. आपल्या माणसांना सोबत घेत, मेहनतीने त्या सोडविल्या. शेती हा हक्काचा पर्याय आहे. त्यात आपल्या कुटुंबासह ताकदीने उतरू शकतो. नोकरीत, व्यवसायात तसं नसतं. प्रत्येक लढाई तुम्हाला एकट्याला लढावी लागते..तिथे येऊ शकणारे एकटेपण, कुटुंबापासूनचे तुटलेपण शेतीत जाणवतही नाही. अडीअडचणीमध्ये मित्रांना, एकमेकांना साथ देत पुढं गेलं तर शेती केवळ संघर्षाची नाही, मजेचीही होईल. असंच जगत गेलो.’’ ‘‘शेतीमध्ये संघर्ष मोठा आहे. त्यातही यश - अपयश दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू. पण कोणतंही अपयश अनुभव देतं. त्यातून मिळालेलं ज्ञान हे पुढच्या अनेक यशांना कारणीभूत ठरतं. म्हणूनच अपयशानंतर नैराश्यात जाण्यापेक्षा त्याकडे तटस्थपणे पाहता आलं पाहिजे. म्हणजे त्यातून शिकणं सोपं होतं. उदाहरणच द्यायचं झालं, तर यंदा प्रथमच करटुल्यांची लागवड केली. उत्पादनही सुरू झालं..Modern Fruit Farming : फळबागकेंद्रित शेतीतून शेती, कुटुंबाची प्रगती .परंतु आधी सतत रिमझिम पाऊस, शेवटी एका मोठ्या पावसात, जोराच्या वाऱ्याने अक्षरशः करटुल्याचा प्लॉट उपटून पडल्यासारखा झाला. घरच्यांना सोबत घेत हिमतीनं संपूर्ण प्लॉट उभा केला. दुसरी घटना म्हणजे सीताफळामध्ये सेटिंग सुरू असतानाच खूप फुलगळ झाली. वाटलं या वर्षीचा हंगामच हातचा जातोय की काय? पण हबकून जाण्यापेक्षा अनेकांशी चर्चा करत एकेक उपाय करत गेले अन् शेवटी यश मिळालं. एकेक उपाय साधत गेला, की होणारा आनंद काय वर्णावा... घेतलेले कष्ट सार्थकी लागल्याचे समाधान मोठे असते. शेती म्हणजे शास्त्र, कला, कौशल्य सारंच आहे. एखाद्या भरभरून मिळालेल्या यशामुळं बारीक-सारीक अनेक अपयश मागे पडतात. फक्त सातत्य, निष्ठा, अनुभव जपत राहिलं पाहिजे. मग जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही,’’ असे रमेश सांगतात..परभणीहून पाळोदी मार्गे मानवतकडे जाताना १४ किलोमीटरवर मांडाखळी हे प्रमुख गाव लागतं. मांडव्य ऋषीनी येथे तपश्चर्या केली होती. गावात मांडव्य ऋषीचे प्राचीन मंदिर आहे. समोर बारव आहे. लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. दोन किलोमीटरवरच्या माळावर इंद्रायणी देवीचे मंदिर आहे. गावातील सुज्ञ मंडळी एकत्र येत ऑगस्ट १९६२ मध्ये मांडव्य ऋषी विद्यालय शैक्षणिक संस्था स्थापन केली. साहजिकच गावात शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे. नोकरदारांची संख्या भरपूर. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, त्यातही तब्बल अडीचशे शिक्षक आहेत. संत्रा उत्पादकांचं गाव म्हणूनही ओळख निर्माण झाली..मांडाखळीच्या जनार्दन व गवळणबाई राऊत दांपत्यांला एक मुलगी व पाच मुले अशी सहा अपत्ये. सर्वांत मोठ्या केशर, त्यानंतर भानुदास, बाळासाहेब, ज्ञानोबा, रमेश, महादेव ही भावंडं. रमेश यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत तर मांडव्य ऋषी विद्यालयातून १९९६ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. त्यापुढची दोन वर्षे परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक ट्रेड केला. नोकरी लागली नाही तर भविष्यात गावात स्वतःचा व्यवसाय करता यावा. हा त्यामागचा उद्देश. २००० मध्ये बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. शिकत असताना एकत्रित कुटुंबात आई, वडील, बंधूंसमवेत कधी गाई-बैल चारणे तर कधी खते पेरणी करणे, अशी बारीकसारीक कामे ते करत. त्यातून शेतीची गोडी लागली. एकत्रित कुटुंबातून शेती कामाचे संस्कार रुजले..Modern Farming: गोवेल गावात आधुनिक शेतीची क्रांती.दरम्यानच्या काळात गावात इलेक्ट्रिक साधने, कृषी पंपाच्या मोटारी दुरुस्ती, रिवाइंडिंगचे छोटेखानी दुकान सुरू केले. दिवसा १० ते ५ शेतीत, पण सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत दुकान उघडत असत. दिनक्रम पूर्ण बांधलेला. पण पदवीधर होण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. पूर्णवेळ शक्य नसल्यानं परभणी येथील महाविद्यालयामध्ये बहिःस्थ पद्धतीने बी.ए. साठी प्रवेश घेतला. दोन वर्षे पूर्ण केली. पण शेती आणि मेकॅनिकी कामामुळे अभ्यासासाठी वेळ मिळेना. पदवीधर होण्याचं स्वप्न मागं पडत गेलं. पुढे २००३ मध्ये हिश्शी (ता. सेलू) येथील मंदाकिनी यांच्याशी त्यांचे लग्न झाले. मग तर त्यांनी शेतीवरच लक्ष केंद्रित केले. शेतातील सर्व कामे घरातलेच सारे करायचे. वडील घरची १८ एकर शेती करायचे, परंतु चिबड जमीन पिकायची नाही. म्हणून मजुरी करावी लागायची. जुन्या काळात शेतात ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा हे ठरलेलं गणित होते..‘‘काळ बदलत गेला. लोकही बदलले. शेतीत बदल करणे गरजेचं होतं. घरचे तयार व्हायचे नाहीत. परंतु इतरांचे बघून हळूहळू मानसिकता बदलत गेली. ज्वारी, गहू, हरभरा, कपाशी ही पारंपरिक पिके हद्दपार न करता त्यांना मर्यादित जागा देऊ लागलो. वातावरणात बदल झाले. पाऊस बेभरवशाचा झालाय. अशा स्थितीत शेतीत तग धरायचा असला, तरी नवीन पीक पद्धती स्वीकारावी लागणार होती. प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे जवळच्या ११ शेतकऱ्यांनी ५५ हजार रुपये वर्गणी करून शेतातून जाणाऱ्या नाल्याचे सरळीकरण, खोलीकरण केलं. मग जादा पाण्याचा निचरा होऊ लागला. आता जमीन चिभडत नाही. विहिरीची पाणीपातळीही वाढली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) पहिल्या टप्प्यात आमच्या मांडाखळी गाावाची निवड झाली. अन् खऱ्या अर्थाने आमच्या शेतीला संजीवनी मिळाली. पोकराअंतर्गत संरक्षित सिंचनासाठी शेततळे उभारले..शेत तळ्याभोवती शेवगा लावला. संत्रा बागा लावल्या. बांधावर केसर, लंगडा, दशहरी, नीलम, गावरान आंबे, रामफळ, पेरू, फणस, नारळ, जांभूळ, चिकू आदी फळझाडांसह कडुलिंब, साग आदी झाडे लावली. सर्व भावांनी शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचे स्रोत बळकट केले. सहा वर्षांपूर्वी आम्हा भावांची कुटुंबे विभक्त झाली. माझ्या वाट्याला दोन ठिकाणी मिळून पावणेचार एकर जमीन आली. गावाजवळची पावणेदोन एकर, तर दोन किलोमीटवर दीड एकर. मध्यम ते भारी प्रकारची जमीन आहे. गावाजवळच्या दीड एकरावर सीताफळाची बाग, सिंचनासाठी शेततळे आहे. माझा, अर्धांगिनी मंदाकिनी, मुलगा योगेश, मुलगी साक्षी असा चार सदस्यांचा परिवार आहे. आम्ही दोघे पती-पत्नी शेती करतोय,’’ असे रमेश म्हणतात.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.