Family Framing Success : गोंडखेल (ता. जामनेर, जि. जळगाव) येथील जगतसिंह राजपूत व कुटुंबीयांनी रासायनिक अवशेषमुक्त पद्धतीचा अंगीकार करून शेती कमी खर्चिक केली. मातीचे आरोग्य सुधारले. आरोग्यदायी अन्नाची निर्मिती केली. निसर्ग, पशुपक्ष्यांचे महत्त्व जपले, पशुधन राखले. मालाचे मूल्यवर्धन करून थेट ग्राहक विक्री व्यवस्था उभारली. या सर्व नियोजनातून कुटुंबाने आपले जीवनमान उंचाविण्यासह मानसिक, शारीरिक व सामाजिक उन्नती साधली आहे. .जळगाव जिल्ह्यातील गोंडखेल (ता. जामनेर) गावातील शेती हलकी, मुरमाड, मध्यम अशा प्रकारची आहे. गावाच्या आजूबाजूला चार तलाव व जलसंधारणाची कामे काही वर्षांपूर्वी झाली आहेत. चांगला पाऊस झाल्यास जलस्रोत टिकून राहतात. कापूस हे गोंडखेलचे प्रमुख पीक. अलीकडे केळीची शेती वाढत आहे. याच गावचे जगतसिंह तोलसिंग राजपूत रासायनिक अवशेषमुक्त शेतीत मागील २७ वर्षांपासून निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून संग्रामसिंह आणि मंगलसिंह ही त्यांची मुलेही घरचा वारसा पुढे चालवत आहेत. जगतसिंह यांचे वय ६९ वर्षे आहे. मुले पन्नाशीच्या आत आहेत..Sustainable Agriculture : स्मार्ट पीक पद्धतीतून आर्थिक स्थैर्य.जगतसिंह यांनी पुणे येथील नामांकित महाविद्यालयात विज्ञान विषयातील पदवी घेतली. नोकरीच्या अनेक संधी त्या वेळेस होत्या. पण घरची एकत्रित कुटुंबाची सुमारे ३०० एकर जमीन त्या वेळेस होती. वडिलांनी नोकरी करू नको, शेतीच बघ असे सांगितले. आणि वडिलांची आज्ञा जगतसिंहानी शिरसावंद्य मानली. शेतीची जबाबदारी अंगावर आली तसे एकेक आव्हान समोर येऊ लागले. पण कधीच निराश न होता हिमतीने सामना करीत जगतसिंह पुढे चालत राहिले. अनेक चढ-उतार पाहिले. तोटेही सोसले. मोठा नफा, पैसा आल्यानंतरही पाय जमिनीवरच ठेवले..कमी मोबदल्यात जमीनगावानजीकच्या लघू सिंचन प्रकल्प, तलावासंबंधी कुटुंबाची जमीन अधिग्रहीत करण्यात आली. त्याची आठवण जगतसिंह सांगतात. या जमिनीचा मिळणारा अल्प मोबदला घेण्यासाठी जामनेरातील कार्यालयात बोलावणे झाले. मी व वडील तेथे पोहोचलो. दोन-तीन अधिकारी रोकड व यादी घेऊन बसले होते. ते नाव पुकारतील त्याने पुढे यायचे, सही करायची व पैसे घ्यायचे. एका शेतकऱ्याने मोबदला कमी मिळत असल्याचे म्हणताच अधिकारी चिडले. ते म्हणाले, की जो मोबदला आलाय तो घ्या. आम्ही तुमचे पैसे घेतले आहेत काय? त्या वेळी कोणीच शेतकरी प्रत्युत्तर करू शकला नाही. त्या वेळी आमची बाजू मांडायला प्रसारमाध्यमेही नव्हती. शेतकरी जागरूक नव्हते. तक्रारी कुठे व कशा करायच्या याचे ज्ञान नव्हते. त्या वेळी एकरी सुमारे सात हजार रुपये आम्हाला मिळाले. मोठी जमीन शासनाने घेतली. पुढे विभक्त झाल्यानंतर आपल्या वाट्याला ३२ एकर शेती आल्याचे जगतसिंह म्हणाले..रासायनिक अवशेषमुक्त शेतीची वाटचालशेतीच्या वाटण्या झाल्यानंतर जगतसिंह यांनी सुरुवातीला रासायनिक पद्धतीने शेती केली. कृषी विद्यापीठांच्या शिफारशी अभ्यासल्या. विविध पीक पद्धतीचे प्रयोग केले. पण अपेक्षित नफा मिळत नव्हता. शेतातील खर्च वाढता होता. पहिली दोन वर्षे ५० ते ६० हजारांचा सहन करावा लागलेला तोटा डोक्यातून जात नव्हता. त्यातूनच वडिलांनी रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करण्याचा सल्ला देत अवशेषमुक्त शेतीचा मंत्र दिला. रासायनिक निविष्ठांवरील खर्चात बचत करणारी ही शेती होतीच. परंतु ती आरोग्यदायी शेती देखील होती. हळूहळू या शेतीचा अभ्यास करीत, अनुभव घेत जगतसिंह पुढे चालले. बऱ्यापैकी नफाही राहू लागला. आर्थिक स्थैर्य येऊ लागले. मनाला समाधान, शांती मिळू लागली.आज राजपूत यांची संपूर्ण शेती बागायती आहे. लघू प्रकल्पांतून जलवाहिन्या केल्या आहेत. पाण्याच्या शाश्वतीसाठी शेततळ्याचा आधार आहे. प्रमुख पीक कापूस आहे. यंदा २० एकरांत कापूस, सात एकरांत मका व पाच एकरांत तूर- उडीद अशी पीकपद्धती आहे. कापसातही मुगाचे आंतरपीक असते. रब्बीत गहू, हरभरा ही पिके असतात..Sustainable Agriculture: शाश्वत शेतीसाठी आधुनिकतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक.मातीचे आरोग्य जपल्याचे समाधानराजपूत कुटुंबीयांनी मागील २७ वर्षे आपल्या ३२ एकर शेतीत रासायनिक खते व कीडनाशके यांचाही जराही वापर केलेला नाही. मातीतील सेंद्रिय कर्ब अपेक्षेपेक्षा अधिक असल्याचे माती परीक्षणातून दिसते. तसे प्रमाणपत्रही आहे. आपल्या जमिनीला रसायनांपासून मुक्त ठेवून तिचे आरोग्य जपल्याचे मोठे समाधान कुटुंबाला आहे. मका, कापूस बियाण्यांचा अपवाद वगळता गहू, हरभरा, तूर, उडीद, मूग आदींचे घरचेच बियाणे वापरण्यावर भर असतो. त्यातून बियाण्यांवरील खर्चही कमी केला आहे. गीर गाई, बैल, म्हैस आदी मिळून सुमारे ५३ पर्यंत पशुधन आहे. त्यांच्या मूत्र व शेणाचा शेतीत भरपूर वापर होतो. पिकांवरील फवारणीसाठी जिवामृत, दशपर्णी अर्क, वनस्पती अर्क यांचा वापर होतो. त्यासाठी तुषार सिंचनाचा आधारही घेतला जातो. कीड नियंत्रणासाठी पक्षिथांबेही उभारले आहेत. पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जातात..सर्वांचा शेतात राबताआंतरमशागत, तणनियंत्रण आदी कामांचा व्याप वाढल्यासच मजुरांची मदत घेतली जाते. अन्यथा शेतातील सर्व कामे स्वतः करण्यात राजपूत कुटुंबातील मंडळी पारंगत आहेत. संग्रामसिंह यांची पत्नी मनीषा, मंगलसिंह यांची पत्नी पूजा या देखील शेतीसह जनावरांच्या संगोपनात हिरिरीने पुढे असतात. जगतसिंह व कांताबाई या राजपूत दांपत्याने आयुष्यभर शेतीच केली. कुटुंबात कोणासही नोकरी नाही. घरातील प्रमुख मंडळीचा दिवस पहाटे सुरू होतो. सायंकाळपर्यंत शेतीतील कामांत कुटुंब व्यस्त असते. जामनेर येथेही कुटुंबाचे निवासस्थान आहे. तेथे मुलांच्या शिक्षणानिमित्त संग्रामसिंह यांचे वास्तव्य आहे. जामनेर ते गोंडखेल असे सात किलोमीटर रोज ये-जा करून संग्रामसिंह शेतीकडे लक्ष देतात. दिवाळीच्या सुट्टीत मुले देखील शेतात असतात. कापूस वेचणी, मळणीची कामे या कालावधीत उरकली जातात. मध्यंतरी तब्बल ५० क्विंटल मक्याची मळणी कुटुंबातील मंडळींनी कणसे वेचून करून घेतली होती. आपण शेतकऱ्यांची पोरं, शेतीत राबायचं, कामांची कसली लाज बाळगायची, असा प्रश्न राजपूत कुटुंबीय वितारतात.(संपूर्ण लेख वाचा २०२५ च्या अॅग्रोवन दिवाळी अंकात)अंक खरेदीसाठी लिंक- https://shorturl.at/TJmdc.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.