अकोला ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची (Agriculture University) ५० वी कृषी संशोधन व विकास समितीची बैठक (जॉईंट ॲग्रेस्को) (Joint Aggresco) उद्यापासून(ता.१४) पासून तीन दिवस दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात होत आहे. या बैठकीत येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील संशोधकांच्या ६३ संशोधन शिफारशी (Research Recommendation) सादर केल्या जातील. यात अवजारे, यंत्रे व संशोधन शिफारशींचा समावेश आहे.
अवजारे, यंत्रे प्रकारात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विकसित भुईमूग काढणी यंत्र, छोटा ट्रॅक्टरचलित कपाशी टोकण यंत्र, कपाशी खोड काढणी यंत्र, बॅटरी वाहनचलित फवारणी यंत्र, बॅटरीचलित कोळपणी यंत्र, विविध भाजीपाला बीज काढणी यंत्र, सौर जैवपदार्थ शुष्कक आणि अतिनील किरणोत्सर्ग यंत्र अशा आठ यंत्रांचा समावेश आहे.
संशोधन शिफारशींमध्ये उत्पादन तंत्रज्ञान प्रकारात मूग, बीटी कापूस, सेंद्रिय कपाशी, कपाशी, गहू, हरभरा पीक पद्धती, कपाशी- सोयाबीन आंतरपीक पद्धती, कापूस-उडीद आंतरपीक, एकात्मिक शेती पद्धती, पैरीव धान-गहू पीक पद्धती, पेरीव धान-तण व्यवस्थापण, जवस पीक, चांगल्या प्रतीचे गांडूळ खत निर्मिती, गांडूळ खत मूल्यवर्धन, रोपवाटिकेमध्ये वांगी, टोमॅटो व मिरची पिकाची वाढ वृद्धी करणारे जिवाणू एकत्रित मिश्रण, सोयाबीन पीक एकात्मिक व्यवस्थापन
कपाशी सोयाबीन पीक फेरपालट पद्धतीत अधिक उत्पादकता, उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन, कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन व कापशी, सफेद मुसळी मुळांच्या अधिक उत्पादनाबाबत मशागत, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा एकूण २३ शिफारशी आहेत. उद्यान विद्या घटकात संत्रा, ड्रॅगनफ्रुट, केळी, टरबूज, शिमला मिरची, बीटस्ट उत्पादनाबाबत मशागत, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या शिफारशी आहेत. संत्रा, द्राक्ष वाईननिर्मिती तंत्रज्ञान आहे. यात सात शिफारशी आहेत.
कृषी वनविद्यामध्ये वनशेतीमध्ये महारूख व बांबू लागवड तंत्रज्ञानाबाबत दोन शिफारशी केल्या जातील. कीटकनाशक घटकात तूर, हरभरा, मिरची, धान, सोयाबीन पिकांचे नियंत्रण व व्यवस्थापन तसेच तूर पीक साठवणूक दरम्यान किडींच्या नियंत्रणाबाबत सात शिफारशींचा समावेश आहे. वनस्पती रोगशास्त्र विभागात नागपूर संत्रा ग्रीनिंग रोग व्यवस्थापनाची एक शिफारस आहे.
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञानात बायोगॅसची गुणवत्ता व साठवणूक क्षमता वाढविणे, गवती चहा व तिखाडीचे अत्यावश्यक तेल काढण्यासाठी १६ वर्ग मिटर शेफलेर सोलर कलेक्टरची शिफारस, शेतावरील भाजीपाला साठवणूक करण्यासाठी शितक साठवणूक गृह, कवठ जेली बनविण्याचे तंत्रज्ञान, गहू व मका पिठापासून पास्ता बनविणे, जवस सुकामेवा लाडू तयार करणे, जवस ओट लाडू तयार करणे, जवसाचे मुखवास तयार करणे अशा नऊ शिफारशी आहेत.
पूर्व प्रसारणासाठी मका, राळ, कवठचे वाण
पशू संवर्धन व दुग्ध व्यवसायामध्ये आले व हळद पावडर मिश्रित कुल्फी तयार करण्याची एक शिफारस आहे. कृषी अर्थशास्त्र प्रकारात पीकेव्ही मिनी दाल मिलवर प्रचलित अनुदानामधे शासनाने वाढीव अनुदान देण्याबाबत शिफारस, मोसंबी पिकाच्या काटोल गोल्ड वाणास संशोधन व विस्तार करण्यासाठी शासनाने वाढीव अनुदान देणे अशा दोन शिफारशी आहेत. तर पूर्व प्रसारणाकरिता वाण घटकात मका ‘बीएमएच १८-२’, ‘राळा बीएफटीएम -८२’ व ‘कवठ एकेडब्ल्यूए-१’ असे तीन वाण ठेवले जातील, अशी माहिती विद्यापीठाच्या संशोधन विभागातून देण्यात आली.
तपशील असा...
प्रस्तावित अवजारे, यंत्रे - ०८
संशोधन शिफारशी - ५२
पूर्व प्रसारणाकरिता वाण - ३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.