Orange Peel Silage
Orange Peel Silage Agrowon
ताज्या बातम्या

Orange Peel Silage : संत्रासालीचा मुरघास शेळ्यांसाठी उपयुक्त

टीम ॲग्रोवन

अकोला ः विविध कारणांनी संत्रा, मोसंबी सारखी लिंबूवर्गीय फळे (Orange Fruit Fall) गळून पडतात. उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जातो. जमिनीवर पडलेल्या फळांना मागणी राहत नाही. अशा प्रसंगी या संत्रासालीचा मुरघास (Orange Peel Silage) तयार करून तो शेळ्यांच्या आहारात अपारंपरिक पूरक खाद्य वा पर्यायी खाद्य (Goat Feed) म्हणून वापरात आणता येऊ शकतो का, याची चाचपणी करण्यासाठी ‘माफसू‘च्या अकोला येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात प्रयोग घेण्यात आला. या प्रयोगाच्या आधारे संत्रा उत्पादक (Orange Farmer) आणि शेळीपालकांच्या दृष्टीने सकारात्मक बाबी समोर आल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.

विदर्भात संत्रा तसेच मोसंबीचे उत्पादन घेतले जाते. गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक कारणांनी नुकसानीला तोंड द्यावे लागते. वाया जाणाऱ्या फळांना फेकून देण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र ही फळे फेकून न देता त्याचा वापर पूरक पशुखाद्य म्हणून उपयोग होऊ शकतो काय यासाठी प्रयत्न केले जात आहे. स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात पशू उत्पादन व व्यवस्थापन विभागाचे सहायक प्रा. डॉ. गिरीश पंचभाई यांच्या मार्गदर्शनात डॉ. अर्चना एन. ही विद्यार्थिनी यावर काम करीत आहे.

संत्रा, मोसंबी यांसारखी फळे वा त्याची साल जनावर थेट खात नाहीत. कारण या फळांमध्ये असणारा आंबटपणा, शर्करेचे प्रमाण राहते. मात्र अपारंपरिक खाद्य म्हणून त्याचा वापर करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. म्हणूनच मुरघास तंत्राने संत्रा साल मुरवून त्याचा खाद्यात समावेश करण्याबाबत प्रयोग होत आहे. प्रयोगाच्या प्रारंभिक अवस्थेत अशा मुरवलेल्या संत्रा सालीचे खाद्य शेळ्या खाऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे हा प्रयोग वऱ्हाडी या स्थानिक जातीच्या शेळ्यांवरच करण्यात येत आहे.

...असा आहे संशोधन प्रयोग

शेळीला लागणाऱ्या खाद्याच्या प्रमाणात अनुक्रमे २५ टक्के, ५० टक्के संत्रा सालीचा मुरघास समाविष्ट करून त्यांच्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यात येत आहे. या प्रयोगासाठी संक्रमण काळातील म्हणजेच विण्याच्या तीन आठवड्यांच्या आधी आणि तीन आठवड्यानंतर अशा अवस्थेतील वऱ्हाडी शेळ्यांच्या तीन गटांत समावेश करण्यात आला आहे. पहिल्या गटाला मका मुरघास दिला जात आहे. दुसऱ्या गटाला २५ टक्के आणि तिसऱ्या गटाला ५० टक्के संत्रा सालीचा मुरघास दिला जात आहे. प्रयोगाच्या सद्यःस्थितीत शेळ्यांना संत्रा सालीचा मुरघास आवडलेला आहे. मुरघास खाल्ल्यानंतर पहिल्या काही दिवसांत याचे पचन चांगले झालेले दिसले. शेळीच्या लेंडीत काही बदल दिसून आलेला नाही.

अन्य दुधाळ जनावरांसाठी उपयुक्त

हा प्रयोग यशस्वी झाल्यास संत्रा मुरघासाचा समावेश म्हैस, गाय या सारख्या दुधाळ जनावरांकरिता करता येईल. त्यादृष्टीनेही हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे, असा विश्‍वास डॉ. गिरीश पंचभाई यांनी व्यक्त केला.

‘संत्रा साल मुरघासातील अन्न घटक

संत्रा सालीच्या मुरघासामध्ये क्रूड फायबर २० ते २२ टक्के, क्रूड प्रोटीन ७ ते ८ टक्के, विद्राव्य साखर १० ते १२ टक्के, अन्य आवश्यक तैलद्रव्य, ॲण्टिऑक्सिडन्ट्स, कॅरॅटिनॉइड, जिरॉऑनाइड असे पोषक घटक आहेत. यांचा आहारात समावेश झाल्याने शेळीची रोगप्रतिकारक शक्ती, दुग्धोत्पादन आणि वजन वाढेल असा शास्त्रज्ञांचा अनुमान आहे.

संत्रा, मोसंबी सालीचा मुरघास बनविण्याची प्रक्रिया

मुरघास करण्यासाठी संत्रा किंवा मोसंबीच्या फळांची साल काढावी. आवश्यकतेनुसार ५०, १०० किंवा ५०० किलो क्षमतेच्या थैल्यांमध्ये त्या दाबून भराव्या. एक लिटर पाण्यात ५० ग्रॅम गूळ विरघळवून हे मिश्रण थैलीतील सालींवर टप्प्याटप्प्याने शिंपडावे. एक क्विंटल सालींसाठी २ ग्रॅम प्रोबायोटिक मिक्श्‍चर थैलीत मिसळावे. संत्रा किंवा मोसंबी साल भरताना थैलीमध्ये हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी. साली भरताना मध्येच एखादा कुटाराचा थर द्यावा. पूर्ण थैली हवाबंद करावी. २१ दिवसांत हे मुरघास शेळ्यांना खाण्यायोग्य होते, असे डॉ. पंचभाई यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT