Chhatrapati Sambhaji Nagar News : मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा केवळ ३८ टक्केच शिल्लक आहे. मध्यम आणि लघू प्रकल्पांची अवस्था दयनीय झाली असून ५१ लघू मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. जायकवाडीत केवळ ३४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षांतील सप्टेंबर १५अखेरची ही प्रकल्पांची पाणीसाठा स्थिती नीचांकी पातळीवर आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठवाड्यात यंदा पावसाने चांगलीच दडी मारली. नदी नाल्यांना पूर येईल असा पाऊस क्वचितप्रसंगीच व काही भागांतच झाला. त्यामुळे पाणी ना शेतात साचले, ना शिवारात, ना प्रकल्पात. जलसंपदा विभागाच्या १५ सप्टेंबरअखेरच्या अहवालानुसार मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ४५.३१ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यातही सर्वांत मोठा जायकवाडी प्रकल्पात केवळ ३४ टक्के उपयुक्त पाणी आहे.
निम्न दुधना प्रकल्पात २५ टक्के, बीडमधील मांजरा प्रकल्पात २४ टक्के तर माजलगाव प्रकल्पात केवळ १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येलदरीत ६१ टक्के, सिद्धेश्वरमध्ये ५८ टक्के, निम्न तेरणा व निम्नमणार प्रकल्पात प्रत्येकी ५९ टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात सर्वाधिक ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील १६ व बीडमधील १६ प्रकल्पांमध्ये सरासरी १६ टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
दुसरीकडे जालन्यातील सात प्रकल्पात २१ टक्के, लातूरमधील आठ प्रकल्पात २० टक्के, धाराशिवमधील १७ प्रकल्पात १४ टक्के, नांदेडमधील नऊ प्रकल्पात ५३ टक्के, तर परभणीतील दोन मध्यम प्रकल्पात १७ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात तर केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील तब्बल १२६ लघू प्रकल्पात केवळ ९ टक्के व परभणीतील २२ लघू प्रकल्पात दहा टक्केच उपयुक्त पाणी शिल्लक आहे. धाराशिव मधील २०६ लघू प्रकल्पात १४ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात २४ टक्के उपयुक्त साठा आहे.
३१५ लघू-मध्यम प्रकल्प जोत्याखाली
मराठवाड्यातील २५ मध्यम व २९० लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या मध्यम प्रकल्पात छत्रपती संभाजीनगरमधील सहा, जालना व लातूरमधील प्रत्येकी दोन, बीड व धाराशिव मधील प्रत्येकी सात तसेच नांदेडमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.
याशिवाय जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील २९, जालन्यातील ४८, बीडमधील ६४, लातूरमधील ४३, धाराशिवमधील ९३, नांदेडमधील एक, परभणीतील १२ प्रकल्पांचा समावेश आहे. ७४९ पैकी केवळ ११६ लघू प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठलेले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.