मोहन काळे ः सकाळ वृत्तसेवा
Onion Market : रोपळे बुद्रूक, जि. सोलापूर ः कांदा उत्पादक (Onion Producer) शेतकऱ्यांना सध्या कांद्याच्या दराची चिंता लागली आहे. कांद्याचे केव्हा दर (Onion Rate) वाढतील आणि चाळीतला कांदा कधी एकदाचा बाहेर काढीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
अजूनही कांद्याचे दर काय वाढेनात आणि चाळीतला कांदा काही हलेना...! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
दररोजच्या कडक उन्हामुळे वातावरणातील उष्णता वाढत आहे. त्यामुळे चाळीत ठेवलेला कांदाही आता खराब होऊ लागला आहे.
चाळीत ठेवलेला कांदा सुरक्षित राहत असला तरी सध्याच्या उष्णतेमुळे तो कांदा खराब होऊ लागला आहे.
आठवड्यातून किमान एकदा तरी चाळीतील कांदा बाहेर काढून निवडावा लागत आहे. त्यातील खराब झालेला कांदा बाजूला काढावा लागत असल्यामुळे उत्पादनात घट होऊ लागली आहे.
शिवाय चाळीतील कांद्याची निगा राखण्यासाठीच्या मजुरीचा खर्च वाढत आहे. दर वाढले नाहीत. मात्र कांदा सुरक्षित ठेवण्यासाठी मजुरीचा खर्च मात्र वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी यंदाच्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली होती.
काही शेतकऱ्यांनी आंतरपीक म्हणून लागवड केली होती तर बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याची खास लागवड केली होती. यामध्ये जास्त दिवस टिकणारा फुरसुंगी डबल पत्तीचा कांदा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केला होता.
कांद्याला लागवडीपासूनच चांगले हवामान मिळाल्यामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ झाली. बाजारपेठेत आवक वाढू लागल्याचे पाहताच व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
असे असले तरी दोन-तीन महिने उलटून गेले तरी कांदाचे दर काही वाढेात. त्यामुळे कांदा अजून किती दिवस साठवून ठेवायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
जास्त दिवस कांदा साठवून ठेवल्यामुळे आता सगळीकडे शेतात कांद्याचा उग्र वास येत आहे. पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. त्यामुळे पावसात कांदा कसा साठवण्यासाठी होणारा खर्च वाढत आहे. दहा-पंधरा दिवसांतून एकदा कांदा निवडून तो पुन्हा भरून ठेवावा लागतो.
नासलेला कांदा फेकून द्यावा लागत असल्यामुळे उत्पादनात घट होताना दिसत आहे. कांदा लागवडीपेक्षाही कांद्याची काढणी व साठवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढू लागला आहे.
सध्या एक नंबरचा कांदा सातशे ते आठशे रुपये प्रतिक्विंटलने जात आहे.
हा दर परवडणारा नाही. किमान अडीच ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे भाव वाढले तरच शेतकऱ्यांना कांदा परवडणार आहे. अजून तरी कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.
आठवड्यातून एकदा तरी कांदा निवडावा लागतोय. हे आता नित्याचे काम झाले आहे. पाट्याच्या पाट्या खराब झालेला कांदा फेकून द्यावा लागत आहे.
काय करायच आता कांद्याचे भावच वाढत नाहीत. त्यामुळे कांदा आम्हाला सांभाळून ठेवावा लागत आहे. अजून किती दिवस कांदा साठवून ठेवावा याचा अंदाजही येत नाही.
- मारुती यादव, कांदा उत्पादक शेतकरी, रोपळे बुद्रूक, ता. पंढरपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.