नाशिक ः यंदाचा पाऊस समाधानकारक असल्याने अनेक भागात मुबलक पाणीसाठा (Water Stock) उपलब्ध आहे. यासह गेल्या दोन वर्षांत बियाण्याची (Onion Seed) उपलब्धता आहे. मात्र यंदा अतिवृष्टीचा फटका रब्बी उन्हाळ कांदा रोपवाटिकांना (Onion Nursery) मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
त्यानंतरही ऑक्टोबरपासून रोपांच्या उपलब्धता पाहून लागवडी (Onion Cultivation) सुरू झाल्या. मात्र नोव्हेंबरअखेरपर्यंत अखेर रोपांची शोधाशोध सुरू होती. अनेकांनी दुबार रोपे तयार करून प्रस्तावित लागवडी पूर्ण करण्यासाठी रोपांची उपलब्धता केली आहे.
पर्यायी पीकपद्धती समोर नसल्याने डिसेंबरमध्ये लागवडी वाढल्या. उन्हाळ कांद्याच्या दरात फटका बसला तरीही कांदा लागवडी वाढत्याच आहेत.
जिल्ह्यात गुरुवारी (ता. ५) १ लाख ३५ हजार ९२६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. तर अनेक भागात या लागवडी वेगाने सुरू आहेत. गेल्या वर्षभरात उन्हाळा कांद्याला अपेक्षित दर मिळालेला नाही. त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना बसलेला आहे. मात्र तरीही यंदा कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल पाहायला मिळत आहे. त्यामुळे पुन्हा विक्रमी कांदा लागवड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
खरीप व लेट खरीप कांद्याचे नुकसान झाल्याने अनेक भागात लागवडी बाधित झाल्या होत्या. असे असताना आता सटाणा, येवला, देवळा, मालेगाव, नांदगाव, कळवण व निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवडी वाढल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे.
यंदा मजूर टंचाई मोठ्या प्रमाणावर भासली आहे. परिणामी लागवड खर्च एकरी ३ ते ४ हजार रुपयांनी वाढलेला आहे. त्यातच वातावरण बदलाचा मोठा परिणाम झाल्याने पीक संरक्षण खर्च वाढल्याचे चित्र आहे. असे व्यस्त चित्र असताना लागवडी वाढतच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवडी वाढविण्यापेक्षा क्षेत्र मर्यादित ठेऊन एकरी उत्पादकता वाढवावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.
पुढील उत्पादन वाढण्याची शक्यता असल्याने निर्यातवाढ होणे अपेक्षित वाटते. लागवडी वेळेवर होणे गरजेचे आहे अन्यथा काढणीपश्चात नुकसान होण्याचा धोका संभवतो. उत्पादन खर्च व उत्पन्नात समतोल साधावा. कांदा लागवड तंत्रज्ञानाचा विस्तार होत असल्याने मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान याशिवाय पश्चिम बंगाल मध्येही लागवडी वाढत्या आहेत. जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्याची काळाची गरज आहे.
- डॉ. सतीश भोंडे, कांदा पीक शास्त्रज्ञ व माजी अतिरिक्त संचालक-राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान(एनएचआरडीएफ)
जिल्ह्यातील उन्हाळ कांदा लागवडीची स्थिती : (ता. ५ जानेवारी अखेर)
तालुका...क्षेत्र (हेक्टर)
मालेगाव...११, ८८२
सटाणा...३४, २४५
नांदगाव...११, ०४६
कळवण...११, ०४६
देवळा...१३, ६१८
नाशिक...४७५.७०
पेठ...१३६.९
निफाड...१०, ८८२
सिन्नर...५, ५६९
येवला...२३, ६२७
चांदवड...१८, ८३४
एकूण...१, ३५, ९२६.६
कोट --
कांद्याला अजूनही शाश्वत पीकपर्याय नाही. डाळिंब पिकावर तेलकट डाग रोग, मर या रोगांमुळे अडचणी आहेत. द्राक्ष पिकातील नुकसान व दरातील अस्थिरता आहे. ऊस केला तर वेळेवर तोड नाही. त्यामुळे पैसे होत नाही. परिणामी खर्च निघत नसल्याने कांद्याला पसंती आहे.
- शिवाजीराव पवार, कांदा उत्पादक शेतकरी, वाखारी, ता. देवळा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.