गडचिरोली : भूमी अभिलेख कार्यालयाने (Land Record Office) एकाच्या जागेची मोजणी (Land Survey) करताना दुसऱ्याच्या जागेचा सात-बाराच (Satbara Paper) गायब केला. त्यामुळे वयाच्या ८० व्या वर्षांत वृद्ध शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे यांना या कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत. ऑनलाइन सात-बारासाठी (Online Satbara) या भूमी अभिलेख कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेले आनंदराव कांबळे यांनी आतातरी माझा हक्काचा सातबारा द्या, अशी आर्त हाक या विभागाला दिली आहे.
गडचिरोली (जुना भूमापन क्र. ५४८/२ /५४९ आराजी ०.८७ हेक्टर आर) ही जमीन भूधारक आनंदराव रामन्ना कमळापुरवार यांच्या मालकीची होती. त्यांच्याकडून आनंदराव गणुजी कांबळे यांनी खरेदी हक्काने घेऊन (फेरफार क्र. ९१२, ९१३) २३ नोव्हेंबर १९९५ अन्वये क्षेत्र आराजी ०.६० हेक्टर आर खरेदी केली. त्यानुसार सर्वे नं. ५४८/२,५४९-२ नवीन सात-बारा तयार करण्यात आला.
उर्वरित ५४८/२,५४९-१ (आराजी ०.२७ हेक्टर आर) जमीन मिराबाई पत्रू सोमनकर यांनी खरेदी केली. त्यानुसार पुनर्मोजणीमध्ये मीराबाई पत्रू सोमनकर यांचा नवीन सर्वे क्रमांक ५१० क्षेत्र आराजी ०.२८ हेक्टर आर. चा सातबारा कायम करण्यात आला. परंतु आनंदराव गणुजी कांबळे यांचा सातबारा पुनर्मोजणीनुसार तयार करण्यात आला नाही.
उपोषणाचा इशारा
आपण शेती घेतल्यापासून पटवऱ्यांकडून सात-बारा घेऊन आपल्या कामासाठी वापरत होतो. पण या ऑनलाइनच्या काळात सात-बारा घेतला नाही. आपल्या जुन्या सात बारा यानुसार तत्काळ मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयाने आपली चूक दुरुस्त करावी व नवीन सात-बारा बनवण्याकरिता उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे प्रकरण सादर करावे अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशारा अन्यायग्रस्त शेतकरी आनंदराव गणुजी कांबळे यांनी भूमी अभिलेख विभागाला दिला आहे.
सदर शेतकऱ्याची शेती ५ एप्रिल २०२२ ला मोजली आहे. पण या मोजणीने इतर शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे ५४८/२ ,५४९-२ शेतीची मोजणी पुन्हा करण्यात येईल. मोजणीकरिता लागणारा चुना व मजूर याचा संपूर्ण खर्च कार्यालय करेल.नंदा आंबेकर, अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, गडचिरोली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.