Banana Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : विमा हप्ता जप्त करून शासनाला सुपूर्द करू !

Crop Insurance scheme : सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील ५५ शेतकऱ्यांना विमा हप्ता जमा करण्यासंबंधी नोटिसा आल्या आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालेल्या जिल्ह्यातील १२०० पेक्षा अधिक केळी उत्पादकांना किंवा विमाधारकांना विमा कंपनीने आपल्या शेतात केळी नाही, आपला विमा हप्ता जप्त करून शासनाला सुपूर्द केला जाईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सनपुले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील ५५ शेतकऱ्यांना विमा हप्ता जमा करण्यासंबंधी नोटिसा आल्या आहेत. तसेच चोपड्यातील पंचक, खेडीभोकरी, गोरगावले येथील शेतकऱ्यांनादेखील अशा आशयाच्या नोटिसा विमा कंपनीने पाठवून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. निसर्ग साथ देत नाही, त्यात शासन, प्रशासन व कचखाऊ मंडळी हकनाक मनस्ताप देत असल्याची नाराजी शेतकऱ्यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना व्यक्त केली.

फळ पीकविमा योजनेत सहभागी झालेल्या आणि विमा हप्ता जप्त करण्याच्या नोटिसा प्राप्त झालेल्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची सनपुले (ता.चोपडा, जि. जळगाव) येथे जावून भेट घेतली. तसेच त्यांच्याकडून पीकविमा योजनेबाबतच्या तक्रारींची माहिती जाणून घेतली.

सनपुले येथील किरण मच्छिंद्र पाटील यांच्या ३२९ या गटामध्ये केळी लागवड असूनही त्यांच्या शेतात केळी लागवडच नसल्याचा शोध विमा कंपनीने लावला. असाच प्रकार मच्छिंद्र रामसिंग पाटील यांच्याबाबत घडला आहे. त्यांच्या गट क्रमांक २३९ मध्ये केळी आहे. परंतु त्यांनाही विमा कंपनीने नोटीस पाठविली आहे.

सनपुले येथील सखूबाई पाटील, साहेबराव कोळी, गयाबाई पाटील, डिगंबर पाटील, मेघाबाई पाटील, प्रेमलाल पाटील यांच्या शेतात केळी दिसते. पण त्यांनाही विमा कंपनीने विमा हप्ता जप्त करून शासनजमा करण्याच्या नोटिसा दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

तसेच काही शेतकऱ्यांच्या विमा संरक्षित क्षेत्रात केळी नव्हती, परंतु संबंधित शेतकऱ्यांच्या केळीची काढणी डिसेंबर, जानेवारीत पूर्ण झाली. यानंतर संबंधितांनी या क्षेत्रात हरभरा, बाजरीचे पीक घेतले. त्यात आता कापसाचे पीक आहे. आता विमा कंपनी सांगते जानेवारीच्या शेवटी पीक पडताळणी केली, त्या वेळी शेतात केळीचे पीक कसे दिसेल. आणि आताही आम्ही केळीचे पीक कसे दाखवू.

केळी पिकासाठी फक्त आंबिया बहरमध्येच फळ पीकविमा योजनेतून संरक्षण मिळते. केळीसाठीदेखील डाळिंब, पेरू, चिकूप्रमाणे दोन बहरांत विमा संरक्षण घेण्याची तरतूद केली जावी. तसेच आमच्या गावाला काही मंडळीच्या खोट्या तक्रारींची दखल घेऊन हेतुपुरस्सरपणे लक्ष्य करण्यात आले.

या मंडळीची उठबस कृषी आयुक्तालयात आहे. काही कृषी विभागातील कर्मचारीदेखील योजना बंद कशी पडेल व शेतकऱ्यांना लाभ मिळणे कसे थांबेल, असा प्रयत्न करीत आहे, काही लोकप्रतिनिधींचे बगलबच्चेही आपला प्रभाव दाखवून शेतकऱ्यांना लक्ष्य करतात, असेही शेतकरी म्हणाले. (क्रमश:)

रावेर, जळगावात पंचनामे होवूनही नोटिसा

रावेर, जळगाव, मुक्ताईनगर व यावल तालुक्यांत वादळी पावसात मे, जून महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी यासंबंधी विमा कंपनीच्या अॅपवर नुकसानीचे छायाचित्र व इतर माहिती सादर केली. यानंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींसह महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर पंचनामे केले.

परंतु असे पंचनामे झालेल्या २०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनाही विमा कंपनीने नोटिसा बजावून आपल्या शेतात केळीच नाही, आपला विमा हप्ता जप्त करीत आहोत, अशा नोटिसा दिल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडे पोचला विषय...

अन्यायग्रस्त फळ पीकविमाधारक किंवा केळी उत्पादकांनी विमा कंपनीकडून आलेल्या नोटिसा व इतर मुद्द्यांवर जळगावात जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. त्यात जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पीक पडताळणी किंवा पाहणी कशी केली, याबाबत विचारणा केली.

त्यावर विमा कंपनीचे प्रतिनिधींनी ही पडताळणी सॅटेलाईट इमेजची मदत घेऊन झाली तसेच अनेक प्रकरणांत आमचे प्रतिनिधी २३ जानेवारी २०२३ रोजी थेट ज्या क्षेत्रावरील केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे, तेथे पोचले होते. तेथे संबंधित शेतकरी आलेच नाहीत.

त्यामुळे संबंधित क्षेत्रानजीकच्या किंवा शेजारी शेतकऱ्यांना विचारून गटाची माहिती घेतली व पडताळणी केली, अशी माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकारी मित्तल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून पीक पडताळणी वस्तुस्थितीला धरून केलेली नाही. ती योग्य नाही, असे या बैठकीत सांगितल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील अनेक केळी पीकविमाधारक शेतकरी २०२२-२३ मध्ये फळ पीकविमा योजनेत परताव्यांसाठी पात्र ठरलेले असताना नोटिसांचा खेळ करीत आहे. माझ्या शेतात केळी असल्यानेच मी योजनेत सहभाग घेतला, पण आता मला आपण केळीच लावली नव्हती व आपला विमा हप्ता जप्त करीत आहोत, अशी नोटीस विमा कंपनीने बजावली. या प्रकाराला आता काय म्हणावे. शासन एक रुपयात पीकविम्याचा गवगवा करते, याच वेळी शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारण्याचेही काम करते, असे म्हणावे लागेल.
- किरण पाटील, शेतकरी, सनपुले (ता.चोपडा, जि.जळगाव)
केळी विमाधारकांनी माझ्याकडे आपली कैफियत मांडली. जे प्रामाणिक शेतकरी आहे व नियमानुसार या योजनेत सहभागी झाले होते. त्यांच्या पाठीशी प्रशासन आहे. संबंधितांना अन्यायग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांची अडचण दूर होण्यासाठी मी सूचना दिल्या आहेत.
- अमन मित्तल, जिल्हाधिकारी, जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT