मुंबई : देशात कापसाच्या लागवडीखालील (Cotton Sowing) क्षेत्र नऊ टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे उत्पादनातही (Cotton Production) वाढ होणार आहे. त्यामुळे मागील वर्षी मागणीच्या तुलतेन कमी उत्पादनाचा सामना यंदा करावा लागणार नाही. यंदा देशातील कापसाचे उत्पादन ३४४ लाख गाठी होण्याची शक्यता आहे, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे (Cotton Assosiation Of India ) अध्यक्ष अतुल गणात्रा (Atul Ganatra) यांनी व्यक्त केला.
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड कन्व्हेंन्शन सेंटर येथे असोसिएनशच्या शताब्दी महोत्सवात गणात्रा बोलत होते. या महोत्सवाला केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल उपस्थित राहणार होते. मात्र त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे देशभरातून आलेल्या उद्योजक, शेतकरी आणि पुरवठादारांशी संवाद साधला. या महोत्सवात उच्चांकी कापूस उत्पादन, सेंद्रिय कापूस उत्पादक आणि नवतंत्रज्ञानाचा वापर करून कापूस पीक घेतलेल्या शेतकऱ्यांचा आणि संशोधकांचा केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी गणात्रा यांनी आगामी कापूस उपलब्धता आणि उत्पादनाचा आलेख सादर केला. ते म्हणाले, की मागील वर्षी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने यंदा कापूस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. असोसिएशनच्या आकडेवारीनुसार ३८७.८७ लाख गाठींचा पुरवठा होण्याचा अंदाज आहे. यंदाचा शिल्लक माल ३१.८९ लाख गाठी आहे. तर एकूण पीक ३४४ लाख गाठी उत्पादन होण्याची शक्यता आहे. तसेच १२ लाख गाठी आयात करण्याचे नियोजन आहे.
२९५ लाख गाठी मिल वापरासाठी, लहान आणि मध्यम वस्त्रोद्योग कारखान्यांसाठी १९ लाख, अन्य वापरांसाठी ६ लाख अशी ३२० लाख गाठींची मागणी असण्याची शक्यता आहे. तर ३२.८२ लाख गाठी शिल्लक राहतील असा अंदाज आहे. एकूणच उत्पादन वाढले तरी त्या तुलनेत मागणी वाढली आहे. त्यामुळे यंदाही बाजारात कापसाला चांगला दर मिळेल.
कापूस शेती, उद्यागेातून ६५ लाख रोजगार : गोयल
शताब्दी महोत्सवासाठी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी व्हिडिओ संदेश पाठवला. त्यात ते म्हणाले, की भारतीय कापूस शेती, कापूस प्रक्रिया, कापडनिर्मिती आणि निर्यात क्षेत्रातून ६५ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होत असते. भारतातून वाढता व्यापार आणि निर्यात हा एक जगाला संदेश आहे. नव्या भारताकडे जग एक विश्वसनीय साथीदार म्हणून पाहू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठत आपण सातत्याने नवे संशोधन करत आहोत, नव्या आव्हानांसाठी भारत नेहमीच सज्ज असतो. कापूस आणि वस्त्रोद्योग उत्पादकांनी टिकावू तंत्रज्ञान आत्मसात करावे, त्यासाठी सरकारी संशोधन संस्थांची मदत घ्यावी,’ असा सल्लाही गोयल यांनी दिला.
शेतकऱ्यांचा सत्कार
विक्रमी कापूस उत्पादन आणि सेंद्रिय पद्धतीने कापूस उत्पादन घेणाऱ्या यवतमाळ येथील अमृतराव देशमुख, गुजरातमधील सोनपारा येथील रसिकलाल पोरिया, तेलंगणाच्या संदीप ताटे या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कापूस संशोधक म्हणून डॉ. सी. डी. मायी यांचाही सत्कार करण्यात आला.
संभाव्य उत्पादन
राज्य क्षेत्र (लाख हेक्टर) संभाव्य उत्पादन (लाख गाठी)
पंजाब २.५० ५.००
हरियाना ६.५० १६.५०
राजस्थान ६.०० १७.३३
गुजरात २५.५० ९१.००
महाराष्ट्र ४२.३० ८४.५०
मध्य प्रदेश ६.०० २०.००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.