नागपूर : केंद्र सरकारने दिल्लीतील शेतकरी आंदोलन (Delhi farmer Protest) मागे घेताना आश्वासनांची पूर्तता करणार, असे सांगितले होते; मात्र त्यानंतरदेखील हमीभावाचा कायदा (MSP Act) अस्तित्वात आणण्यासाठी कोणताच प्रयत्न होताना दिसत नाही. परिणामी शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) भडका या पुढील काळात उडणार असल्याचे संकेत भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिले.
भारतीय किसान युनियनच्या माध्यमातून पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक राज्यातून शेतकऱ्यांचे समर्थन मिळवण्याकरिता टिकैत बैठक घेत आहेत. बुधवारी (ता. ११) नागपूर येथे त्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. बहुजन संघर्ष समितीच्या माध्यमातून आयोजित या बैठकीला समितीचे अध्यक्ष नागेश चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकारने दिल्लीतील आंदोलन मागे घेताना शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविणार असे सांगितले होते. हमीभावाचा कायदा लवकरच अस्तित्वात येईल, असा वादादेखील करण्यात आला होता; मात्र शेतकऱ्यांशी संबंधित एकाही धोरणाची अंमलबजावणी करण्यात केंद्र सरकार सपेशल अपयशी ठरले आहे.
त्यामुळे यापुढील आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. या देशव्यापी आंदोलनात सर्व राज्यातील शेतकऱ्यांचा सहभाग राहणार आहे, असेदेखील टिकैत यांनी सांगितले. ते म्हणाले, की केंद्र सरकारकडून शेतीमालाचे भाव पाडण्यासाठी पुढाकार घेतला जातो. हंगामात देशात अधिक उत्पादन असलेल्या शेतीमालाची आवक केली जाते. निर्यातीच्या बाबतीत मात्र उदासीनता आहे.
सध्या देशात कापसाचे उत्पादन कमी होणार असे संकेत मिळताच केंद्र सरकारकडून कापसाची आयात करण्यात आली. शेतकऱ्यांना योग्य किंवा उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, असे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे या पुढील काळात शेतीमालाला योग्य भाव मिळेल अशी शाश्वती उरली नाही.
शेतकरी वेळीच सावध झाले नाही तर येणारा काळ हा शेती व्यवस्था संपुष्टात आणणारा असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा धोरणांचा सामूहिकपणे विरोध केला पाहिजे. त्याकरिता लवकरच देशव्यापी आंदोलन केले जाणार असून त्यात सर्वांनी सहभागी होण्याची आवाहन त्यांनी या वेळी केले.
केरळ, कर्नाटक या राज्यांतील शेतकऱ्यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. शेतकऱ्यांचे समर्थन या विषयावर मिळविण्याचा प्रयत्न होत असून यावेळचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असे संकेतही टिकैत यांनी या वेळी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.