पाचोड, जि. औरंगाबाद ः महिन्याचा कालावधी उलटला, तरी अद्याप शासनाकडून तूर खरेदी हमीभाव आधारभूत केंद्र (MSP Procurement Center) सुरू न झाल्याने व गतवर्षाच्या वाईट अनुभवाला वैतागून व आधारभूत किमतीपेक्षा खुल्या बाजारात अधिक भाव मिळत असल्याने यंदा शेतकऱ्यांनी ‘नाफेड’ च्या (NAFED) प्रतीक्षेतील तूर व्यापाऱ्यांना (Tur Rate) विकण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्याकडून खरेदी केलेली अधिकाधिक तूर गुजरातसह परराज्यात विक्रीसाठी जात असल्याचे चित्र पाचोड (ता.पैठण) येथील आठवडे बाजारासह चौफेर दिसत आहे.
या वर्षी पैठण तालुक्यातील दहा मंडळात ७४३८ हेक्टरवर तुरीची पेर साधली गेली. तूर तयार होऊन महिन्याचा कालावधी उलटला असून अद्याप पैठण तालुक्यात एकही आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाले नाही. गतवर्षी तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना १५ ते २० दिवस केंद्रावर थांबावे लागले.
नाफेड केंद्रावरील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार, राजकीय हस्तक्षेप, आद्रतेच्या नावाखाली कर्मचाऱ्याकडून लुट व केंद्रावर व्यापाऱ्यांची चलती आदी कारणांनी शेतकऱ्यांनी या केंद्राकडे पाठ फिरविली. गतवर्षाचे कडवट अनुभव पाहता यंदा दोन-अडीच महिन्यापूर्वी ''नाफेड''ने तूर खरेदी केंद्र सुरू होण्यापूर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश काढल्याने पंचवीस टक्केही शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही.
मात्र शेतकरी आर्थिक टंचाईत असल्याने त्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरवून खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांना रोख व्यवहारामुळे पसंती दिली आहे.
आधारभूत केंद्रावर ६ हजार ६०० दराने घेतली जाणारी तूर व्यापारी ६८०० ते ७२०० रुपये क्विंटलने खरेदी करून गुजरातसह अन्य राज्यात पाठवत आहे तर काही व्यापारी शेतकऱ्यांकडून आधारकार्ड, सातबारा, बॅकेचे पासबुक घेऊन त्यांचे नावे ऑनलाइन नोंदणी करुन हमीकेंद्रावर तूर विकण्याचा मनसुबा आखत आहे.
बाजारात तुरीचे दर हजार ते पाचशेनी अधिक व पैसे रोख असल्याने तूर उत्पादक त्यांनाच पसंती देत आहे. पाचोड (ता.पैठण) येथे प्रत्येक रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात स्थानिक व्यापाऱ्यासह नगर, जालना, औरंगाबाद, बीड येथील व्यापारी येथे विक्रीसाठी तुरीसह सर्व धान्य आणतात.
प्रत्येक रविवारच्या बाजारी पाच ते सात हजार क्विंटल तूर विक्रीसाठी येऊन कोटीची उलाढाल होते दररोज दोन -पाच ट्रक तूर विक्रीसाठी गुजरातला जात आहे. तर काही व्यापारी साठेबाजी करून खरेदी केलेली तूर विक्रीसाठी गोदामात साठवणूक करीत असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांकडे माल नसला की भाववाढ केली जाते. माल निघण्यास सुरुवात होताच त्यांचे भाव कवडीमोल होतात. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विक्री न करता डाळ तयार करून विकावी. व्यापारी शेतकऱ्यांच्या मजबुरीचा फायदा उचलत असून, त्यांच्या बाजूने कोणीच पुढे येत नाही, एवढेच नाही तर शेतकऱ्यांत ‘एकी’ नसल्याने व्यापारी खुलेआम लूट करीत आहेत.
- सुदर्शन सरोदे, मुक्तार पठाण (तूर उत्पादक)
विविध ठिकाणच्या बाजारांतील भाव पाहून आम्ही त्याच पद्धतीने तूर खरेदी करतो. आम्हास वाहनभाडे, मजूर, मालातील घट आदी बाबींचा भुर्दंड सोसावा लागतो. तूर्तास खरेदी केलेली तूर आम्ही स्थानिक व्यापाऱ्याला देतो व ते गुजरातला पाठवत आहेत.
- शेरखाँ पठाण, तूर खरेदीदार व्यापारी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.