पुणे ः शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव (MSP), देशव्यापी कर्जमुक्ती (Loan Waive), जमीन अधिकार व वीज विधेयक प्रश्नी संयुक्त किसान मोर्चाने (Samyukt Kisan Morcha) अखिल भारतीय पातळीवर २६ जानेवारीला देशव्यापी आंदोलन (Farmers Protest) करण्याची घोषणा केली आहे.
हरियानातील जिंद येथे शेतकऱ्यांची महापंचायत घेऊन देशव्यापी लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे. ट्रॅक्टर रॅली, मोर्चे, निदर्शने आयोजित करून देशभरातील शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यभर रस्त्यावर उतरत आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चात सामील संघटनांची महत्त्वपूर्ण ऑनलाइन बैठक शनिवारी (ता. ७) झाली. शेतकरी सभेचे ज्येष्ठ नेते प्रा. एस. व्ही. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रात २५ जानेवारी रोजी जोरदार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील शेतकरी, खरीप हंगाम वाया गेल्याने संकटात सापडले आहेत. राज्यात यंदा शेतकऱ्यांनी १ कोटी ४१ लाख हेक्टरवर खरिपाची पेरणी केली होती. गोगलगाईचा प्रादुर्भाव, वाणी अळीचा हल्ला, येलो मोझॅक व अति पाऊस, या साऱ्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकरी हैराण झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतून वाचलेल्या पिकांवर परतीच्या पावसाने मोठा आघात केला.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार पहिल्याच टप्प्यात राज्यातील २९ लाख हेक्टर पिके पावसाने मातीमोल केली. एकूण नुकसान पाहता राज्यभरात ४० लाख हेक्टर पिकांना परतीच्या पावसाचा फटका बसला. हे नुकसान पाहता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता. विविध संघटनांनी आंदोलने करूनही सरकारने राज्यात ओला दुष्काळ लागू केला नाही. घोषणा केल्या मात्र अद्यापही मदत दिली नाही. शेतकरी आंदोलनाचा परिणाम म्हणून राज्यात दोनवेळा कर्जमाफी योजना राबविण्यात आल्या.
मात्र धरसोडीचे धोरण व जाचक अटीशर्तींमुळे राज्यातील लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले. पीक विमा योजना, जमीन अधिग्रहण, वनाधिकार, अन्न सुरक्षा, पेंशन, शेतीमालाचे भाव, दूध एफआरपी, यासारखे प्रश्न महाराष्ट्रात तीव्र झाले आहेत.
शेतीचा उत्पादन खर्च सातत्याने वाढत असल्याने व मिळकत घटत असल्याने राज्यातील शेतकरी नैराश्याने आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांचे व श्रमिक जनतेचे प्रश्न तीव्र होत असताना राज्यातील भाजप-शिंदे सरकार महापुरुषांचा अवमान, धार्मिक द्वेषाचे मुद्दे उपस्थित करून शेती, शेतकरी व श्रमिकांचे प्रश्न अडगळीत पडावेत यासाठी नियोजनबद्ध कारस्थाने करत आहे.
२५ जानेवारीला राज्यभर आंदोलने
आंदोलनाच्या तयारीसाठी झालेल्या ऑनलाइन बैठकीमध्ये डॉ. अशोक ढवळे, प्रा. एस. व्ही. जाधव, हिरालाल परदेशी, उल्का महाजन, सुभाष काकुस्ते, सुभाष वारे, ब्रायन लोबो, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, राजू देसले, उमेश देशमुख, किसन गुजर उपस्थित होते.
प्रतिभा शिंदे, मेधा पाटकर, किशोर ढमाले यांनीही आंदोलनात सहभागी होणार असल्याचे कळविले आहे. राज्यातील विविध शेतकरी संघटना, शेतकरी नेते, कार्यकर्ते व सामाजिक संघटनांना जोडून घेत आंदोलन व्यापक करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.